कोविडच्या विळख्यात अवघे विश्व अडकून दीड वर्ष झाले. लाखो लोकांचे आयुष्य पणाला लागले, अनेकांच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले, अनेकांनी स्वजन गमावले. व्यापार, पर्यटन, कारखाने, मोठे उद्योग, शेती अशा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणार्या क्षेत्रांचे अपरिमित नुकसान झाले. परंतु, सगळ्यात जास्त हानी झाली आणि सगळ्यात कमी चर्चा झाली, ती शिक्षणाची! शाळा बंद!! ऑनलाइनचे सुरुवातीचे आकर्षण आणि लोभसपणा ओसरल्यावर आता त्याचे घातक परिणाम आणि त्याची असमाधानकारक उपयुक्तता यांनी हळूहळू डोळे उघडू लागले आहेत. ऑनलाइन राहण्याचे व्यसन, स्टेटस, अपडेट्स आणि लाईक्स यांतून मुलांना बाहेर काढण्याचे आव्हान समोर ठाकले आहे. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक समस्या यांवर बोलणे अवघड झाले आहे. आई-वडील मुलांना सांभाळून थकले आहेत. सतत शंका विचारणार्या आणि सारखे काय करू, या प्रश्नाने भंडावून सोडणार्या मुलांमुळे घराघरात रागवारागवी, मारझोड, वाद वाढले आहेत. या सगळ्यातून सुटकेचा एकच उपाय तज्ज्ञ आग्रहाने सांगताहेत. तो म्हणजे ‘शाळा’ सुरू करणे. एक मुख्याध्यापिका आणि शिक्षिका म्हणून माझेही हेच मत आहे. खरं तर मागणी म्हणणे योग्य होईल.
1. मुले आणि शिक्षक यांचे नाते विलक्षण असते. गेल्या दीड वर्षात या दोघांमध्ये समोरासमोर संवाद झालेला नाही. मुलांचे अभ्यासातील नुकसान भरून काढणे, यांच्यातील संवादानेच शक्य आहे. आपल्या शिक्षकाला भेटणे, प्रत्यक्ष बोलणे, त्याच्या सहवासात राहणे, हे मुलांना आश्वस्त करते.
2. मुलांसंदर्भातील अनेक समस्यांचे निराकरण पालक आणि शिक्षक यांच्या एकत्र येण्याने होऊ शकते. घरातील आणि शाळेतील मुलांचे वागणे पालक-शिक्षक यांच्या बोलण्यातून उलगडते. किंबहुना वर्तन समस्यांवरचा तो जालीम उपाय आहे.
3. मुलांच्या आरोग्यविषयक समस्या गंभीर पातळीवर पोहोचल्या आहेत. ऑनलाईन शिकणे, नंतरही तासन्तास ऑनलाईन राहणे यामुळे चष्मा तर लागला आहेच, शिवाय नंबरही वाढला आहे. वजनातील वाढ, व्यायामाचा आणि खेळाचा अभाव, नवनवीन पाककृतींचा भडिमार यांचा मुलांवर विपरीत परिणाम होत आहे. शाळा सुरू झाल्याने या गोष्टी पूर्णपणे थांबणार नसल्या तरी आटोक्यात येतील, हे मात्र खरे.
4. औपचारिक अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेयपूरक उपक्रमांचा मुलांच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा असतो. हे उपक्रम ठप्प आहेत. पाठांतर, वक्तृत्त्व, कथाकथन यांचे वैयक्तिक सादरीकरण असंख्य शाळांनी ऑनलाईन आयोजित केले; पण नृत्य, नाट्य, प्रकल्प यातून होणारे गटकार्य, कामाची विभागणी, नेतृत्व इत्यादी गुणांचा विकास सध्या होत नाही, यातील गंभीर भागही लक्षात घेतला पाहिजे.
शाळा सुरू झाल्यास, नियमांच्या चौकटीत का होईना पण या गोष्टींना सुरुवात होईल.
5. वाचन, श्रवण, लेखन आणि भाषण या मूलभूत कौशल्यांबाबतचे अनेक संस्थांचे अहवाल काळजी वाढवणारे आहेत. अभ्यासविषयांतील मूलभूत संकल्पना कच्च्या राहिल्याने मुलांच्या भविष्यकाळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. शाळेत येण्याने मुलांच्या बौद्धिक विकासाला दिशा मिळेल. अर्थात, कोविड अजूनही गेलेला नाही, जगात कित्येक ठिकाणी त्याचा धुमाकूळ सुरूच आहे. भारतातही शिथिलता दिल्यामुळे त्याचा प्रसार होतच आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे शासनासाठी आव्हानात्मक आहे. (कारण या निर्णयावर टीका होणारच आहे.) शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यासाठीदेखील ही परीक्षाच असेल. शिक्षकांचे, पालकांचे लसीकरण, सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर, वर्गखोल्यांची स्वच्छता दोन सत्रांची शाळा या गोष्टींसह शाळा सुरू केल्या पाहिजेत. थोडा धोका पत्करून पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे अत्यंत गरजेचे आहे.
दोन अपेक्षा मात्र आहेत. काळजी घेऊनही एखादे मूल कोविडच्या कचाट्यात सापडले तरी शासन, पालक आणि शाळा यांच्यात ब्लेम गेम होऊ नये आणि दुसरे म्हणजे मागच्या दीड वर्षात भीती, दडपण, अतिसंवेदनशीलता, समाज माध्यमांचे व्यसन, सततच्या सहवासामुळे घरात सगळ्यांची चिडचिड यांमुळे मुलं हळवी झालीत, हट्टी झालीत, काही उर्मट झालीत तर काही निर्ढावलीत, काहींना शाळा सुरू होण्याची आस आहे तर काहींना शाळा, अभ्यास नकोसे झालेत. अख्खी पिढी बरबाद होण्याचा धोका आहे. शारीरिक आजार औषधांनी बरे होतील पण मनाचे आजार मुलांच्या शाळेत येण्याने खूप प्रमाणात कमी होतील असा मला ठाम विश्वास आहे.
मागच्या आठवड्यात घइउच्या भागात ग्वालियरच्या एका मुख्याध्यापिकेला मुलांशिवाय शाळा कशी वाटते? असे विचारले तेव्हा तिच्या डोळ्यातले पाणी खूप काही सांगून गेले. आमच्या मनातलेच भाव होते ते! आम्ही शिक्षक मुलांच्या शाळेत येण्याची खूप वाट पाहतोय!
- लीना वर्तक