‘अभ्यासा’च्या सवयीचे काय ?

शिक्षण विवेक    13-May-2021
Total Views |

abhyasachya savayiche kay 
 
कोणत्याही नव्या गोष्टीचे रूपांतर सवयीमध्ये होण्यासाठी 21-22 दिवस लागतात, असे म्हटले जाते. कोरोना काळात प्रत्येक वयोगटातील माणसांना त्यांच्या अनेक सवयी बदलाव्या लागल्या. काहींना ते सहजसाध्य झाले तर, काहींना मात्र अद्यापही जुळवून घेणे अवघड ठरत आहे. रोज बॅग उचलून कामावर जाणार्‍या नोकरदारांसाठी अचानक घरी बसणे सुरुवातीला जिकिरीचे ठरले. त्यात कौटुंबिक वातावरणाची सवय करून घेण्यापासून तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक सक्षम होण्यापर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश झाला. कोरोना काळामुळे झालेल्या विविध बदलांचा मोठा फटका शिक्षणक्षेत्राला झाला. यावर ऑनलाइन शाळा, पीपीटी, शिक्षकांनी अध्यापनाचे व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणे असे विविध पर्याय शोधले गेले. ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या, विद्यार्थ्यांनी विविध अडचणींचा सामना करून त्या दिल्या आणि त्यानुसार मूल्यांकनही झालं.
तांत्रिक प्रक्रियेनुसार इतर वर्षांसारखं हेही वर्ष पार पडलं. (काहींनी शब्दशः ढकललं) मात्र, अभ्यास किती झाला, विद्यार्थ्यांना किती कळालं, त्यांनी ते किती आत्मसात केलं याबाबत वेळोवेळी पालक, शिक्षक यांच्यापासून शिक्षणतज्ज्ञांपर्यंत विविध घटकांनी आपले मत व्यक्त केले. ऑनलाइन शाळा आणि परीक्षा याबाबतची मत-मतांतरे तूर्तास बाजूला ठेवली, तरी या वर्षभरात आणि येणार्‍या काळात विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय मोडेल का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. शाळेतील वातावरण, रोजचा गृहपाठ, शिक्षकांकडून दिले जाणारे लक्ष आणि होणारी विचाणा, ठरावीक अंतराने घेतल्या जाणार्‍या परीक्षा यामुळे मुले अभ्यासाच्या प्रक्रियेत गुंतलेली होती. त्यांना अभ्यासाची सवय लागली होती. अगदी रोजच्या गृहपाठापुरते का होईना, पण वह्या-पुस्तके उघडली जात होती.
आता तसं होताना दिसत नाही. साधारणतः परीक्षा जवळ आली की, तात्पुरता अभ्यास करण्याकडे अनेक मुलांचा कल असतो. हंगामी अभ्यास करून परीक्षा देणार्‍या विद्यार्थांची संख्या मोठी आहे. यात परीक्षेच्या भीतीने का होईना मात्र, मुले वाचतात. शिकतात. अभ्यास करतात. ऑनलाइन परीक्षांमुळे परीक्षा देण्याची सवय कायम राहिली असली, तरी अभ्यास झालाच आहे, असे ठामपणे म्हणता येत नाही. कारण परीक्षांचे स्वरूप बदलले. त्यात विद्यार्थ्यांना नववीपर्यंत सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय, ऑनलाइनमुळे काही शाळांनी स्वीकारलेला बहुपर्यायी परीक्षेचा मार्ग, तांत्रिक अडचणी, कॉपी करण्यास असलेला वाव यामुळे अनेक गोष्टींवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
सद्यस्थितीत अपरिहार्यता म्हणून ऑनलाइन पर्यायाचा स्वीकार केला, तरी त्याने मुलांच्या अभ्यासाच्या सवयीचे काय, असा प्रश्‍न उरतोच. ऑनलाइन तासामध्ये अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना कळतातच असे नाही. निवडक विद्यार्थी सोडल्यास अनेक जण तास सुरू असताना दुसरीकडे गेम खेळत असतात, व्हिडिओ बंद करून घरात लोळून किंवा काही तरी टाइमपास करीत शिक्षकांचे बोलणे ऐकत असतात. अनेक पालकांनी अशा तक्रारी केल्या आहेत. अभ्यासाची सवय असणं म्हणजे, रोज प्रत्येक विषयाचा ठरावीक भाग रोज वाचणं, उजळणी करणं, गृहपाठ पूर्ण करणं, पाठांतर करणं, इत्यादी. अनेक विद्यार्थी शिक्षकांच्या भीतीने का होईना मात्र, हा सराव करत असतात. शाळांमध्ये रोज अभ्यास तपासून घेतला जातो. पूर्ण नसेल, तर पालकांसाठी काही शेरा लिहून दिलेला असतो. पालक तो पाहतात. ही संपूर्ण प्रक्रिया थांबली. यापैकी काही भाग ऑनलाइनच्या माध्यमातून जसा जमेल तसा घेतला जातो आहे. मात्र, त्यात सातत्य किती, त्याची परिणामकारकता किती, याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. मोठ्या शहरातील काही शाळांमध्ये जाणार्‍या मुलांकडे आर्थिक सुबत्ता असते. भौतिक सुविधा असतात. पालकही सजग असतात. त्यामुळे ते ऑनलाइनवरही उत्तम काम करू शकतात. मात्र, छोट्या शहरात, गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांवरची परिस्थिती वेगळी आहे. तेथील शिक्षकांचा संघर्षही वेगळा आहे. अनेक शहरी पालकांवरव वर्क फ्रॉम होमचा ताण असल्याने ते दर तासाला मुलांशेजारी बसू शकतीलच असे नाही. या गोंधळात परीक्षा जवळ आल्यावर तात्पुरता अभ्यास करून पास होऊन वर्ष ढकलण्याचा प्रकार होत नसल्यास नवलंच.
मानसी वैशंपायन यांनी ‘क्षण क्षण शिक्षण’ या आपल्या पुस्तकात असं म्हटलं आहे, की शिक्षणातून तीन ‘एच’चा विकास होणे गरजेचे आहे. ते तीन एच म्हणजे हेड, हार्ट आणि हॅन्ड. हाताने कृती करणे, मेंदूने विचार करणे आणि अनुभवातून मनःशक्ती वाढवणे असा त्या तीन ‘एच’चा अर्थ होतो. त्यामुळे आता वर्ष पुढे जाणं, या वर्गातून पुढच्या वर्गात गेला आहे, असा शेरा प्रगतीपुस्तकावर येणं यातून विद्यार्थ्यांना काय मिळेल, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. एकीकडे अभ्यासाची सवय असलेल्या, विविध गोष्टी जाणून घेण्याची तयारी दाखवणार्‍या, शिक्षकांना प्रश्‍न विचारणार्‍या मुलांना ते वातावरण आता मिळत नाही, ही समस्या आहे, तर दुसरीकडे मुळातच अभ्यासाची फारशी गोडी नसलेल्यांना आता नवनवीन कारणे मिळाली आहेत. यात पालकांची चिंता वाढणं आणि शिक्षकांची इकडे आड, तिकडे विहीर होणं नित्याचं झालं आहे.
यावर ठोस उपाय हाच की, केवळ ‘शाळा-परीक्षा-पुढची इयत्ता’ याच चक्रापुरता अभ्यास मर्यादित न राहता त्याची आवड विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी. तीन-चार तासांची ऑनलाइन शाळा संपल्यावर पालकांनी विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने शिकवावे. यात कार्यानुभव, वाचन, लेखन, संवाद, विविध कार्यशाळा, प्रश्‍नमंजुषा अशा अनेक पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो. पालकांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूरक असे साहित्य उपलब्ध करून देणं आणि ज्ञान व रंजनाची सांगड घालणं आवश्यक आहे. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर केवळ पुढच्या वर्गात जाणे एवढेच ध्येय असून उपयोग नाही. उच्च शिक्षणासाठी विविध विषयांतील ‘कन्सेप्ट’ वेळीच ‘क्लिअर’ होणं आवश्यक ठरतं. ऑनलाइन शिकवण्यातून तसे न झाल्यास त्याचा त्रास मुलांना पुढे जाणवू शकतो. अभ्यासाची सवय मोडल्यास पुन्हा शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना ते जड जाणार, हे निश्‍चित. यासाठी रोजच्या अभ्यासाची सवय टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ‘अभ्यासे प्रकट व्हावे,’ असं म्हटलं आहे. सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय आणि कोरोनाच्या स्थितीमुळे आता विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात ‘प्रकट’ होत असले, तरी त्यांच्या अभ्यासाचं काय आणि अभ्यासाच्या सवयीचं काय, याचा आढावा घेणे हा आता कळीचा मुद्दा ठरणार आहे.
- मयूर भावे