विजेचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट

18 Apr 2021 14:45:00

vijecha lakhlakhat ani dh 
 
कधी कधी सोसाट्याचे वारे वाहतात, आभाळ ढगांनी झाकाळून जाते, विजांच्या लखलखाटाने डोळे दिपून जातात आणि ढगांच्या गडगडाच्या आवाजाने कानठळ्या बसतात. एरवी शांत असलेल्या आकाशामध्ये असा धिंगाणा अचानक कसा सुरू होतो आणि यासाठी इतकी मोठी ऊर्जा कुठून येते असा प्रश्न पडतो. आकाशातले देव आणि दैत्य यांच्यात लढाई चालली आहे, असे सांगून पूर्वीच्या काळातल्या आज्या नातवंडांना शांत करायच्या. हा कुठल्या तरी स्थानिक देवतेचा कोप आहे अशी भीती अडाणी लोकांना वाटायची.
सूर्यकिरणांमुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ होऊन ती आकाशात वर वर चढत जाते. ती माथेरान किंवा महाबळेश्वर इतक्या उंचीवर जाते तेव्हा तिथल्या थंड हवेमुळे काही वाफांमध्ये सूक्ष्म असे पाण्याचे कण तयार होत जातात, ती वाफ आणखी वर म्हणजे कुलूमनाली इतक्या उंचावर जाते. तेव्हा सूक्ष्म असे हिमकण तयार होतात आणि हिमालयाइतक्या उंचीवर जाते. तोपर्यंत बर्फाचे कण तयार होतात. हे सगळे कण वाफेमधून एकत्र येऊन आभाळातले ढग तयार होतात. एक एक ढग आभाळात दहा बारा हजार मीटर इतक्या उंचीपर्यंत पसरलेला असतो.
सोसाट्याच्या वार्‍याचे प्रवाह जमिनीकडून वर आकाशाकडेही जात असतात. वेगाने वर जात असताना हे हिमकण आणि बर्फाचे कण एकमेकांना घासले जातात आणि त्यातून त्यांना घन (पॉझिटिव्ह) किंवा ऋण (निगेटिव्ह) विद्युतभार असणारे आयन वेगळे होतात. त्यांनी भारलेले दोन प्रकारचे ढग एकमेकांजवळ आले तर घन आणि ऋण आयन एकमेकांकडे झेपावतात. हवेमधून ज्या मार्गाने ते जातील तिथली हवा प्रचंड तापते. त्यातून तीव्र असे तेज निर्माण होते, तसेच धक्कालहर (शॉकवेव्ह) तयार होते. हे तेज एक दोन दशांश सेकंदांपुरतेच असल्यामुळे आपल्याला वीज क्षणभर लखलखलेली दिसते. ते दृष्य पाहाण्यासारखे असते. पण धक्कालहरीमुळे तयार झालेला आवाज ढगांमध्ये घुमत राहतो, तो गडगडाट काही सेकंद होत राहतो आणि धडकी भरवतो. ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या मानाने कमी असल्यामुळे आधी वीज चमकते आणि नंतर मेघगर्जना होते. काही वेळा ही वीज आभाळातून वेगाने जमिनीवर येऊन पडते आणि त्या जागी हाहाकार उडवते.
- आनंद घारे 
Powered By Sangraha 9.0