नृत्य एक डौलदार करिअर

शिक्षण विवेक    29-Apr-2021
Total Views |

nrutya ek douldar carieer 
 
स्वामी विवेकानंद जेव्हा छोटे नरेंद्र दत्त होते; तेव्हाची गोष्ट आहे ही! त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल?’ नरेंद्रने पाहिले तर दाराबाहेर एक बग्गी चालवणारा बग्गीवान उभा होता. त्याची ऐट, त्याचे कपडे पाहून बालसुलभतेने नरेंद्र उद्गारला, ‘मला ना तसं बग्गीवान व्हायला आवडेल.’ त्यांचा हा संवाद ऐकत नरेंद्रची आई तिथेच उभी होती. तिने पटकन नरेंद्रचे लक्ष एका तसबिरीकडे वेधले आणि त्याला म्हणाली, ‘तुला बग्गीवान व्हायचे असेल ना, तर असा हो!’ ती तसबीर होती अर्जुनाचा रथ चालवणार्या भगवान श्रीकृृष्णाची! नरेंद्रची आई त्याला म्हणाली, ‘असा बग्गीवान हो आणि सार्या देशाचेे सारथ्य कर. आपल्या भारताचे नेेतृत्व कर. त्याला परत पूर्वीचे वैभव प्राप्त करून दे.’’ असे संस्कार मिळाले, म्हणूनच लहानगा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद बनून जगाला मार्गदर्शन करू शकला.
मुलांनो, तुम्हाला आवडेल तसे करिअर तुम्ही जरूर निवडा. स्वत:चा कल पाहून करिअरची निवड करायची हीच खरी वेळ आहे! जे काही ठरवाल, त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला असे ज्ञान देऊ शकतील, असे मार्गदर्शक शोधून काढा. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा, प्रचंड मेहनत करा, त्यात सातत्य ठेवा आणि स्वत: आनंद घेऊन आपल्या ज्ञानाचा आपल्या देशाला कसा उपयोग होईल, असा सतत विचार करा. त्या बरहुकूम कृती करा.
आता मी तुम्हाला माझा नृत्यप्रवास सांगणार आहे. मी कशी सुरुवात केली आणि कशारीतीने मला यश मिळत गेले; त्याची मनोरंजक माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुमच्यापैकी कोणाला या करिअरचा मोह पडला; तर माझ्या या लेखनप्रपंचाचे सार्थक होईल.
लहानपणीच, म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षी माझ्या नृत्याचा कल ओळखून, ज्या काळात आमच्या बोरिवलीत फक्त एकच नृत्याचा क्लास होता, त्या काळात माझ्या आई-वडिलांनी मला भरतनाट्यम् नृत्यवर्गात गुरू श्रीसत्यनारायणन् यांच्याकडे पाठवले. शालेय स्पर्धांत मी नेहमीच भाग घेतला आणि आंतरशालेय प्रथम बक्षिसे मिळवली. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि स्वत:च्या क्षमतांची जाणीव झाली. बी.ए.ला पूर्ण इंग्रजी वाङ्मय घेऊन प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन, माझे नृत्यकलाकार व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भरतनाट्यम्मध्ये बी.एल.ए. करण्यासाठी जुहूच्या नालंदा नृत्यकला महाविद्यालयात प्रवेश घेेतला. आवडीचा विषय असल्यामुळे अथक कष्ट आणि चिकाटी यांमुळे विद्यापीठात प्रथम आले. या यशासाठी मला मुंबई विद्यापीठाचा विशेष पुरस्कार आणि सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर योग आणि भरतनाट्यम्मध्ये मी ‘संगीताचार्य’ ही पदवी मिळवली. देश-विदेशात असंख्य कार्यक्रम केले. भारत सरकारकडून मला राष्ट्रीय शिष्यवृत्ती (नॅशनल फेलेशीप)सुद्धा मिळाली आहे. स्वत:ची मोठी नृत्य अकादमी स्थापन केली.
मुलांनो, यात मला माझे काही मोठेपण सांगायचे नसून, आपल्या ध्येयाची निश्चिती करून, योग्य मार्गदर्शन आणि अथक परिश्रम केले; तर यश निश्चित मिळते, असेच मला तुम्हाला ठासून सांगायचे आहे. नृत्यकलेला आता निश्चितच खूप चांगले दिवस आलेले आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा कोर्सेस), मुंबई, भारती, पुणे, तसेच खैरागड आणि कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथे नृत्याचे पदवी अभ्यासक्रम (डिग्री कोर्सेस) उपलब्ध आहेत. सरकारदरबारी नृत्यासाठी शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. अनेक सर्वोच्च सन्मान आता नृत्य कलाकारांसाठीसुद्धा उपलब्ध आहेत. भारत सकरकारच्या आयसीसीआरतर्फे परदेशातदेखील सन्मानपूर्वक दौरे आयोजित केले जातात. मी स्वत:च एक पूर्ण वेळ नृत्य कलाकार असल्यामुळे मी हे निश्चित सांगू शकते की, केवळ कार्यक्रमांवरसुद्धा एक नृत्य कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतो. शिवाय नृत्य प्रशिक्षक, नृत्य समीक्षक, नृत्य संरचनाकार, नृत्य लेखक अशा अनेक क्षेत्रांमध्ये नर्तकही आपली वर्णी लावू शकतात; आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, याचाही विचार करा. कारण नृत्य असते - एक दिमाखदार सादरीकरण, मनोरंजनातून जनजागरण, तन-मन-आत्म्याचे सर्मपण! कवीची कविता साक्षात जिवंत होऊन आपल्या हावभावांद्वारे रंगमंचाच्या कॅनव्हासवर वेगवेगळे आकृतिबंध बनवते, त्यात भावनांचे रंग भरते, त्यातील लय प्रेक्षकांनाही तरल सुखाचा अमृतानुभव देते. नृत्य ही एक अशी कला आहे की, जिच्यामध्ये कलाकार, कलेचे माध्यम आणि अंतिम कलाकृती ही एकच असते. एवढेच नाही; तर त्या कलाकृतीची साक्षीही ती नर्तिकाच असते. ‘शिवं भूत्वा शिवं यजेत्’ - शिव होऊनच शिवाची पूजा करावी; हा संदेश साक्षात आचरणात आणणारी ही कला कलाकाराला अध्यात्माच्या, अलौकिकतेच्या चरणसीमेपर्यंत पोहोचवते.
त्यामुळे माझ्या प्रिय छोट्या दोस्तांनो, तुम्हाला जर नृत्यकला मनापासून आवडत असेल; तर जरूर योग्य मार्गदर्शक शोधून या कलेला स्वत: वाहून घ्या! ही अलौकिक कला तुम्हाला निराश करणार नाही. अशी एक नृत्यसाधक म्हणून मला निश्चित आशा वाटते. त्यासाठी मनापासून शुभेच्छा!
- डॉ. स्वाती दैठणकर