नवनिर्मितीचा आनंद

शिक्षण विवेक    27-Aug-2021
Total Views |

navnirmiticha aanand_1&nb 
 
आमच्या शाळेत दरवर्षी विद्यार्थ्यांकडून हस्तलिखित तयार केले जाते. त्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकांकडे येत असते. यावर्षी ती जबाबदारी सकाळ सत्रात माझ्याकडे आली. मग विचार केला, दरवर्षी तेच तेच विषय घेऊन हस्तलिखित पूर्ण करण्यापेक्षा मुलांना नवीन, वेगळं काहीतरी करता येईल व मुलांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला वाव मिळेल असेच विषय निवडावे. म्हणून स्वरचित कविता, कवी कुसुमाग्रज व पु.ल.देशपांडे यांचा जीवनपट व त्यांचे साहित्यावरील कार्य, वेगवेगळी मुलांनी काढलेली सुंदर चित्र हे विषय हस्तलिखितासाठी निवडण्यात आले.
सर्व वर्गातील मुलांना हस्तलिखितातील विषयांवर मार्गदर्शन केले. थोडयाच दिवसात मुलं वेगवेगळ्या विषयांवर स्वतः कविता लिहून दाखवायला लागले. इ.सहावी व नववीच्या वर्गातल्या मुलांनी खूप छान कविता केल्या. चित्रही खूप सुंदर काढली. नववीच्या मुलांनी कवी व लेखक यांची माहिती ही छान लिहून आणली. यातच आम्हाला असे कळले की राज्यस्तरीय हस्तलिखित स्पर्धेतही भाग घ्यावयाचा आहे. त्याप्रमाणे स्पर्धेत सहभागही घेतला. मग सकाळ व दुपार सत्रातील एकूण 12 मुलांचा गट तयार केला. हस्तलिखिताचे विषय मुलांना विचार करायला तसेच त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा असेच होते. विषय - एका वस्तूचे 50 उपयोग, गुप्त संदेश कविता, निर्जिव वस्तूंमधील संवाद, सद्य स्थितीतील, पूरपरिस्थिती आढावा, लो.टिळकांच्या कार्याचा आढावा, मुलांना या सर्व विषयांचे प्रथम मार्गदर्शन केले.
आता खरी सुरुवात झाली, सहभागी विद्यार्थी घरी, शाळेत सतत विचार करायला लागली. मुल ग्रंथालयात जाऊन विषयांवर आधारीत पुस्तकांचा अभ्यास करून लिखाण करू लागली. मग हळूहळू मुले स्वतःला ज्याविषयावर माहिती मिळेल ते लिहून आणू लागले.
एका वस्तूचे पन्नास उपयोग यामध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटलीपासून काय काय करू शकतो यावर मुलांनी किती कल्पना सुचविल्या. लेक वाचवा, वृक्षारोपण यांवर आधारित गुप्त संदेश कविता मुलांनी तयार केल्या. गुप्त संदेश म्हणजे उदा. झाडे वाचवा हा संदेश कवितेतून देताना झाड किंवा त्यासंबंधी शब्द कवितेत न वापरता कविता लिहिणे. निर्जिव वस्तूतील संवादात इ.सातवीच्या मुलीने गजरा व कानातले डूल यावर खूप सुंदर संवाद लिहिले होते.
सर्व लेखनाची तपासणी करून, त्याचे एकत्रीकरण केले. अशाप्रकारे या वर्षात एक नाही तर दोन सुंदर अशी हस्तलिखिते तयार झाली. यातून बरंच काही साध्य करता आलं. मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला, तसेच गटांत काम करणे व सहकार्यवृत्तीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पुढे भविष्यात मुलांना नक्कीच यांचा फायदा होईल. याचबरोबर मुलांच्या पालकांनाही शाळेत येऊन मुलं नवीन काय करतायत हे पाहण्याचे आर्कषण वाटले. खरंतर काही पालकांनी हस्तलिखित आम्हाला वाचायला द्या, अशी विनंती ही केली. या उपक्रमामुळे पालकही शाळेशी जोडले गेले. हस्तलिखितासाठी बक्षिस मिळेल यापेक्षा स्पर्धेत सहभाग घेतला हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मुलांना नवीन काही तरी करता आलं व खरंतर त्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसतही होतं हेच मोठं बक्षिस होतं असं मलातरी वाटतं. हि खरी सुरुवात होती कारण मुलांनी त्यांच्या विचारांचे अनमोल मोती हस्तलिखितात वेचले होते.
आता या लॉकडाऊनच्या काळातही मुलांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबरच वेगळं काहीतरी करायला दिलं पाहिजे म्हणून चार-पाच दिवसांतून कधी आवडणारी प्रार्थना लिहा, मनाचे श्लोक पाठांतर करा, आईला घरकामात मदत करा. आताच दोन दिवसांपूर्वी पावसावरच्या कविता शोधून लिहावयास सांगितले. यामुळे मुलांचा वेळही जाईल, त्यांचे मनही रमेल आणि वाचन, लेखन या गोष्टी साध्य होतील. हे सर्व मुलं आवडीने करतात ह्यातच समाधान.
- सुलक्षणा पाटील,
अभिनव विद्यामंदीर कल्याण