हत्तीचा स्वेटर

16 Apr 2021 15:30:13

hatticha sweater_1 &
 
एकदा जंगलामध्ये खूप थंडी पडली. सगळे प्राणी थंडीने थरथर कापू लागले. धुक्यामुळे जंगलामध्ये अंधुक उजेड दिसायला लागला. गारठा वाढू लागल्याने जंगलातले प्राणी आपल्या घराबाहेर पडेनासे झाले. गार पाणी पिऊन कावळ्याचा घसा बसला त्याला काव काव करता येईना. लांब चोचीचा करकोच्याची चोच थंडीने एकमेकांवर आपटत होती. चिमणीला सर्दी झाली तर लांबड्या मानेच्या जिराफाला खोकला झाला. सगळे प्राणी आपापल्या गुहेमध्ये बसून राहिले. पण जंगलातला गप्पू हत्ती मात्र बिचारा दिवस-रात्र थंडीत काकडत झाडाखाली उभा होता. कारण एवढ्या मोठ्या गप्पूला राहायला त्याचं स्वतःचं घर नव्हतं. कधी तो झाडाखाली उभा राहायचा, तर कधी एखाद्या दगडाच्या आडोशाला. तो सतत उन्हाची वाट बघत, थंडी कधी कमी होईल असा विचार करून स्वतःची सोंड आपल्याच अंगावर फिरवत तसाच दिवसभर इकडे तिकडे फिरायचा.
जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना थंडीमुळे गप्पू हत्तीची होणारी अवस्था बघवत नव्हती. मग एक दिवस शेकोटी भोवती सगळे प्राणी जमा झाले. म्हणाले, ‘‘आपण काय करू या? गप्पू हत्तीला एक घर बांधून देऊ या.’’ झाडावरच्या माकडांनी लक्षात आणून दिलं, की इवलुश्या घरात गप्पू मावणार तरी कसा? तर शेकोटी पलीकडून लांडगा म्हणाला की, ‘‘त्याला आपण एक कायमस्वरूपी शेकोटी तयार करून देऊ.’’ तेवढ्यात अस्वल म्हणालं, ‘‘अरे वेड्या शेकोटी कायमची राहिली तर जंगलाला आग लागेल. मग तर सगळ्यांचीच पंचाईत होईल.’’ असं करता करता शेवटी शांत बसलेला गेंडा आपल्या खडकासारख्या कठीणढोक अंगावरून हात फिरवत म्हणाला की, ‘‘गप्पूसाठी आपण स्वेटर शिवून दिला तर मग त्याला थंडी वाजणारच नाही.’’ ही कल्पना सगळ्यांना आवडली. पण लगेच अरे पण स्वेटर शिवणार कोण? तो कसा शिवायचा? याविषयी चर्चा सुरू झाली. थोड्या अंतरावर मेंढीराणी आपल्या लोकरीवरून हात फिरवत म्हणाली की, ‘‘आम्ही देऊ आमच्या जवळची लोकर निघेल तेवढी.’’ मग ती मिळालेली लोकर नीट विणायचं काम जाळी विणणार्‍या किडुक ताईने आपल्याकडे घेतलं. तिची फौज तयारच होती. यासाठी काम सुरू झालं. बघता बघता काही दिवसात लोकरीचे भलंमोठं आभाळाएवढं कापड तयार झालं. मग आता शिलाई कामाची वेळ. माकड दादाने गप्पू हत्तीचे स्वेटरसाठी माप घ्यायला सुरू केलं. त्याने त्याचे दोन हात आणि एक शेपटी याच्या आधारे गप्पूचे खांबाएवढे पाय मोजले आणि भले मोठे पोट मोजायला माकड दादाला चार वेळा वर-खाली करावं लागलं. शेवटी लांब जाड सोंड मोजून घाम पुसत माकडाने स्वेटरची घेतलेली सगळी मापे अस्वलाकडे लिहून दिली. आता या मापानुसार शिवण्याच काम कोल्हे ताई आणि तिच्या चार बहिणींकडे आलं.
भराभर हातशिलाई करून, स्वेटरचा एक एक भाग तयार झाला. स्वेटरला चार हात-पाय, डोके आणि भल्यामोठ्या गोलाकार पोटाचा भाग हे सगळं शिवून एकमेकाला जोडलं. पोटाला स्वेटर सारखं बटण लावायला जमणार नव्हतं, म्हणून एका मोठ्या दोरीने तिथं गाठ बांधायची ठरली. मग गप्पूने कसाबसा दोन हात दोन पाय हळूच स्वेटर मध्ये घातले. अर्धा स्वेटर अंगात चढवला आणि ते बघून सगळ्या प्राण्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मग शेवटी भलंमोठं पोट स्वेटरच्या आत कसतरी घालू लागला आणि ओढून स्वेटरची मोठी गाठ पोटावर बांधू लागला. पण स्वेटरची गाठ काही बसेना आणि अर्ध उघडे अंग झाकून गप्पू हत्ती थंडीमध्ये शांत काही बसेना. त्याची लाजून लाजून झालेली पुरेवाट पाहून झाडावरची माकडे हात दाखवत जोरजोरात हसू लागली. या सगळ्या धावपळीत गप्पूला स्वेटरमधून घाम आल्यासारखा वाटू लागला.
शेवटी पूर्ण स्वेटर घातल्याची गप्पूची खात्री झाली, तरी या स्वेटरच्या पोशाखात गप्पूचे अर्धे पोट मात्र बाहेर डोकावत होते. गप्पू तरीही सोंड हलवत सगळ्यांना धन्यवाद म्हणत होता आणि इतर प्राणी मात्र त्याच्या त्या अवताराकडे बघून खो खो हसत होते.

- मानसिंग पाटील
8655574794
Powered By Sangraha 9.0