पक्षी आपले सख्खे शेजारी

शिक्षण विवेक    17-Apr-2021
Total Views |
 
pakshi apale sakkhe sheja
 
प्रसिद्ध पक्षी तज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणातून उलगडलेले एक वाचनीय आणि प्रेक्षणीय असे पक्षी आपले सख्खे शेजारी हे पुस्तक आहे. हो, प्रेक्षणीय कारण यात असलेले पक्षांचे फोटो इतके आकर्षक आहेत की आपल्या परिसरात असलेलं हे पक्षी आपण नीट न्याहाळले तर किती देखणे दिसतात, हे या वेगवेगळ्या छायाचित्रकारांनी टिपलेली छायाचित्रे बघताना जाणवते. मुळातच, लेखकांनी मनोगतात सांगितले आहे की पक्षांची माहिती आणि चित्रे यापुरते पुस्तक मर्यादित ठेवायचे नव्हते. आणि त्याप्रमाणे, या आपल्याच परिसरात दिसणार्या अनेकविध आकार-रंगाच्या पक्षांची नव्याने ओळख अगदी त्यांच्या लकबीसहित आपल्याला या पुस्तकात होते. अगदी सहजच दिसणार्या कबुतर, चिमणी, कावळा, मैना, साळुंखी, पोपट या पक्षांपासून खंड्या, बुलबुल, पाकोळी, घार, टिटवी, दयाळ, पिंगळा, शिंपी, हळद्या असे कधी कधी आपल्याला परिसरात दिसणारे जवळपास चाळीस पक्षी या पुस्तकात आपल्याला नव्याने भेटतात. कावळ्याचे गावकावळा आणि डोमकावळा, बुलबुलचे लालबुड्या आणि शिपाई, मैनेचे जंगली मैना आणि भांगपाडी मैना असे वेगवेगळे प्रकार लक्षात येतात.
पुस्तकात सुरुवातीला पक्षी म्हणजे काय, ते निर्माण कसे झाले याविषयी पक्षीशास्त्रज्ञ आणि इतर सबंधित शास्त्रज्ञांचे सुरु असलेले संशोधन इथपासून माहिती मिळते. मग इथे आपल्याला भेटतो डायनोसॉर आणि आधुनिक पक्षांमधला दुवा ‘सायनोसोउरेपट्रीक्स प्रायमा’ हा नावाप्रमाणे वेगळा आणि चित्रात डायनासोरसारखा दिसणारा पक्षी. थोडक्यात इतिहासातून समजते की सुमारे पंधरा कोटी वर्षांपूर्वी एका डायनासॉरच्या जातीतून पक्ष्यांची उत्क्रांती झाली. पक्ष्याचे अधिवास कुठे असतात, त्यांचे निवासस्थान या बाबी आपल्याला समजतात. तर पक्षांचे वर्णन करताना, आकारमान, रंग, नर-मादी, घरट्याचे प्रकार, आवाज, पक्षीपरत्वे वैशिष्ट्य, उडण्याची पद्धत, लकब, त्यांचे स्थलांतरित होणे हे सगळे टिपायचे कसे, याविषयी माहिती मोठ्या रंजक पध्दतीने मिळते . इथेच पक्षांची लांबी कशी मोजली जाते हे सचित्र समाजावून सांगितलेले आहे. पक्षाच्या कपाळापासून ते शेपटीपर्यंत सगळे अवयव दाखवणारे नेटके रेखाचित्र फार मोलाचे आहे. पक्षांची नावे, त्यांची विविध मराठी भाषेतली नावे, सध्याचे इंग्रजी नाव, आधीचे इंग्रजी नाव, शास्त्रीय नाव , लांबी ,आकार आणि आकर्षक फोटो या बाबी आपल्याला प्रत्येक पक्षाच्या बाबतीत आधी दिसतात मग त्या पक्षाची माहिती, ती सुद्धा शास्त्रीय नाही तर दैनंदिन वर्तणूक, वैशिष्टय अशी वैविध्यपुर्ण माहिती आहे.
शहरी भागात आधुनिक इमारतींमध्ये नांदणारी कबुतरे अतिशय मवाळ असतात. तर कावळे जेव्हा भूक नसेल तेव्हा चोचीतला पदार्थ लपवून ठेऊन भूक लागली की तो पदार्थ हुशारीने काढून खातात. कोतवाल पक्षी म्हशीच्या पाठीवर बसून मजेत फरफटका मारतो तर खंड्या पक्षी शहरात टीव्हीच्या अँटिनावर बसून मजेत भल्या पहाटे गातो. अशा एक ना अनेक बाबी आपल्याला अचंबित करतात. रंगीबेरंगी पाने फुले आपण सहज बगतो तसंच विविध रंगी पक्षी आपल्या परिसरात असतात. त्याच पानाफुलात चिवचिवत असतात. त्यांना न्याहाळायला हे पुस्तक आपल्याला शिकवते .
पक्षी निरीक्षण म्हणजे दुर्बिणीचा वापर आला. दुर्बीण कोणती घ्यावी , दुर्बिणीची ओळख, तिचा वापर, काळजी याबाबत अतिशय उपयुक्त माहितीचा एक वेगळा लेख पुस्तकात आहे. अतिशय आकर्षक, वाचनीय, माहितीपूर्ण, असे हे पुस्तक निश्चितच आहे .
लेखक किरण पुरंदरे यांनी निसर्ग जतन, संवर्धन याला आपले आयुष्य वाहिलेले आहे. त्यांचा अभ्यास त्यांनी अतिशय सोप्या समजेल भाषेत सगळ्यांना उमगेल असा उलगडला आहे. तेव्हा चला निघू या पुस्तकातून पक्षी निरीक्षणाला.
- पल्लवी श्रीनिवास मुजुमदार