विश्वासाचं नातं

शिक्षण विवेक    08-May-2021
Total Views |

vishwasacha naata_1  
आईचा पदर धरून जेव्हा मूल शाळेत प्रवेश करतं, तेव्हा ती विश्वासानं आपलं मूल शाळेतील ताईंच्या सुपूर्त करते आणि अशा वेळेस ते मूल माणसाळलेलं नसेल तर खूप पंचाईत. मग त्या शाळेतील ताईंनाच आपल्या कौशाल्याचा वापर करून मुलाला शांत करावे लागते. शाळा म्हणजे कुटुंबापासून दूर जाण्याचे समाजातील पहिलं स्थान.
घरी हे मूल केंद्रस्थानी असते कारण घरी एक किंवा दोन मुलेच असतात. पण शाळेत आल्यावर समवयस्क खूप मुलांबरोबर त्याला राहायचे असते. खेळायचे असते. प्रत्येक घरातील मुलांचे संस्कार, राहणीमान, वळण हे वेगवेगळे असते. शिक्षिका त्या मुलाची वागणूक लगेच कळते. शिक्षिका प्रत्येक मुलाचे परिक्षण करून त्याप्रमाणे चांगले संस्कार करते व मुख्यत्त्वे आजूबाजूलाा पाहून मुलसुद्धा छान शिकते. अशा वेळेस पालकांची भूमिका स्पष्ट व पारदर्शीपणे असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलाच्या जडणघडणीस पोषक वातावरण हे शाळेत असते व मूल चांगले घडते.
प्रत्येक मुलामध्ये अहंभाव असतो तो अगदी सात-आठ महिन्यांचा असल्यापासून तीन ते चार वर्षांचा असताना तो वाढीस लागतो. प्रत्येक गोष्ट ही मलाच पहिली हवी. खेळ, खाऊ काही असो ते मलाच पहिलं पाहिजे. अशा वेळेस शिक्षिका सवय लावते की, जरा थांबावं दुसर्याचे खेळून झाले की तुला मिळणार, सगळ्यांनी मिळून खेळावे.
या सर्व गोष्टी पाहून पालक अचंबित होतात. हे कसं काय शक्य झाले म्हणून पालकांनी, शिक्षकांशी मुलाच्या प्रगतीसाठी संवाद साधणे महत्त्वाचे त्यामुळे आपोआप मुलाचा विकास हा चांगला होतो.
बऱ्याच पालकांनी मुलांना लेबल दिलेले असते बावळट, वेडा, एवढं जमत नाही. पण शाळेत आपल्या ताई आपल्याला कधीच असं म्हणत नाही. व्यवस्थित नावानं हाक मारतात. आपल्या प्रत्येक कृतीला दाद देतात. त्यामुळे मुलाचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. खेळाच्या साधनांवर उदा., झोपाळा, घसरगुंडी, बाहुली घर यात मुल खेळताना त्याचा अविर्भाव इतर मैत्रिणींशी गप्पा मारण्याची पद्धत यावरून शिक्षिका परिक्षण करते. जे मूल अवघड घसरगुंडीवर चढण्यास घाबरते. ते ताईंनी आत्मविश्वास निर्माण केल्यावर छान चढते-उतरते व आपण हे उत्तम केली ही भावना निर्माण झाली की मुलाची भीती आपोआप कमी होते.
अती काळजीवाहू पालक असले की मूल प्रत्येक कृती करताना घाबरते आपण पडू की काय, पण शाळेतील इतर मुले सहजपणे करताना पाहून मूल ते करण्याचा प्रयत्न करते. शेवटी मूल हे टिपकागदासारखे असते. वाईट गोष्ट पटकल आत्मसाद केली जाते.
बालवयातील शालेय जीवनात खूप गोष्टी मुलांसाठी पोषक असतात; वर्त्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्नेहसंमेलन यातून मूल घडत जाते व पालकांनापण समजते की आपल्या मुलात किती सूप्तगुण आहे आणि या सूप्तगुणांना वाव मिळाला की मूल घडत जाते. बक्षिसरूपी प्रोत्साहन मिळाले तर दुधात साखरच. मग ते मूल फुलते परंतु त्याचे पाय जमिनीवरच रहावेत यासाठी शिक्षक व पालक यांचे काटेकोर लक्ष असणे महत्त्वाचे आहे. मूल केंद्रबिंदू ठेवून पालक व शिक्षकांनी संवाद साधणे मुलासाठी वेळ देणे, हे फार महत्त्वाचे आहे.
- वर्षा आनंद लोखंडे
शि.प्र.मंडळी मुलींची शिशुशाळा