समर्थांचा राम

शिक्षण विवेक    21-Apr-2021
Total Views |

samarthanche raam_1  
 
समर्थ रामदासांचं साहित्य, त्यांचा दासबोध हा चालता-बोलता व्यवहार ज्ञानकोश आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, समर्थांचं साहित्य हे तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्याशी निगडित आहे. हे साहित्य व्यवहारज्ञान शिकवणारं आहे. ही सृष्टी कशी निर्माण झाली? या स्वाभाविक कुतूहलापासून जैवविविधतेपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा समर्थ त्यांच्या साहित्यात करतात. सुवाच्य अक्षर कसे काढावे, रोज वाचन, लेखन का करावे इथपासून रागज्ञान, तालज्ञान, संगीत आदी कलांची नोंद घेतात. रोजच्या व्यवहारातील चातुर्य, विवेक शिकवतात. आदर्श दिनचर्या शिकवतात. समाजकारण, राजकारण, अर्थकारण यांच्याकडे डोळसपणे पाहायला शिकवतात. लोकस्वभाव कसे पारखावेत, धूर्तपणा अंगी कसा बाणवावा आणि या सर्वांच्या मुळाशी असलेली रामभक्ती. भक्तीदेखील भोळ्या-भाबड्या रीतीने नाही, तर सजगपणे कशी करावी या सर्वांची चर्चा समर्थ करतात.
समर्थांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राम...! समर्थांनी आपल्या साहित्यात मांडलेला राम नेमका कसा आहे, हे आपण जाणून घेऊ या.
अभ्यासोनि प्रकटावे
अभ्यासोनि प्रकटावे । ना तर झाकोनी असावे ।
प्रकट होऊन नासावे । हे बरे नव्हे ॥
समर्थ या ओवीत एक मौलिक सूचना करतात. कोणतीही गोष्ट प्रकटपणे मांडताना, मग ते लेखन असो, भाषण असो, नृत्य, नाट्य, अभिनय काहीही असो. त्यापूर्वी पुरेसा अभ्यास करावा; मुद्देसूदपणे, विचारपूर्वक आपली मते मांडावीत. पुरेसा विचार न करता, भान न राखता, मांडलेले विचार निरर्थक ठरू शकतात.
इतकं परखड मत नोंदवणार्या समर्थांनी महाराष्ट्राच्या जनमानसासमोर ‘राम’ हे दैवत स्थापन करताना किती विचार केला असेल? परंपरागत महाराष्ट्रात शतकानुशतके ‘विठ्ठल’ हे दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून रूढ असताना राम हे दैवत स्थापण्याची आवश्यकता का निर्माण झाली असेल, हा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो.
समर्थांच्या पूर्वीच्या काळात होऊन गेलेल्या भागवतधर्मीय संतांनी, म्हणजे, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ या सर्वांनी विठ्ठलभक्तीची एक मोठी परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली होती. सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, चोखामेळा अशी अठरापगड महाराष्ट्रीय लोकपरंपरा विठ्ठलाची भक्ती करत होती; पण या संतांचा काळ आणि समर्थांचा काळ यात मात्र मोठे अंतर होते. ज्ञानेश्वरांचा, नामदेवांचा काळ हा स्वराज्याचा काळ होता. राजा रामदेवरायाचं राज्य होतं; पण समर्थांचा काळ मात्र गुलामगिरीचा, पारतंत्र्याचा काळ होता. संपूर्ण राष्ट्र पारतंत्र्यात होतं. महाराष्ट्रावर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि इमादशाही या पाच बहामनी सत्तांची सुलतानी होती. निरंकुश राज्यकर्ते धर्माची यथेच्च हानी करत होते. मंदिरांचा विध्वंस होत होता. अशा राजकीय परिस्थितीत समाजही निःसत्त्व, दिशाहीन झाला होता. स्वदेशाभिमान नाही, परकीयांची गुलामगिरी करत असल्याचे शल्य नाही, धर्मावर घाला घातला गेला तरी, स्वाभिमानाने पेटून उठणं नाही, स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करणं नाही असा काळ होता.
या काळात देवाचे नुसते ’भक्तिरूप’ नाही, तर ‘शक्तीरूप’ही समाजासमोर मांडण्याची आवश्यकता समर्थांना जाणवली असावी. संपूर्ण देश पायी फिरत असताना समर्थांनी जनमानसाचा फार अभ्यास केला होता. त्यांनी सामाजिक, राजकीय परिस्थितीचे पूर्ण भान राखले होते. म्हणून धनुष्यबाण घेतलेला ‘शस्त्रसिद्ध राम’ हे काळाला अनुरूप दैवत त्यांनी फार दूरदृष्टीने महाराष्ट्रीय जनांसमोर ठेवले.
समर्थांची राम उपासना
राजीवलोचन भवभयमोचन पतितपावन रामा
श्रीरघुनंदन राक्षसकंदन दशकंठछेदन रामा
संसार खंडन दानवदंडन रामदास मंडण रामा
कशी होती समर्थांची राम उपासना? कोणत्याही आध्यात्मिक सत्पुरुषाला प्रिय असणारे त्याचे ‘पतितपावन’ असे रूप समर्थांना पूजनीय होतेच. रघुकुलाचा नंदन राम, कमलाप्रमाणे नेत्र असलेला राजीवलोचन राम अशा संतकाव्यात येणार्या सगळ्या विशेषणांनी समर्थ रामाला वंदन करत होतेच; पण याबरोबरच त्याचे राक्षसांचा संहार करणारे, दशकंठ रावणाला छेदणारे आणि दानवांना शासन करणारे स्वरूप समर्थांना विशेष पूजनीय होते. समर्थांची राम उपासना आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक अशी त्रिस्तरीय होती. समर्थांची राम उपासना म्हणजे रामाच्या पराक्रमाची उपासना होती.
राष्ट्रकार्य आणि रामकार्य
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवा कां बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठी ॥
देशाचं स्वातंत्र्य हे रामकार्य होतं, असं म्हणणार्या समर्थांनी देशव्यापी चळवळ उभारली. अवघा देश पिंजून काढला. उत्तरेकडे मोगल, दक्षिणेकडे फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्या आक्रमणाने संपूर्ण देश पारतंत्र्याने गांजला होता. समर्थांनी स्वकीय समाजाचे संघटन करण्यास सुरुवात केली. मठ मंदिराद्वारे देशभर संपर्क यंत्रणा उभारली.
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयांचे ।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥
समर्थांच्या या सर्व राष्ट्रकार्याच्या मुळाशी भगवंताचे, रामाचे अधिष्ठान होते. ‘संभवामि युगे युगे,’ असं वचन गीतेत देणारा भगवंत या काळातही धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी सज्ज होऊन पाठीशी उभा राहील याबद्दल विश्वास असल्याने, समर्थांनी त्यांच्या रामाला हाक मारली. समर्थ पंढरपुरात विठ्ठल मूर्तीसमोर हात जोडून उभे होते आणि म्हणत होते...
इथे का रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।
चापबाण काय केले । कर कटावरी ठेविले ।
काय केले वानरदल । इथे मेळविले गोपाळ ।
पंढपुरात विठ्ठलाचं दर्शन घेऊन कृतार्थ होण्याऐवजी समर्थ अस्वस्थ झाले. या अभंगात ते विचारतात, ‘विठ्ठला, राम अवतारातले तुझे चापबाण कुठे गेले? त्या चापबाणांना दूर करून तू कमरेवर हात ठेवून का उभा आहेस? तुझी लढवय्यी वानरसेना, महाशक्तीशाली हनुमंत कुठेच दिसत नाही. उलट तुझ्याभोवती गोपाळांचा मेळा आहे. देवा, तुझे हात असे कमरेवर नकोत. रामावताराप्रमाणे तुझे दिव्य धनुष्यबाण हातात घे. परकीय बेड्या तोडण्यासाठी तुझे ते सशस्त्र रूप आम्हाला प्रेरणा देत राहो.’ समर्थांनी महाराष्ट्राला दिलेला राम अशा प्रकारे पराक्रमी वीर योद्धा आहे.
समर्थांचा राम
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।
जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
प्रभू रामचंद्र ज्याच्या पाठीशी आहे, अशा भक्ताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत आहे? असा प्रश्नच समर्थ विचारतात. समर्थांचा राम भक्ताभिमानी आहे. इतकेच नाही, अशा परकीय आक्रमणांच्या संकटकाळी या अनन्य भक्ताने रामाला हाक मारली, तर राम धावून येईल.. याविषयी समर्थांच्या मनात नि:संदिग्धता आहे. पूर्ण आत्मविश्वास आहे.
दीनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ।
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
समर्थांनी रामासाठी लिहिलेलं ‘कोदंडधारी’ विशेषण सहेतूक आहे. कोदंडधारी रामाची उपासनाही सहेतूक आहे. राष्ट्रावर आलेल्या संकटांना परतवून लावण्याची ताकद त्याच्या बाहूत आहे. त्याच्या धनुष्यात आहे. हे सांगताना समर्थांना दैववाद नाही, तर प्रयत्नवाद अधोरेखित करायचा आहे.
यत्न तो देव जाणावा
या ओळीला तर सुभाषिताचं मोल प्राप्त झालं आहे. समर्थ म्हणतात, ‘देव कशात आहे? मूर्तीत? पूजेत? तीर्थक्षेत्रात? तिथे तर तो आहेच! पण त्यासोबत आजच्या काळाचा विचार केला, तर तो तुमच्या-माझ्या प्रयत्नात निश्चितपणे सामावलेला आहे. ‘उत्तिष्ठत, जाग्रत...’ म्हणजे उठा, जागे व्हा. पलायनवाद सोडा आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्नांची शिकस्त करा. असे कार्य करणे हेच रामकार्य आहे.’
समर्थ रामदास अन्य संतांपेक्षा वेगळे होते. संतत्वाच्या थोर परंपरेत असूनही राजधर्म, क्षात्रधर्म, समाजकारण, राजकारण यांच्या हाका त्यांना ऐकू येत होत्या. म्हणून त्यांचा राम हा पारंपरिक भक्तीपरंपरेतला राम तर होताच; पण त्यासोबत धर्मसंस्थापक, आदर्श राजा, पराक्रमी राष्ट्रभक्त आणि कल्याणकारी महापुरुष होता. असा राम महाराष्ट्राच्या समाजमनावर समर्थांनी अत्यंत जाणीवपूर्वक बिंबवला.
याच काळात शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राला रामाप्रमाणे प्रजाहितदक्ष नेतृत्व लाभलं. ‘जाणता राजा’ लाभला आणि या सर्वांची परिणिती स्वातंत्र्यात झाली. ‘शिवसमर्थ’ काळात महाराष्ट्रात पुन्हा ‘रामराज्य’ अवतरले.
- डॉ. अपर्णा बेडेकर
गिरगाव, मुंबई