पाऊस निसर्गाचा देवदूत, सखा आणि मित्र

शिक्षण विवेक    16-Jul-2021
Total Views |

paus _1  H x W: 
‘‘मन चिंब पावसाळी,
झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी,
आकाश वाकलेले’’
आषाढ महिना आला की कवी ना.धो. मनोहरांच्या या ओळी मनात आपोआपच रुंजी घालू लागतात. वर्षा ऋतू म्हणजे परमेश्वराचा नितांत सुंदर असा अविष्कार त्याच्या या रूपाने भारावून जाणारा मानवाचं आणि पावसाचं अतूट नात आहे. या नात्याची सुरुवातच होते ते बालपणापासूनच ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ असं म्हणत घराघरांतून बालगोपाळ या पावसाचं स्वागत करतात. अगदी तान्ह बाळसुद्धा पावसाच्या टपोर्‍या थेंबाने सुखावते. जोरदार गडगडाटासह आपल्या आगमनाची वर्दी देणारा पाऊस मानवासाठी अमृतधारा बनून बरसतो आणि क्षणात दिलासा देऊन जातो.
शेताच्या बांधावर चातकाच्या निसर्गाने पळवलेला देवदूत ठरतो. उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने बळीराजा पाहतो. तो या वरुणराजाच्या आधारानेच या देवदूताच हे बरसणारं रूप धरणीमातेला समृद्धतेचं वाण देतं. सर्वत्र ‘हिरवे हिरवे गार गालिचे’, ‘हिरवे कंच डोंगर’, ‘रानफुलांच्या बहरणार्‍या वाटा’, ‘धुक्याची चादर’, ‘दवबिंदूची पखरण या अलौकिक सौंदर्याने मन भारावून जाते त्याचं हे सुंदर रूप कलाकारांच्या संवेदनशील मनास हळुवार स्पर्शून जाते. अनेक कवी, चित्रकार यांचं प्रेरणास्थान बनलेला हा पाऊस एखाद्या सुंदर काव्याची निर्मिती करतो. तर कधी चित्रकाराच्या कुंचल्यातून बेदरकारपणे बरसतो. तरुण मनाला तर हा पाउस आपला सखा, मित्र वाटतो. या पावसाचा खरा आनंद घेण्यासाठी तरुण वर्ग बाईकवर टांग मारून निघतो. तो थेट निसर्गाच्या सानिध्यात कुणी गडकोटांची मोहीम आखतो, तर कुणी मुक्तपणे कोसळणारा धबधब्याच्या प्रपातात स्वत:ला सामावून घेतो. अशा पावसाळी वातावरणात गरमगरम भजी आणि भाजलेल्या शेंगा, कणसाचा आस्वाद घेत ओली पायवाट तुडवत पर्यटक ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव घेतात.
अनेकदा हा पाऊस कुटुंबाला मित्र-मैत्रिणींना आप्तेष्टांना कळत - नकळत जवळ आणतो. खूप दिवसांनी कुटुंबाबरोबर काढलेली एखादी छोटीशी सहल, पावसाळी वातावरणात रंगणारी गप्पांची, गाण्याची मैफल, अनेक सुखद क्षणांच्या सोबती बनतात. रोजच्या धकाधकीच्या कंटाळवाण्या दिनक्रमातून जरा हटके दिवसांची एक सुंदर सुखद स्मृती देतात. फक्त आनंद देणारा हा वरुणराजा महिलांचाही जिवाभावाचा असतो. अनेक सणवार, व्रतवैकल्यांचा श्रावण महिना म्हणजे तर आनंदाची पर्वणीच, भरपूर फळे, फुले विविध पदार्थांची रेलचेल यांमुळे महिलांचा उत्साह द्विगुणीत होतो. भाद्रपदात गौरी - गणपतीचे आगमन होते ते याच जलधारांच्या साक्षीने. अशा रीतीने लहानपणापासून थोरांपर्यंत सार्‍यांनाच हवाहवासा वाटणारा हा सखा केवळ चार महिन्यांचा पाहुणा असतो हे विसरून कसे चालेल? त्याकरीता त्याच्या सहस्र जलधारांचं योग्य नियोजन करणे हे आपल्या कर्तव्य नाही का? पाणी आडवा पाणी जिरवासारखे उपक्रम आपण सार्‍यांनीच हाती घेतले पाहिजे. पाण्याचा होणारा अपव्यय, नासाडी टाळून पाणी टंचाई, महागाई भीषण दुष्काळ आदि संकटांचा नायनाट केला पाहिजे. काही काळापुरता आलेल्या या पाहुण्यास केवळ मनातच नव्हे तर नदी, नाल्यातही साठवले पाहिजे तरच हरितक्रांती साध्य होऊन समृद्ध भारत घडेल. यात शंका नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते.
योग्यवेळी होवो पर्जन्यवृष्टी
समृद्धी धान्याची भूवरी
देशिया दुष्काळ, दुष्टचक्र नसू देे
शेतकरी वसोत निर्भयतेने.
- भाग्यश्री गणेश देशपांडे (पालक)
एन.ई.एम.सेकेंडरी स्कूल