
मला, कामानिमित्त 1997-98 साली इंग्लंड आणि जर्मनी या देशांमध्ये जाण्याचा योग आला. आपली भारतीय संस्कृती आणि ब्रिटिश संस्कृती किंवा जर्मन संस्कृती यांच्यात असलेले अनेक फरक तेव्हा ओघाओघानेच लक्षात येत गेले. या फरकांमधला एक महत्त्वाचा फरक हा निसर्गाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचाही होता. सोलापूर, मुंबई यांसारख्या अतिगरम किंवा अतिदमट शहरांमध्ये राहिल्यानंतर अचानकपणे सरासरी 1-2 अंश सेल्सियस तापमानामध्ये राहण्याचा अनुभव अत्यंत गमतीचा होता. आपल्याकडे उन्हाळ्यातच नव्हे; तर इतरही ऋतूंमध्ये शरीराची आग होण्याइतका उकाडा आपण अनेकदा अनुभवतो. मुंबईसारख्या ठिकाणी घामाच्या धारांनी आपण बेजार होतो. नागपूर किंवा विदर्भातल्या इतर भागांमध्ये तर एप्रिल-जून या काळात घराबाहेर पडणं म्हणजे अक्षरश: अंगावर कुणीतरी जाळ फेकल्याची भावना निर्माण करणारं असतं. असं असताना सूर्याची चाहूल लागताच बेभान होणारे ब्रिटिश-जर्मन लोक मला एकदम मजेशीरच वाटायचे. सूर्याच्या अभावामुळे खूश होणारे आपण आणि सूर्याच्या दर्शनासाठी आसुसलेले ब्रिटिश-जर्मन लोक हा विरोधाभास गमतीशीर आहे. अर्थातच, प्रदेशांमधल्या फरकांमुळे निसर्गाकडे बघण्याची ढोबळ दृष्टी बदलत जाते.
तापमानातला फरक हा प्रादेशिक फरकांच्या यादीमधला एक वरवरचा मुद्दा झाला. याखेरीज आपल्याला भारतातल्या भारतातच निरनिराळ्या ठिकाणी प्रादेशिक फरकांमुळे कितीतरी निरनिराळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. उदाहरणार्थ, पुणे किंवा मुंबई इथून जेमतेम दीडेक तासांचा प्रवास करून आपण जेव्हा लोणावळ्याला जातो, तेव्हा तिथला पाऊस बघून जीव अक्षरश: दडपतो. मुंबईतसुद्धा पाऊस अनेकदा रौद्र रूप धारण करत असला, तरी लोणावळ्यामध्ये जणू काही निसर्गाने पाण्याचे लाखो हौद एकाच वेळी रिते करावेत आणि हा प्रकार अक्षरश: अनेक दिवस सुरू राहावा अशी परिस्थिती असते. शेजारच्या किंवा समोरच्या माणसाचं बोलणंसुद्धा ऐकू येऊ नये, असा पावसाचा विलक्षण जोरही आपल्याला थक्क करणारा असतो. पहिल्यांदा असा पाऊस बघणार्या माणसाचा तर कित्येकदा थरकाप उडतो.
मुंबईतसुद्धा काही वेळा असा पाऊस पडतो आणि त्या वेळी निसर्गाच्या चक्रामध्ये माणसाने केलेल्या ढवळाढवळीचे परिणाम दिसायला लागतात. गटारं तुंबण्यापासून नद्यांना पूर येणं आणि रस्त्यांची चाळण होणं हे अगदी नेहमीच घडतं. मुंबईचा प्राण असलेली लोकलची सुविधा बंद पडते. सर्वसामान्य मुंबईकर मात्र जवळपास विनातक्रार या सगळ्याशी जुळवून घेतो. अशा वेळी असं काही पुण्यासारख्या शहरात घडलं, तर काय होईल असा विचार मनात येतो. निसर्गाचं हे विराट रूप आणि त्याच्या जोडीला माणसाने दाखवलेली बेपर्वा वृत्ती यांच्या मिश्रणामुळे मुंबईसारखं महत्त्वाचं शहर ठप्प होतं, यासारखी वाईट गोष्ट नाही!
एकीकडे आपल्याला पावसाचं असं वरदान लाभलेलं असूनही आपल्याकडे पूर आल्याबरोबर काही महिन्यांनी पाणीकपातीचं आणि कित्येकदा दुष्काळाचं गंभीर संकट येतं. इस्रायलसारख्या देशामध्ये पाऊस नावालाच पडतो. तरीसुद्धा इस्रायलनं केलेल्या पाणी व्यवस्थापनामुळे तिथे पाण्याची कमतरता जाणवत नाही. तोच निसर्ग, त्याचाच प्रदेशाला साजेसा वेगवेगळा न्याय; पण माणसाच्या कृतींमुळे माणसाने स्वत:समोर निर्माण केलेली संकटं अशी उभी ठाकतात.
निसर्ग प्रादेशिक भिन्नतेमुळे आपल्याला अनेक वेगवेगळी रूपं दाखवतो. काश्मीरमध्ये ट्युलिप्सचा बहर फक्त ठरावीक काळातच जाणवतो. त्यानंतर तिथे केशरामुळे सगळी जमीन जांभळी होऊन जाते. काही महिन्यांच्याच फरकाने ट्युलिप्स आणि केशर यांची दुलई एकापाठोपाठ एक अंथरली जाणं याला काय म्हणायचं? तसंच, कार्व्हीची फुलं दर आठ वर्षांनी बघायला मिळतात, हे समजायलाच किती काळ उलटून गेला असेल? कास पठारावर इतकी वैविध्यपूर्ण फुलं बघायला मिळतात, याची जाणीव ठेवून ती जपण्याचं भान आपल्याला केव्हा येईल? एकीकडे कांदा मिळत नाही; म्हणून रडणारे आपण काही महिन्यांनी कांद्याला भाव नाही; म्हणून ट्रकच्या ट्रक भरून कांदे फेकून देतो, याकडे निसर्ग कसा बघत असेल?
निसर्ग खरे म्हणजे आपल्याला सर्वार्थांने पुरून उरणारा आहे. त्याची व्याप्ती प्रचंड आहे. तो आपली काळजी घेणारा आहे; पण त्याचबरोबर त्याचा मान आपण राखला नाही, तर आपल्याला संकटात लोटणाराही तोच आहे. टेकड्या फोडून बांधकामं केल्यानंतर काय होतं, याचा अनुभव आपण माळीण दुर्घटनेमधून घेतला आहे. म्हणूनच इतर देशांमध्ये निसर्गाशी अशा प्रकारचे खेळ करण्यासंबंधीचे कायदे अत्यंत कडक आहेत. डोंगर-दर्यांनी नटलेल्या अनेक देशांमध्ये अशा ठिकाणी मानवी वस्त्या उभ्याच राहू शकत नाहीत. आपल्याकडे मात्र हे नियम सररास मोडून काढले जातात. या बाबतीत प्रादेशिक वैविध्य आपल्याला बघायला मिळत नाही! एकजात नियम मोडणं आणि निसर्गाशी खेळणं सुरू असतं. म्हणूनच, काश्मीरमध्ये आलेला पूर, उत्तराखंडमधली ढगफुटी, बिहारमध्ये सातत्याने येणारा पूर, चेन्नईसारखं शहर काही दिवस पाण्याखाली जाणं, लातूरमध्ये पाण्याचा टिपूस न दिसणं, हे सगळे प्रकार आपण स्वत:वर ओढवून घेतलेले आहेत. प्रादेशिक वैविध्याचा चांगल्या अर्थाने उपयोग होऊ शकतो, हेच आपण विसरलो आहोत. त्याचा मान आपल्याला ठेवता येईल, त्यातून निर्माण होणार्या समस्या आपल्याला आजही सोडवता येतील, याचाही विचार व्हायला हवा.
याच्या जोडीलाच सर्वसामान्य माणूस मात्र आपापल्या परीने नैसर्गिक वैविध्याला हसतमुखपणे सामोरं जाण्यासाठी खूप प्रयत्नशील असतो, असं आपल्याला दिसून येतं. आधी दिलेल्या उदाहरणामध्ये सोलापूर आणि मुंबई या शहरांचा उल्लेख झाला होता. दोन्हीकडचा उकाडा जीवघेणा असतो. तरीसुद्धा सोलापूरचा माणूस तिथे असलेल्या अत्यंत कोरड्या उकाड्याविषयी तक्रार करताना दिसत नाही; तर मुंबईचा माणूस सतत घामाघूम होत असूनही, त्याचा उत्साह कुठेच आटलेला दिसत नाही. यामधली गंमत म्हणजे सोलापूरच्या माणसाला मुंबईचा उकाडा नकोसा होतो; तर मुंबईच्या माणसाला सोलापूरमध्ये नकोसं होतं. दोन्हीकडचं तापमान समजा एखाद्या दिवशी एकसारखं असलं, तरीसुद्धा समुद्रकिनारी असलेल्या मुंबईमध्ये आर्द्रतेमुळे येणारा घाम आपल्याला शक्तिहीन करून टाकतो; तर सोलापूरमधली कोरडी हवा आपल्याला भोवळ आणते. म्हणजेच, एकच प्रकारचा त्रास किती वेगळ्या प्रकारांनी फक्त पाचशे कि.मी.च्या परिघात प्रकट होत असतो!
प्रादेशिक भिन्नतेमुळे आपल्याला पूर्वी वाटत असलेलं निरनिराळ्या प्रदेशांचं, तेथे मिळणार्या गोष्टींचं आकर्षण आता काही प्रमाणात आटलं आहे. उदाहरणार्थ, कलिंगडं आता फक्त उन्हाळ्यातच मिळतात किंवा ठरावीक प्रदेशांमध्येच मिळतात असं नाही. आज ती सर्वत्र सर्व मोसमांमध्ये सहज उपलब्ध होतात. असंख्य प्रकारची देशी-विदेशी सफरचंदं आता जवळपास वर्षभर उपलब्ध असतात. किवीसारखं फळ आता छोट्या गावांमध्येही दिसतं. एका दृष्टीने हे चांगलंच आहे; पण त्याचबरोबर ठरावीक भागांमध्येच ठरावीक गोष्टी पिकणार किंवा उगवणार असं म्हणण्याची सोय आता राहिलेली नाही. शेतीमधली प्रगती, माल साठवून ठेवण्याच्या आधुनिक सोयी, उत्तम वाहतूकव्यवस्था यांमुळे हे घडतं. आधुनिक काळाचं हे वरदान असलं, तरी त्यामुळे ‘खास आंबे खाण्यासाठी उन्हाळ्यात अमुक ठिकाणी जायचं’, असं आता घडत नाही. रत्नागिरीचे हापूस आंबे आता अमेरिकेतसुद्धा मिळतात!
प्रादेशिक भिन्नतेचे तोटे आपल्याला सोसावे लागू नयेत, यासाठी खरं म्हणजे निसर्गाने स्वत:च खूप सोय करून ठेवलेली आहे. उदाहरणार्थ, समुद्रकिनार्यानजीकच्या भागांमध्ये प्रचंड आर्द्रता असते आणि यामुळे माणसाला सारखं पाणी प्यावंसं वाटतं. त्याच्या शरीरामधल्या क्षारांचीही सतत हानी होते, ती भरून काढण्यासाठी समुद्रकिनार्यावरच शहाळी किंवा नारळ यांची उत्तम झाडं येतात. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. ही वैविध्यं लक्षात घेऊनच जुन्या काळापासून भारतीय लोकांनी आपले पारंपरिक आहार ठरवले आहेत. तसंच, कोणत्या ऋतूमध्ये काय खाऊ नये किंवा कुठल्या पदार्थाबरोबर इतर दुसरा कुठला पदार्थ खाऊ नये यामागेसुद्धा हीच कारणं असतात. पथ्यं पाळणं हे जसं ऋतूनुसार बदलतं, तसं प्रदेशानुसारही बदलतं. बंगालमधली माणसं दररोज मासे-भात आरामात खातात; पण महाराष्ट्रामधल्या एखाद्या माणसाने असं करून बघितलं, तर बहुदा त्याला तीन-चार दिवसांमध्येच रुग्णालयात भरती करण्याची वेळ येईल. म्हणजेच, आहारसुद्धा प्रादेशिक रचनेनुसार, निसर्गानुसार मानवतो किंवा अडचणीत आणतो.
निसर्गाची ही अद्भुत रूपं खर्या अर्थाने आपण मनमुरादपणे अनुभवली पाहिजेत. प्रादेशिक वैविध्य हे भारताचं सगळ्याच अर्थांनी असलेलं वैभव टिकवलं पाहिजे आणि निसर्गाला त्रास होणार नाही, अशा प्रकारे ते जपलं पाहिजे. सगळंच एकसारखं झालं, तर आपल्याला विविधतेतली मजाच अनुभवता येणार नाही. हिमाचल प्रदेशातल्या थंडीपासून चेन्नईमधल्या उकाड्यापर्यंत सगळेच अनुभव आपल्या या देशामध्ये घेता येतात, हे निसर्गाचं केवढं मोठं वरदान आपल्याला लाभलं आहे!
- अतुल कहाते
9372411845