आरोग्यम् धन संपदा

शिक्षण विवेक    09-Apr-2021
Total Views |

Arogyam dhansampada_1&nbs 
 
आरोग्यम् धन संपदा या सुविचारातच आपणास आरोग्याचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे समजते. ज्याप्रमाणे धन अर्थातच पैसे यास मनुष्य अतिशय महत्त्व देतो, त्यापेक्षा जास्त महत्त्व आरोग्यास आहे. कारण आरोग्य चांगले असेल तरच मनुष्य सुखी जीवनाचा उपभोग घेऊ शकतो.
तसेच तुम्ही विद्यार्थी आरोग्य चांगले असेल तरच अभ्यासात प्रगती करू शकतात. समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याने भरपूर अभ्यास केला आणि नेमका परीक्षेच्या वेळी आजारी पडला आणि परीक्षा देऊ शकला नाही तर त्याची संपूर्ण वर्षभराची मेहनत वाया जाते. म्हणून आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे.
यासाठी आपणास सर्वप्रथम आरोग्य म्हणजे काय? आणि ते कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते? हे माहिती असणे अतिशय जरुरीचे आहे.
आरोग्य हा शब्द नेहमी आपल्या कानावर पडत असतो. पण याचा अर्थ काय? तर आरोग्य म्हणजे आपले शरीर व मन दोन्ही उत्तम अवस्थेत असणे होय. म्हणजेच काय तर आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाची वेदना किंवा तक्रार नसणे. अर्थातच सर्व अवयव सुदृढ असणे होय. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे, ‘आरोग्य म्हणेज केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था होय.’
या व्याख्येत आपण निरोगी असण्याबरोबर आपण आपल्या समाजात गुण्या-गोविंदाने, आनंदाने सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडले पाहिजे. म्हणजेच त्यास उत्तम आरोग्यवान माणूस म्हणता येईल. उत्तम आरोग्यवान व्यक्ति होण्यासाठी आपणास आरोग्य ज्या गोष्टींवर अवलंबून असते, त्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित पालन केले पाहिजे. आरोग्याचे घटक-आहार, विहार, स्वच्छता, व्यायाम, योग, ध्यान-धारणा, खेळ, विश्रांती, झोप व मनोरंजन होय. त्यांची थोडक्यात माहिती समजावून घेऊ.
आहार आपला सकस, चौरस व संतुलित असावा. आपल्या शरीराच्या वाढीसाठी निरनिराळे घटक आवश्यक असतात. ते आपणास या संतुलित चौरस आहारातून मिळतात.
आपल्या रोजच्या आहारात वरण-भात, भाजी-पोळी, आमटी, चटणी, कोशिंबीर व फळे यांचा समावेश असावा.
विहार म्हणजे आपल्या शरीराचा शारीरिक व मानसिक थकवा घालवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात थोडासा फेरफटका मारावा, जेणेकरून आपणास ताजेतवाने व उत्साही वाटेल.
तसेच, आपल्या उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसराची स्वच्छता देखील राखली पाहिजे. अन्यथा वेगवेगळ्या जंतूंचा शिरकाव आपल्या शरीरात होईल व आपले आरोग्य बिघडेल.
त्याचबरोबर विविध प्रकारचे बैठे व मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीर वाढीसाठी मदत होते. उत्साह-जोश वाढतो. रोजच्या रोज ध्यान-धारणा, योग व व्यायाम झेपेल तसे करावेत. त्यामुळे आपणास मानसिक शांती मिळते. तसेच जीवनातील अडचणी अडथळे यावर मात करण्यास मदत होते. सामाजिक बांधिलकी जोपासण्यास वाव मिळतो.
शरीरास आवश्यक असलेल्या घटकांमध्ये झोप व विश्रांती देखील महत्त्वपूर्ण आहे. Change of work is rest कामात बदल म्हणजेच विश्रांती होय. यासाठी विविध छंद जोपासले पाहिजेत, आणि झोप साधारणतः 6 ते 7 तास ही आवश्यकच आहे. यासाठी जास्त वेळ टीव्ही पाहणे, मोबाईल हाताळणे शक्यतोवर टाळावेच. लहान मुलांनी तर यावर वेळेचे बंधन पाळूनच मनोरंजनापुरते वापरावे.
वरील सर्व घटकांचे काटेकोरपणे आपण पालन केले, तसे वागलो तर आपण समाजचे सुजाण, सुदृढ नागरिक होऊ आणि 7 एप्रिल हा जागतिक आरोग्यदिन खर्या अर्थाने साजरा होईल.
- सुरेखा सतिश भामरे, उपशिक्षिका
एच.ए. स्कूल, पिंपरी