खारुताईची जादू

शिक्षण विवेक    21-Sep-2021
Total Views |

kharutaichi jadu_1 &
 
आई..... ए आई.... लवकर खायला दे बघू, खूप भूक लागलीये. सोहमने घरात शिरताच आरोळी ठोकली. अरे हो.. हो... हात पाय तरी धू आधी. खेळून आलास ना? मी तोवर पटकन गरमा गरम उपमा करते. नाहीतर पोहे करू का? कांदा चिरता चिरता आई म्हणाली. नाही आई मला मॅगी खायची आहे. तुझे ते ओल्ड फॅशन्ड, सो-कॉल्ड पौष्टिक पदार्थ नको आहेत मला. सोहम पाय आपटत बोलला.
शाळेला सुट्टी लागून आठ, दहा दिवस झाले होते. सोहम सुट्ट्या लागल्यापासून सारखा पिझ्झा, मॅगी, बर्गर खात होता. आई वैतागली होती. आज तिने त्याला निक्षून सांगायचं ठरवलं. ती त्याला म्हणाली, ‘हे बघ सोहम, रोज असं जंक फूड खाणं चांगलं नाही. त्यानं आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. तू दुसरं काहीही सांग, मी करून देईन.’ सोहमला खूप भूक लागली होती. तो आईचं भाषण ऐकायच्या मनःस्थितीत नव्हता. आई रोज वेगवेगळ्या भाषेत हेच ऐकवत होती, त्याला खूप राग आला. तो आईला म्हणाला, ‘काही नकोय मला तुझे ते पदार्थ, राहीन मी उपाशी.’ असे म्हणून तो दाणदाण पाय आपटत आपल्या वरच्या खोलीत आला.
त्याला त्याची ही खोली खूप आवडायची. त्या खोलीला लागून एक गॅलरी होती आणि त्या गॅलरीत आंबा, अशोक, जांभूळ इत्यादी झाडांच्या फांद्या डोकावत होत्या. तो रागारागात पलंगावर धाडकन जाऊन पडला. पडल्यापडल्या त्याची नजर झाडांकडे गेली. ‘यांचं बरंय, नुसतं पाणी घातलं की झालं. बाकी जे पाहिजे ते जमिनीतून घेता येतं. पोहे खा, उपमा खा, उकडपेंडी खा असे अत्याचार कोणी करत नाही यांच्यावर. मी पण यांच्यासारखा असतो तर कित्ती मज्जा आली असती.’ त्याला वाटून गेलं.
तेवढ्यात एक खारुताई अशोकाच्या झाडावरून सुर्रकन खाली उतरली आणि याच्या पलंगावर चढली. ‘काय सोहम काय झालं?’ ती म्हणाली. सोहम दचकला. ‘अरेच्या! तू बोलतेयस. म्हणजे तुला बोलता येतं? चमत्कारच म्हणायचा!’ सोहम तिला म्हणाला. ‘हो तर, मी बोलू शकते आणि तुझ्या मनात काय चाललं आहे ते पण ओळखू शकते’, खारुताई म्हणाली. ‘ते कसे काय?’, सोहमने विचारलं. ‘सांग बघू, माझ्या मनात काय चाललंय ते?’ खारुताई हसली, म्हणाली, ‘तू हाच विचार करतोयस ना की मी झाड असतो तर किती छान झालं असतं?’ आता मात्र सोहम पलंगावरून खाली पडायचाच बाकी राहिला. तो म्हणाला, ‘अगदी बरोबर ओळखलंस तू. पण ओळखून काय फायदा? ते खरं थोडी होणार आहे?’ खारूताई पुन्हा गोड हसली आणि म्हणाली, ‘आणि खरं झालं तर तर काय देशील?’ सोहम उडालाच, ‘म्हणे खरं झालं तर? जसं काही जादुगारीणच लागून गेली आहे मोठी?’ खारुताई म्हणाली, ‘अरे, हो तर! मला येतेच जादू. मी तुला अगदी झाडासारखं नाही बनवू शकणार. पण झाडासारखं हिरवं क्लोरोफिल मात्र देऊ शकते. ज्यामुळे तुला नुसतं पाणी पिऊन उन्हात उभं राहिलं की तुझ्या शरीरातच अन्न तयार होईल. पण एक अट आहे, तुला बाकीचं काहीही खाता येणार नाही. मी तुला एका आठवड्याचा अवधी देते, ट्रायल घेऊन बघ. आयडिया आवडली तर सिस्टीम परमनंट बसवून देईन तुझ्यात.’ सोहम बुचकळ्यात पडला. ‘काय करावं? करून बघायला काय हरकत आहे?’ तो खारूताईला म्हणाला, ‘चालेल मला एका आठवड्यासाठी ट्राय करायला.’ खारूताई म्हणाली, ‘ठीक आहे.’ तिने त्याचे हात आपल्या छोट्याशा हातात घेतले आणि सोहमला डोळे मिटायला सांगितले, दोन मिनिटं झाल्यावर त्याला आवाज आला. उघड डोळे आता! त्याने डोळे उघडले. खारुताई आजूबाजूला दिसली नाही त्याने इकडेतिकडे बघितलं. खारूताईनी तिच्या हातात घेतलेल्या हाताकडे बघितलं. तो दचकला त्याचे हात हिरवे झाले होते. तो धावत आरशा जवळ गेला, तो पूर्णच हिरवा झाला होता. मग त्याच्या लक्षात आलं की त्याच्या शरीरात क्लोरोफिल टाकून मॅडम गायब झाल्या होत्या. तो विचारात पडला, त्यात त्याला भूकेचीही जाणीव झाली. टेबलवर ठेवलेले पाणी तो घटाघटा प्यायला व गॅलरीत थोडं ऊन होतं तिथे जाऊन तो बसला. दहा-पंधरा मिनिटात त्याला पोट भरल्यासारखं वाटायला लागलं. त्याला खूपच मज्जा वाटली. ‘आता आईचा कोणताच बोरिंग पदार्थ खायला नको. व्वा !.. ग्रेट खारूताई’, तो मनात म्हणाला.
थोड्या वेळाने रात्र झाली. आईने त्याला खालून ‘जेवायला ये’ म्हणून हाक मारली. तो खाली उतरला. आई त्याला असा हिरवा झालेला बघून घाबरली. ‘काय झालं तुला असं अचानक? चल आपण डॉक्टरकडे जाऊ या’, ती म्हणाली. त्यावर तो बेफिकीरपणे हसला. काही गरज नाही मला त्या डॉक्टरची. ‘कधीही गेलो तरी एकच टेप वाजवतात, पालेभाज्या खात जा म्हणजे इम्युनिटी वाढेल. मोठे आले. आता सांगा म्हणावं मला पालेभाज्या खा म्हणून.’ आई त्याच्याकडे बघतच राहिली. ‘बरं जेवून तरी घे..’, आई काळजीने म्हणाली. ‘काही नको तुझं ते वरण-भात आणि पालेभाजी. आत्ताच मी मस्त संध्याकाळचं ऊन खाल्लंय’, तो म्हणाला. आणि पुन्हा आपल्या बेडरूममध्ये आला.
आता त्याला खूपच मजा वाटायला लागली. तेवढ्यात ओंकारचा फोन आला. उद्या कॉलनीतल्या बगिच्यात डब्बा पार्टी ठरली होती. सगळ्यांनी एक एक पदार्थ घेऊन यायचा होता.
दुसर्‍याच दिवशी त्याने आईला पावभाजी करायला सांगितली. त्याची आई सॉलिड टेस्टी पावभाजी करायची. संध्याकाळी तो पावभाजीचा डबा घेऊन कॉलनीतल्या बगिच्यात पोहोचला. सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ आणले होते मंचूरियन, नूडल्स, ढोकळा इत्यादी. सगळे गोल करून बसले, एकमेकांना पदार्थांची देवाणघेवाण झाली. सगळे त्या पदार्थांवर तुटून पडले; पण सोहमला मात्र काहीच खाता येईना. खारुताईने त्याला सांगितले होते, जोपर्यंत तू हिरवा आहेत तोपर्यंत तुला फक्त पाणी आणि ऊनच घेता येईल. अगदीच वाटलं तर जमिनीत बोटं खुपसून त्यातील पोषण घेता येईल. पण सगळ्यांसमोर त्याने तसं काही केलं नाही. थोडं पाणी आणि ऊन यावरच त्याने समाधान मानलं. समोरचे इतके सारे आवडते पदार्थ काही त्याला खाता आले नाही. कोणाच्या ते लक्षातही आलं नाही सगळे खाण्यामध्ये गुंग होते. थोडावेळ गप्पागोष्टी करून व अंताक्षरी खेळून सगळे आपापल्या घरी गेले.
असेच पाच-सहा दिवस उलटले. सोहमला ते बेचव ऊन खाऊन आणि पाणी पिऊन पिऊन कंटाळा आला होता. आईच्या हातचे पोहे, उपमा, भजी यांची त्याला आठवण यायला लागली. सातव्या दिवशी तर कहरच झाला. बाबा त्याच्या आवडीचे पदार्थ घेऊन आले होते. आई त्यांना म्हणाली होती की पाच-सहा दिवस झाले पोरगा काही खात नाहीये म्हणून. पण काय फायदा? सोहमला त्यातला एकही पदार्थ खाता आला नाही. तो तसंच पाणी पिऊन तडफडत आपल्या खोलीत गेला. काय बुवा आपण विकतच दुखणं घेऊन बसलोय? कधी एकदा ही खारुताई येते आणि मी पूर्वीसारखा होतो असं त्याला झालं. ‘मला नाही व्हायचं झाडबीड’, तो पुटपुटला. त्यात आज शेवटचा दिवस होता.
तो गॅलरीत गेला त्याने जोरजोरात खारुताईला आवाज दिला. ‘खारुताई... ए खारुताई... कुठे आहेस तू?’ अशोकाच्या झाडावरून खारुताई सुरर्कन खाली आली. ‘काय सोहम कसा वाटला झाडाचा गेटप? करायचा का पर्मनंट?’ तिने विचारले. कसचा परमनंट अन् काय! आधी तू मला पूर्वीसारखं कर बघू. मला कंटाळा आलाय ते सपक ऊन आणि नुसतं पाणी पिऊन. आज रविवार आई नक्की काहीतरी स्पेशल करणार. तेव्हा मला ते खायचं आहे किंवा ती काहीही करणार असली तरी मी ते खाणार आहे. मला आईच्या हातच्या अन्नाचे महत्त्व पटलंय. ‘प्लीज खारुताई! मला पुन्हा पूर्वीसारखा कर.’ सोहम अगदी रडवेला झाला होता. खारुताई खुदकन हसली. म्हणाली, ‘ये, असा माझ्या समोर बस. अन् आपले हात माझ्या हातात दे.’ त्याने तसं करताच तिनं त्याला डोळे मिटायला सांगितले. त्याने डोळे मिटताच ती गायब झाली. इकडे हा वाट बघतोय, काही आवाज येईना, शेवटी त्याने घाबरून डोळे उघडले. तर तो पलंगावर झोपला होता. त्याने आपले हात बघितले ते नॉर्मल होते पूर्वीसारखेच. ताडकन उठून त्याने आरशात जाऊन बघितलं. हिरवा रंग नाहीसा झाला होता, तो अगदी पूर्वीसारखाच होता. तेवढ्यात आई सोहम... सोहम... करत वर आली. अरे किती वेळचा झोपला आहेस. भूक लागली म्हणालास नं. मन्चुरिअन आणलंय तुझ्यासाठी. खाऊन घे.
सोहमच्या डोक्यात प्रकाश पडला. अरेच्चा! स्वप्न होतं तर ते! त्याने अशोकाच्या झाडाकडे बघितलं. गॅलरीच्या दिव्याच्या प्रकाशात एक खारुताई बसलेली दिसली. तिच्याकडे बघून तो खुदकन हसला आणि आईला म्हणाला, ‘मला नकोय ते मंचूरियन फंचूरियन मला ना तुझ्या हातचं फोडणीचं वरण आणि मेथीची भाजी खायची आहे. आज मला खूप भूक लागली आहे. चल लवकर!’ असं म्हणून तो धावतच खाली जायला निघाला. आई मात्र या चमत्काराकडे आश्चर्याने बघत राहिली.
- शरयू श्रीगडीवार