सुटीत करायच्या गमती-जमती

शिक्षण विवेक    07-Apr-2021
Total Views |
things to do in holidays_ 
 
• सुटीतल्या एका रविवारी घरातल्या सगळ्यांनी ‘आपले कपडे आपण धुवावयाचे’ असं ठरवा. कपडे धुण्याचे तंत्र आणि मंत्र शिकताना पाण्यात मस्त दंगा करा.
• प्रत्येक फळ कापण्याची पध्दत वेगळी असते आणि ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. या सुटीत आंबा, कलिंगड, पपनस, टरबूज, पपई, फणस, अननस अशी फळे आवर्जून कापा आणि कापण्यातली गोडी अनुभवा.
• गाजर, काकडी, मुळा, टॉमेटो, बीट किंवा कोबी यांची कोशिंबीर करणं तुम्हाला सहज जमू शकतं. आठवड्यातून दोनदा अवश्य करा. घरातली सगळी जणं आनंदाने खातील.
• जुन्या निमंत्रण पत्रिकांचा कल्पकपणे वापर करुन त्यापासून सुंदर बुकमार्कस् तयार करा.
• तुम्ही मुलांनी सुटी लागल्यापासून रोज एक पोस्टकार्ड लिहायचेच आहे. आपल्या मित्रांना, सर्व नातेवाईकांना, शिक्षणविवेकला, आवडत्या लेखक/लेखिकेला, संपादकांना, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना किंवा तुमच्या बाजूलाच राहणाऱ्या मित्र मैत्रिणींनांसुध्दा. आम्ही पण तुमच्या पत्राची वाट पाहात आहोत बरं.
• निरनिराळी फळे, फुले, भाज्या व कंदमुळे यापासून आपणास वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करता येतात. उदा. आंबा, बीट, कोथिंबीर, गाजर, पालक, हळद, पळसाची फुले, जांभूळ, चिंच, शेवंतीची फुले इ. फक्त नैसर्गिक रंग वापरून तुम्हाला सुंदर चित्र रंगवता येतील. (यातील काही रंगीत चित्रे चविष्ट पण असतील)
• घरातल्या टेलिफोन जवळ एका रफ वहीची गरज असते. पटकन नंबर टिपून ठेवायला तिचा उपयोग होतो. तुमच्या जुन्या वहीतील कोरे कागद फाडून त्यापासून मस्त रफ वही तयार करा.
• गावातील प्रत्येक दुकानाची पाटी ही वेगळी असते. म्हणजे त्यावरील अक्षरलेखन, रंगसंगती, त्यावरील चित्रे यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील जाहिराती, लेखांची शिर्षके पण पाहा. विशिष्ट वस्तूंचा किंवा गोष्टींचा अर्थ शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुलेखन. तुम्ही एक सुलेखन वही तयार करा. त्या वहीत प्राणी, पक्षी, फळे, फुले किंवा निरनिराळ्या वस्तू यांची नावे वेगवेगळ्या पध्दतीने लिहावीत. म्हणजेच ‘जिराफ’ ज्या प्रकारे लिहिले असेल त्यापेक्षा ‘नाग’ वेगळ्याप्रकारे लिहिलेले असेल.
• सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही एक चित्र काढा/आकृती काढा/ठिपक्यांची रांगोळी काढा व त्यात रंग न भरता त्यार टाकाऊ वस्तूंचा उपयोग करा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, गवत, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, शेंगांची टरफले, प्लास्टिकचे तुकडे, चहाचा चोथा इ.
सुटीत या गोष्टी तर कराच पण आणखी तुम्हाला सुचतील त्या-त्या पण करा. गमती जमती करताना मजा करा. धमाल करा. मस्ती करा. मस्त मजा करत खूप नवीन काही शोधा.
तुमचे नवीन शोध, तुमची मजा इतकंच काय तुमची फजिती पण आम्हाला कळवा. निवडक पत्रे आम्ही नक्की प्रकाशित करू. तुमच्या ‘मस्त मजा’ पत्रांची आम्ही वाट पाहतोय. आपका धम्माल समय शुरू होता है अब..
- राजीव तांबे
020-25392655