वदनि कवळ घेता

शिक्षण विवेक    02-Jun-2021
Total Views |

vadani kaval gheta_1  
 
वदनि कवळ घेता...
वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे।
जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥
आजही आपल्याला अनेक शाळांमधून ऐकावयास मिळते. आपण विचार केला तर ही प्रार्थना अर्थपूर्ण आहे. जेवण जेवणे हे एक काम किंवा नित्यकर्म नसून ते यज्ञकर्म आहे. आपण समजून घेतले तर ते आपल्याच प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
आजकाल आपल्या जीवन पद्धतीमध्ये खूप बदल झाले. पर्यायाने आपल्या जेवायच्या सवयीमध्येसुद्धा. व्यायामाचा अभाव, अन्नातला पौष्टिकपणा कमी, वेळेअभावी पौष्टिक अन्न न खाता नुसते पोट भरायचे यामुळे लहान वयात अनेक दुर्धर आजारांना आपण बळी पडतो. डॉक्टरांची फी, औषधांवर भरमसाठ खर्च, त्या औषधांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम, खाण्यापिण्यावर येणारे निर्बंध यामुळे होणारा मनस्ताप, चिडचिड हे सर्व टाळण्यासाठी आपण आपल्या जेवायच्या सवयी बदलल्या तर किती फायद्याचे ठरेल. विशेषत: लहान वयातच मुलांना या सवयी लावल्या तर त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे पाऊल ठरेल.
1. ताजे पौष्टिक अन्न: रोज घरी ताजे शिजवलेले वेगवेगळे अन्नपदार्थ वेळच्या वेळी मुलांना खायला दिल्यास सर्व पोषकमूल्ये, जीवनसत्त्वे मुलांना मिळतील व त्यांची निकोप वाढ होण्यास मदत होईल. तसेच मुलांनाही तसे खाण्याची शिस्त लागेल.
2. फळे, कोशिंबिरीचा समावेश : आपल्या जेवणात वेगवेगळ्या कोशिंबीरीचा समावेश असावा व त्या खाण्यास मुलांना प्रवृत्त करावे. फळांचे रस काढून पिण्याऐवजी फळांच्या फोडी चावून खाण्यास उद्युक्त करावे. तसेच कृत्रिम रंग, खूप साखर असलेले, रासायनिक पदार्थांचा अंश असलेले पदार्थ, सरबते, शीतपेय टाळावीत.
3. पदार्थ चावून खाणे : छोटे छोटे घास घेऊन ते सावकाश चावून चावून खाण्याची सवय ही केव्हाही चांगलीच. त्यामुळे अन्नपचन चांगले होण्यास मदत होते.
4. आनंदी वृत्ती : जेवताना आनंदी वृत्तीने जेवावे. त्यामुळे वेगवेगळे पाचक रस खालेल्ल्या अन्नात मिसळून ते पचनास हलके जातात. तसेच जेवताना जमिनीवर मांडी घालून जेवल्यास त्याचे फायदेही बरेच आहेत. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे जेवण आपल्याला हवे तेवढेच पुरेसे जाते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका टळतो.
अशा चांगल्या जेवणाच्या सवयी मुलांना लहान वयातच लागल्यास मुले सुदृढ होतील. त्यामुळे भावी आयुष्यात नवीन-नवीन अभ्यास, वेगवेगळ्या कला सहज शिकण्यास शरीराची साथ राहील. म्हणूनच म्हणतात ना, ‘आरोग्यम् धनसंपदा.’
मंजिरी देशपांडे
डी.ई.एस. प्री-प्रायमरी स्कूल