आकाशाशी जडले नाते..

शिक्षण विवेक    27-Jul-2021
Total Views |

Aakashashi Jadale Nate_1& 
मानवाच्या पहिल्या चांद्रफेरीला 50 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने भारताची चांद्रयान 2 ही महत्त्वाकांक्षी मोहीमही यशस्वीरित्या पार पडली. भारत महत्त्वाच्या देशांच्या रांगेत जाऊन बसला. स्वबळावर अवकाश मोहिमा यशस्वी करणार्‍या बोटांवर मोजता येतील, अशा देशांच्या पंक्तीत आपल्या भारताचा समावेश आहे.
पण अवकाश, खगोल, ज्योतिष या सर्वांशी आपला असलेला संबंध अत्यंत प्राचीन किंबहुना जगातील सर्वांत आधीचा आहे. पण सर्वसामान्यांना रूचेल, समजेल अशा भाषेतील वैज्ञानिक सत्य सांगणरी पुस्तके फारच कमी.
डॉ. नारळीकरांनी हीच उणीव दूर करण्याच्या दृष्टीने विज्ञान सत्यकथा लिहिण्यास सुरुवात केली, आकाशाशी जडले नाते हे पुस्तक या सर्वांतील सर्वोच्च स्थानी विराजमान असलेले असे म्हणता येईल.
डॉ. नारळीकर म्हणतात, माझे आकाशाशी नाते जडले ते केंब्रिजमध्ये. गणिताच्या उच्च परीक्षेसाठी तयारी करत असताना फे्रड हॉएल यांचे फ्रन्टियर्स ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमु हे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्यांनी ते जनसामान्यांसाठी लिहिलेले होते.
ग्रह - उपग्रहांच्या मर्यादित कक्षांपलीकडे जाऊन तार्‍यांच्या अंतरंगाचा, आकाशगंगेच्या विविधरंगी छटांचा, त्या पलीकडे मानवी डोळ्यांना न दिसणार्‍या पण दुर्बिणीतून प्रकट होणार्‍या तारकाविश्‍वांचा सांगोपांग अभ्यास करता येतो आणि तोही आपल्याला सुपरिचित अशा विज्ञानाच्या चौकटीत राहून हा एक मला अनपेक्षित साक्षात्कार होता.
यानंतर नारळीकरांनी खगोल विज्ञानात संशोधन करता करता या विषयातून मिळणारा आनंद आणि उत्तेजना यांत इतरांना सहभागी करून घेण्यासाठी मायबोलीतून या विषयावर भाषणे देण्यास सुरुवात केली.
या पुस्तकात विज्ञान व खगोलातील अनेक रहस्ये उलगडणारी व प्रश्‍नांची उकल करणारी 51 प्रकरणे असून ती 8 भागांत विभागलेली आहेत.
अनेक प्रश्‍नांची उकल हळूहळू होत आहे तरीही 21 व्या शतकात अनेक आव्हाने आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो अजिबात उशीर न करता मिळवा हे पुस्तक आज्णि वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया शिक्षणविवेक आणि डॉ. नारळीकरांना अवश्य पाठवा.
- स्वाती गराडे, उपशिक्षिका
म.ए.सो. कै. दा.शं. रेणावीकर विद्यामंदिर, अहमदनगर