ऋतूंची रंगपंचमी

शिक्षण विवेक    02-Apr-2021
Total Views |

rutunchi rangpanchami_1&n 
 
 
मराठी ऋतू हे निसर्गातील रंगविविधता दर्शवितात. 3-3 महिन्यांचा एक ऋतू पण प्रत्येक महिन्याची रंगछटा वेगळी असते. पहिला ऋतू ग्रीष्म ह्यात चैत्र, वैशाख व जेष्ठ असे तीन महिने येतात. ह्या ऋतूंचा प्रमुख रंग हा सोनेरी आहे. जो त्याला तेजस्वी सूर्य किरणांनी दिला आहे. सर्व जग हे उन्हाळलेले दिसते.
चैत्राच्या उष्णतेने निसर्गातील सर्व रंग खुलून येतात नवीन आलेली कोवळी पिंपळपाने गुलाबी थोडी जून पोपटी अशा रंगात रंगलेली दिसतात. घाणेरी ह्या नावाने ओळखल्या जाणार्या झाडाची फुले अतिशय लोभस. ह्याच महिन्यात दिसतात गुलाबी-जांभळा पिवळा केशरी लाल पांढरा असे अनेक विरुद्ध रंग असूनही देखणी दिसतात.
वैशाख हा रंग व गंध युक्त महिना आहे. दिवस सूर्य प्रकाशाने तेजाळलेला तर राग चांदण्याच्या शीतलतेने शांतवलेली असते. तसेच रात्रीला सुगंध असतो तो जाई, जुई, मोगरा मदनबाण या फुलांचा गुलमोहर पळस पांगारा हे सूर्याच्या उष्णतेने पेटून लाल होतात. संध्याकाळ होता होता विविध रंग उधळत गुलबक्षी फुलून येते. पण सर्वात सुंदर दिसतो तो पिवळा बहावा. वर्षभर बिचारे झाड ओळखूही येत नाही. पण त्याच्या दिमाख आत्ता पहावा. अंगभर पिवळे घोस लेऊन त्याचे नैसर्गिक झुंबरच होते.
तेजस्वी वैशाखामागून येणारा जेष्ठ हा धरतीवर पांढर्या ढगांचे पांघरूण घालत येतो. नवीन पालवीच्या लालसर हिरवा पोपटी गर्द हिरवा ह्या सर्व छटा आजूबाजूला दिसू लागतात. मातीचा तपकिरी रंग जाणवू लागतो. निळ्याभोर आभाळातून भटकणार्या ढगांच्या आकारांकडे सर्वांचे लक्ष असते. वळवाच्या सरी आसमंतात मृद्गंध पसरवतात व शुभ्र पांढर्या कापसी ढगात हळूहळू निळा-राखाडी रंग वाढत जातो.
ग्रीष्माच्या रखरखाटानंतर हिरवाईचा दिलासा देणारा ऋतू हा शरद/शिशिर. ह्यात आषाढ श्रावण आणि भाद्रपद हे महिने येतात. ह्या ऋतूचा रंग निळा जांभळा हिरवा म्हणजेच मोरपिसासारखा असतो. कारण मोरपिसात दिसणार्या सर्व आल्हाददायक रंग सर्वत्र दिसतात.
आषाढात निळे सावळे ढग तृषार्त पृथ्वीवर संजीवन वृष्टी करतात. ह्या पृथ्वीचा पोपटी हिरवा शालू खुलून दिसतो. गवत पोपटी, झाडे हिरवी तर निळ्या ढगांनी भरलेले आभाळ रात्री झाकोळलेले असते.
आषाढाच्या महिन्यानंतर पृथ्वी सोनेरी सूर्यकिरणांसाठी आसुसलेली असते. हिरव्या पिवळ्या रंगांची लपाछपी खेळणारा श्रावण येतो. आभाळात सूर्योदयाच्या सूर्यास्ताच्या वेळी केशरी सोनेरी निळा गुलाबी जांभळा ह्या सर्व छटा आकाशात हजेरी लावतात जणू पैठणीचे रंग लेवून भरजरी श्रावण येतो.
श्रावणाच्या शेवटी भाद्रपदाची जाणीव होऊ लागते. सोनचाफे कोरांटी अशी अनेक फुले दिसू लागतात. तांबड्या जांभळ्या गुलाबी रंगांची उधळण करत तेरडा येतो. कण्हेर जास्वंद गुलबक्षी अशी रंगीत फुलांबरोबर हिरव्या पत्री दुर्वा दिसू लागतात. केवडा कमळ उठून दिसतात. नेचे हे तर एखाद्या सुबक रांगोळी सारखे दिसते.
पाऊस ओसरता ओसरता हेमंत ऋतू येतो. अश्विन मार्गशीर्ष पौष हे महिने हेमंत ऋतूत येतात. अश्विन महिन्यात गडद हिरव्या झाडांवर परत थोडा पिवळेपणा जाणवू लागतो. भट पिकून पिवळे पडू लागतात. तसे आसमंतात त्याचा सुगंधी दरवळ जाणवतो. शेते उन्हाळलेली दिसू लागतात. पिकात रंगीबेरंगी पक्षी फिरू लागतात. हा महिना झेंडूचा तेजस्वी सोनेरी रंग लेवून येतो. हिरव्या साडीला लफ्फेदार पिवळ्या गोड्यांनी खुलवत येते. रात्री खडीची नक्षी असणारी चंद्रकळा नेसून नटताना पाहतात. पण कोवळी धुक्यातून येणारी किरणे धरेवर येतात. शेतात हिरव्या रंगावर सावळ्या रंगाचे स्वप्न पांघरले जाते.
लहानपणाचा कवडशांचा खेळ परत बघावासा वाटतो. ज्यात प्रत्येक धूलीकण सूर्य किरणांच्या परीस स्पर्शाने सोनेरी दिसतात. झाडे ओकी बोकी दिसू लागतात.
माघ महिन्यात सूर्याची तेजस्विता जाणवू लागते. रथसप्तमी नंतर दिवस दिवस मोठा जाणवू लागतो. आंब्याच्या झाडांवर लालसर तुरे, मोहोर गच्च होतो, त्याचा सुगंध सर्वत्र वसंत स्पर्शाने मोहरलेली ढाडे दिसतात. पर्णसंभार कमी झाल्याने झाडांची खोडे, फांद्या तपकिरी दिसू लागतात. रंगीबेरंगी पक्षी इकडेतिकडे उडताना दिसू लागतात. हळूहळू तपकिरी रंग सर्वत्र दिसू लागतो.
फाल्गुन हा निसर्गातील उन्हाळ्याची तीव्रता दर्शवतो, तसेच निसर्गातील रंगपंचमीचीही सुरूवात करतो. नव्या पालवीने नटलेल्या वृक्षांवर हिरव्या रंगाच्या सर्व छटा दिसतात. नवीन अजून धुळीच्या थर न बसल्यामुळे त्याने सूर्यकिरणात चमकतात. सूर्य किरणांमधून जीवनरस शोषून घेऊन आनंदाने पिंपळपाने सळसळत राहतात. प्रत्येक ऋतूत नव्या रंगांची उधळण करत निसर्ग जादुगासारखा आपल्याला स्तिमित करतो.
- सोनाली देशमुख, सहशिक्षिका
एस.पी.एम. इंग्रजी माध्यम शाळा, निगडी