हाय,हॅलो करत मोबाईल वरचा संवाद कधी एक तासाचा, दोन तासांचा झाला ते कळलेही नाही. तंत्रज्ञानाने प्रगती केली खरी पण मानव तंत्रमानव’ झाला. बदल ही काळाची गरज मानली जाते.परंतु त्यातील फायदे तोटे विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते. मुलं जन्म घेण्यापूर्वीच त्यांचे नाते या मोबाईलशी जोडले जाते. त्यांच्या प्रत्येक क्षणांची छायाचित्रे टिपली जातात. त्याची मोबाईल मैत्रीची सुरूवात येथूनच होते. कारण सध्याचे पालक कामामध्ये व्यग्र आहेत. विभक्त कुटुंबामुळे आजी आजोबा लांब असतात. धावपळ आणि काम यातून पालक आपल्या पाल्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे हा निर्जीव मित्र मुलांच्या संपर्कात आणला गेला. त्यातही पालकांना अभिमान वाटतो. घरातील मोठी मंडळी सहजगत्या सांगताना दिसतात. आम्हाला मोबाईल मधले काहीच कळत नाही. पण आमचा दोन वर्षाचा नीरज त्याला मात्र सर्व समजतं हो! आई सहज म्हणते माझे काम असेल तेव्हाच मी त्याला मोबाईल हातामध्ये देते हो! पण किती वेळ याचा संदर्भ सांगता येत नाही.
मोठ्या मुलांची स्थिती फार वेगळी आहे असे नाही. कोणत्याही कार्यक्रमाची ठिकाणे घ्या. मुलाखतीची ठिकाणे घ्या. बस स्टॉप, रेल्वेस्टेशन असे कोणतेही ठिकाण घ्या. एवढेच काय स्नेहसंमेलन घ्या. सर्वजण एकमेकांना कितीतरी दिवसांनी भेटतात, पण प्रत्यक्षात संवाद किती होतो? प्रत्येकजण क्षणचित्र टिपण्यासाठी व्यग्र असतो. यातील कोणतीच गोष्ट वाईट नाही. कारण काळ बदलला आणि काळाप्रमाणे जो चालतो तोच पुढे जातो. थांबला तो संपला’.
वैश्विक संकल्पनेमुळे सर्व जग जवळ आले. विचारांची देवाण घेवाण झाली. माहितीचा प्रसार झाला. मोबाईलवर क्लिक करताच माहिती उपलब्ध झाली पण त्यातील महत्त्वाचे तेवढेच जाणून घेणे व प्रगती करणे क्रमप्राप्तच झाले. आपण अवलंबून राहणे आणि स्वतः प्रयत्न करणे यातला फरक आपण विसरलो. प्रयत्न करताना येणारे अनुभव, संवाद विसरलो.
माझ्या अनुभवास आलेला प्रसंग असा, माझी मैत्रीण एक दिवस माझ्याकडे आली. ती मला बोलता बोलता सहज म्हणाली, माझ्याकडे येणार्या कामवाल्या मावशी केरफरशीचे 1500रु. घेतात आणि सुट्टीचे पैसे कापू देत नाहीत. लगेच कुरकुर करतात. पण मला कुठे गावाला किंवा बाहेर जायचे असेल तर मला त्यांना निरोप देता येत नाही. कारण त्यांच्याकडे मोबाईल नाही. एवढे पैसे कमावतात तर एक मोबाईल घ्यायला काय जातंय! तेव्हा मी विचार केला की त्या कामवाल्या मावशींनी मोबाईल घेतल्याने त्यांची कामे सोपी होतील, अडचणी कमी होतील पण महिन्याचा रिचार्ज करणे त्यांना परवडणार आहे का? कदाचित अशी कितीतरी जणांची अडचण असू शकते.
मोबाईलचे फायदे आहेत तसे तोटेही विचारत घ्यावयास हवेत, त्यापासून लहान बाळाला होणारे त्रास, आबालवृद्धांच्या सेल्फी घेताना घडणारे अपघात किंवा मोबाईलमुळे एकूणच दैनंदिन जीवनावर आणि वेळापत्रकावर होणारा परिणाम यांपासून सावध राहणे हे आपले पहिले काम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलशिवाय सभोवतालच्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधावा. संवाद हा देशाच्या भवितव्यासाठी, एक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी गरजेचा आहे. हा संवाद पाल्य पालकांचा, बहिण भावाचा, मित्र मैत्रिणींचा,शेजार्यांचा व्हायला हवा, ही काळाची नितांत गरज आहे.
मोबाईलमुळे होणारे फायदे - तोटे लक्षात घेता, योग्य ठिकाणी योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. प्रगतीसाठी, एकाग्रतेसाठी, मानसिकतेसाठी, भावनिकता जपण्यासाठी स्थिरता प्राप्त करण्यासाठी मोबाईलचा वापर हा स्वत:वर स्वत:चे काही निर्बंध घालून करावा. नात्याचे, मित्रपरिवाराचे ऋणानुबंध टिकण्यासाठी, सजीवांशी संवाद होणे ही सुद्धा काळाची गरजच आहे.
सुषमा जयंता बाजारे, सहाय्यक शिक्षिका
डे.ए.सो. दातार शेंदुरे इंग्लिश मिडीयम