वारी - वारसा संत परंपरेचा...

शिक्षण विवेक    19-Jul-2021
Total Views |

waari - varasa sant param
‘टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट ती चालावी पंढरीची...’
आपला महाराष्ट्र ही साधु संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतांनी आपल्या कार्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. संत हे समाज शिक्षक असतात. यातीलच एक महत्त्वाचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ही वारी...
पावसाळा सुरू झाला की आषाढात वेध लागतात ते पालख्यांचे...आषाढातील ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्‍यांचे व्रत आहे. वारीतील ही पालखी सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे.
जीवनातील सर्वश्रेष्ठ सेवा कोणती असेल? तर ती म्हणजे आई-वडिलांची सेवा होय. आणि याच सेवेचे व्रत धारण करणार्‍या आपल्या पुंडलिकासारख्या भक्तासाठी त्या श्रीहरी ला देखील विटेवर उभे रहावे लागले. ही आषाढी एकादशीची वारी म्हणजे सर्व जाती धर्मातील घटकांनी भेदभाव विसरून एकत्र येण्याचा व ईश्‍वरी भक्तीत तल्लीन होण्याचा जणू एक सोहळाच आहे.
संपूर्ण देशभरातील वारकरी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. यालाच वैष्णवांचा मेळा असेही म्हणतात. वारकरी ऊन,वारा, पाऊस, यांचा विचार न करता भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेवून आपल्या विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत भक्तीरसात तल्लीन होतात.
विठ्ठलाला भेटण्याच्या ओढीमुळे त्यांना कसलाही त्रास जाणवत नाही कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठीच्या कोणत्याही गोष्टीचा त्रास आपल्याला वाटत नाही. तसेच ऊन, पाऊस, वारा यात पायी वारा केल्याने सहनशक्ती वाढते. शारिरीक व मानसिक बळ मिळून निसर्गाची एकरूप होण्याची संधी मिळते. ही पायी वारी, एकादशीचे व्रत आपणाला आत्मसंयम, स्वयंशिस्त व त्यागी वृत्ती शिकवते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान शेतकर्‍यांची पेरणी पूर्ण झालेली असते. वर्षाऋतूच्या आगमनामुळे नदीला भरपूर पाणी असते पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने फारशी नसल्याने बळीराजाला वेळ असूनही कोठे जाता येत नसे. त्यामुळे आपला सवडीचा वेळ भगवंताचे नामस्मरण, प्रार्थना, भजन, किर्तन इ. कामासाठी कारणी लावत असत.
प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण ते करताना पांडुरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती.सासुरवाशिण मुलगी माहेराला जाते त्याप्रमाणे प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकळ संतांची मांदियाळी वैष्णवांसह आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचते.
या वारीत कोणाला निमंत्रण नाही, वर्गणी नाही, सक्ती नाही या सर्वाचा शेवट होतो तो काल्याच्या किर्तनाने म्हणजेच गोपाळकाल्याने. गोपाळकाल्यात सर्वांच्या शिदोर्‍या एक करतात आणि नंतर वाटून घेतात त्यामध्ये नकळत एकमेकांची सुख दु:खेही वाटून घेतली जातात.
हा असा एकोपा, प्रेम, स्वयंशिस्त, भक्ती आपल्याला वारीमधून पहायला व शिकायला मिळते. असा हा समृद्ध परंपरेचा वारसा जतन करण्याचे व तो पुढे नेणे आपले कर्तव्य आहे.
नूतन मदन देशमुख,
शिशुविहार प्राथ. शाळा, कर्वेनगर, पुणे.