‘‘राजा, आवर रे! रिक्षा आली बघ.. काका येऊन थांबलेत.’’ ही लगबग, घाई रोज सकाळी घराघरात असायची. कशाची आहे हो ही घाई? मुलांची शाळेत जाण्याची ना! पण आज कोव्हिड-19 मुळे जून महिना संपून गेला तरी शाळा चालू झाल्या नाहीत. शिक्षकांच्या आणि पालकांच्या प्रयत्नातून अभ्यास तर सुरू झाला पण मुलांचं हक्काचं, आनंदाचं, स्वातंत्र्याचं स्थान हरवलं आहे. कोणतं हो हे स्थान?
मज आवडते ही मनापासुनी शाळा।
लाविते लळा ही जशी माऊली बाळा॥
ते स्थान म्हणजे शाळा. स्वतःच्या घरानंतर मुलांना आवडते ती शाळा. रोज सकाळी घाईगडबडीत आवरून शाळेत पोहोचलं की शाळेची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेने होते. मग ती प्रतिज्ञा म्हणताना ही मुलं एकमेकांची खोडी काढत शाळेची सुरुवात आनंदाने करतात पण याची जागा आता वेगवेगळ्या अॅप्सच्या आयडी पासवर्डने घेतली आहे. तास चालू होण्याआधी मुलांचं आवरायचं आणि कॉम्प्युटरसमोर बसवायचं आणि तो चालू झाला की मध्येच लाईट जाते म्हणजे त्यात एक तास निघून जातो. हा त्रास होतो म्हणून मोबाईल घेऊन द्यावा तर पालकांना ही काळजी की समजा आई-वडील कामाला निघून गेल्यावर मुलं काही चुकीचे व्हिडिओ तर पाहणार नाहीत ना!
आपल्या लहानपणी घरातील लँडलाईन फोनला हात लावण्याची पण परवानगी नसायची. पण आज आपली मुलं अँड्रॉईड फोन आपल्यापेक्षा अधिक छान प्रकारे वापरत आहेत. ही एक प्रगतीची बाब म्हणता येईल. याशिवाय मुलं रोज शाळेत जाता-येताना प्रवास करून दमून जायची. शिवाय पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचले की ट्रॅफिक जॅम! मग मुलं घरी जाईपर्यंत त्या काकांनाही टेन्शन आणि पालकांनाही. शिवाय मुलं दमून आल्यावर घरचा अभ्यासही पूर्ण करत नाहीत. असं असलं तरी या सगळ्या मुलांचे खेळण्याचे मैदान आणि डब्याच्या सुट्टीत गप्पा मारत संपणारा डबा या मजेला मुलं कुठेतरी मुकत आहेत. मुलांच्या मैदानाची जागा कोरोनाने काबीज केलीय तर डब्याच्या सुट्टीतील गप्पा एकटेपणात विरघळून गेल्यात. बेधुंद मनानं वागण्यास मुलांना त्यांची हक्काची शाळा पुन्हा मिळू देत. कोमेजलेल्या त्या लेकरांना पुन्हा टवटवीत होऊ देत.
- रीमा समीर वैद्य, पालक
न्यू इंग्लिश स्कूल, पुणे