पुस्तक परीक्षण
आयुष्याचे धडे गिरवताना
मूळ लेखिका सुधा मूर्ती
कथा संग्रह अनुवादित
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
सुधा मूर्ती या इन्फोसिस फौंडेशनच्या चेअरपर्सन असून मराठी, इंग्रजी,कन्नड भाषांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. साधी, सहजसुंदर लेखनशैली वाचकांच्या मनाचा ठाव घेते. सुधा मूर्ती यांना 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्नाटक सरकारचा ’आतिमाबे पुरस्कार’, यासह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.
पुस्तकाचे शीर्षक वाचले की लगेच लक्षात येते की या पुस्तकात आयुष्यात येणार्या सुख-दुःखाची कथा असेल, अनुभव कथन असेल. सुधा मूर्तींच्या आयुष्यात घडलेल्या सर्व सत्यघटना त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्या सर्व सत्यघटनांचे सविस्तर चित्रण त्यांनी वाचकांसमोर मांडले आहे. आयुष्याच्या प्रवासात अनेकजण आपणास भेटतात. कळत नकळतपणे! प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकतच असतो. आयुष्याच्या प्रवासात नानाविध प्रकारची माणसे भेटतात. आनंद देणारी, आश्चर्यकारक, प्रत्येकाच्या नानाविध तर्हा असणारी पण त्यांच्यामुळे आपण अनुभवसमृद्ध होतो हे नक्की!
हे पुस्तक तुमच्या माझ्या जीवनाच्या गोष्टीविषयी आहे. या पुस्तकांत एकूण 23 कथा आहेत. प्रत्येक कथेगणिक आपणांस अनुभवाची शिदोरी, आयुष्याचा धडा गिरवणारी स्वभावानुसार व्यक्ती भेटते आणि आपण समृद्ध होत जातो. स्वतः आत्मपरीक्षण करू लागतो.
बॉम्बे टू बंगळूर’, तुम्हाला आठवतं?’ श्रीमंत माणूस सर्व असूनही दुःखी असतो’ - अशा विविध सत्य घटना आयुष्यातील धड्यातही आहेत. सर्व घटना मनाचा वेध घेतात हे नक्की! त्याग ही घटना वाचल्यावर मी प्रत्यक्ष वर्गात पोहोचले. चाकोरीबद्ध अध्ययन अध्यापन विद्यार्थ्यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्या कलाने घेऊन समजून शिकवावे लागते. राजीवला इतिहास विषय आवडत नाही. त्यामुळे त्याचे इतिहासाच्या तासाला अजिबात लक्ष नाही, इतिहास विषयच तो मृत समजतो. अशा वेळी त्याच्या शिक्षिका त्याला प्रत्यक्ष जीवनानुभव देतात. एका कामानिमित्त खेड्यात दौर्यावर घेऊन जातात तेंव्हा राजीवला त्या खेड्यातील लोक गोपालच्या शिलालेखाला का पूजतात, गोपाळने केलेले देशकार्य, इतिहास यांचे महत्त्व कळते.
अशा अनेक लघुकथांनी सुधा मूर्ती यांनी या पुस्तकातून आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी मार्गदर्शक मुल्ये कथांच्या माध्यमातून रेखाटली आहेत.
- ऋतुजा रविंद्र गवस, शिक्षिका
विवेकानंद संकुल सानपाडा