श्रावण महिना

शिक्षण विवेक    12-Aug-2021
Total Views |

shravan mahina_1 &nb 
चैत्र महिन्यापासून सुरू होणार्‍या मराठी महिन्याचे रंगरूप आगळेवेगळे असते. कुणाला चैत्राच्या पालवीची माहिनी पडते, तर कुणाला वैशाख वणवा आवडतो. कुणाला मेघःश्याम आषाढ हवाहवासा वाटतो; तर कुणी सोनेरी अश्‍विनासाठी झुरतात. मला स्वतःला मात्र हवाहवासा वाटतो तो ‘हिरवा श्रावण’.
श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली आढळते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात! कुठे गर्द हिरवा, तर कुढे प्रसन्न हिरवा, तर कुठे पोपटी या सर्व रंगछटांतून चैतन्याचा, सर्जनतेचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडत असतो.
श्रावण हा मराठी महिन्यांतील पाचवा महिना. उकाड्याने हैराण करणारे चैत्र-वैशाख गेल्यावर ज्येष्ठ-आषाढात पावसाचा धुवांधार वर्षाव सुरू होतो. वातावरण कुंद आणि ढगाळलेले असते. घराबाहेर पडणेदेखील पुष्कळदा अवघड होते. अशा वेळी माणसाला दिलासा लाभतो श्रावणात! श्रावणातील पावसाचे वर्णन करताा बालकवी म्हणतात -
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावणाचे हे चैतन्य मुला-माणसांत, पशुपक्षांत, पानाफुलांत सर्वत्र ओसंडून जाताना आढळते. श्रावणात फुलणारा तेरडा रंगीबेरंगी गुच्छांचा नजराणा घेऊन आलेला असतो. शेतात डोलणार्‍या तुर्‍यावर श्रावणात सोनेरी ऊन पडते आणि त्यांचा तजेला नव्या उत्साहाने डोलत राहतो. श्रावणसरींच्या स्पर्धात उल्हासित झालेली पिके भावी सुबत्तेची आशा पालवू लागतात. दरम्यान शिवारात राबणार्‍या लोकांना, शेतकर्‍यांना जरासा विसावा मिळतो. अशा या प्रसन्न श्रावण महिन्यात सर्वत्र आनंद ओसंडत असतो.
श्रावणमास म्हणजे व्रतवैकल्यांचा, सणावारांचा काळ. श्रावणातील सोमवारांचे केवढे महात्म्य, मंगळवारी मंगळागौरीची पूजा, शुक्रवारी जीवती मातेचे व्रत, तर शनिवारी मारुतीची आराधना. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्ग बांधवांनाही विसरत नाही; म्हणून तर पिकांचे उंदरांपासून रक्षण करणार्‍या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते. तर वर्षभर कष्ट करणार्‍या बैलांची बैलपोळ्याला मिरवणूक काढली जाते. नारळीपौर्णिमेला सागराला भक्तीभावाने नारळ अर्पण केला जातो.
असा हा श्रावणमास! सर्वांच्या मनात आनंदाची हिरवळ फुलवणारा आणि आगामी समृद्ध जीवनाचे ओझरते दर्शन घडवणारा! मला वाटते माझ्याप्रमाणे आपणा सर्वांनाही तो खूप आवडतो.
हरसा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजरा श्रावण आला.
- नेहा नरेंद्र तेंडुलकर, महिलाश्रम हायस्कूल