धनधान्य भरल्या घरी

शिक्षण विवेक    28-Jun-2021
Total Views |

dhanadhanya bharalya ghar 
 
तांदळाचा दाणा म्हणे, वेच मला नीट
गोल गोल चण्याची, लाव छोटी तीट
पांढरा स्वच्छ साबुदाणा, त्याचा ताठ बाणा
उडदाच्या डाळीचा, मोडून पडतो कणा
मूग आणि मटकीची, अशी जमली गट्टी
शेंगदाण्याची त्यांनी, लगेच केली सुट्टी
कणिक आणि मैदा, त्यांचा स्वभावच साधा
हळद आणि तीखटाचा, रंग घेतात अर्धा
तीळ-जिरं-मोहरी, तड तड तड तडतडती
मिठासंगे मसालेही, स्वाद-बिद खुलवती
तुरु तुरु आली तूर, तिला भेटली लाल मसूर
ज्वारी-बाजरी जोडीला, थोडी साखर थोडा गूळ
धनधान्य भरल्या घरी, स्वयंपाकाचा सापडेल सूर
प्रसन्न होईल अन्नपूर्णा, जेवून झोपा ढाराढूर
 
- आरती आवटी