घरात हसरे तारे !

शिक्षण विवेक    22-Sep-2021
Total Views |

gharat hasre taare_1  
 
असं म्हणतात की, - child learns the first lesson of citizenship cetween the kiss of mother and the care of father !
मुलानो कुटुंबात वाढताना आई आणि वडील आजी, आजोबा, बहिण, भाऊ, इतर नातेवाईक या सर्वांच्या असतो. त्यात सोशल मीडियाची भर आज पडते आहे. आपल्या मुलाने चांगले वागावे असे प्रत्येकच पालकांना वाटत असते. जसेच मुलाने अष्टपैलू व्हावं असंही सर्वांना वाटत असतं. पण मुलांचा कल ओळखून योग्य मार्गदर्शन करावं लागतं.
मला माहितेय तुम्हाला जेव्हा चित्र काढायचा मूड असतो तेव्हा आई गणितं सोडवायला सांगते. किंवा प्रोजेक्ट करण्यासाठी कात्रणं कापायची असतात. तेव्हा बाबा इंग्लिशचे ग्रामर शिकवायला घेतात. काहीजणांकडे यापेक्षा वेगळंच चित्र असतं. तुम्ही घरात किंवा पाळणाघरात एकटे असता आणि अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं हे तुम्हाला सुचत असतं. आई वडील कामाला गेलेले असतात. अशावेळी मग वेळ नुसता मोबाईल, टिव्ही यामध्ये फुकट वेळ जातो. काहीतरी बघण्यात वेळ जातो. त्यातून मग आळशीपणा वाढत जातो. आणि मोबाईल गेम खेळण्यातले कसब वाढत जाते. इ. 5 वीतला रोहन मोबाईल गेमच्या इतका आहारी गेलाय की त्याला त्याशिवाय काही सुचत नाही. तो चिडचिड करतो. घुमा राहतो, कुणाशी बोलत नाही. इ. 8 वीतला सोहम खूप रागावतो. त्याला राग खूप अनावर होतो. वर तो म्हणतो की कुणी आई-वडिलांवरून किंवा कशावरून चिडवलं की मला राग येतो. मी हातात असेल ते मारतो. परवाच त्याने सध्या भांडणातून लेखनाचं पॅड जोरात दुसर्‍याच्या डोक्यात मारलं. 6 वीतली मानली खूप पुढे पुढे करते. सारखी शिक्षकांच्या पुढे जाऊन मी हे करते, ते आणते, माझी गृहपाठ वही बघा, मी हे चित्र काढलं असं सांगण्यासाठी सारखा बाईंच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. आणि 9 वीतल्या सुरजला कळत नाही की त्याचे इतर मित्र काय काय शिव्या देतात. शिक्षकांची चेष्टा करतात. रस्त्याने जाताना मुलींकडे पाहून काहीतरी वेगळंच बोलतात. तो नुसता पाहत राहतो. आणि कधी कधी ते ऐकलेलं सगळं बाकावर कोरून ठेवतो किंवा वहीच्या मागच्या पानावर चित्र काढून व्यक्त करता. मुलांनो ही सगळी उदाहरणं काय सांगतात ? तुम्ही तुम्ही तुमच्या आई - वडिलांशी याबाबत बोलत नाही. मित्र जास्त जवळचे वाटू लागतात. आई-वडील शाळेत आलेले तुम्हाला आवडत नाही, बरोबर ना ? हे सगळं तुमच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासाशी संबंधित आहे. तुमच्या आई-वडिलांनी आपल्या कामातून, उपयोगातून वेळ काढून तुमच्याशी बोललं पाहिजे. शाळेत किंवा बाहेर जे घडलं ते आई, बाबा, दादा, ताई यांच्याशी तुम्हीही बोललं पाहिजे. पालकांनीही हे सगळं मुलांकडून विश्वासाने काढून घेतलं पाहिजे. परवा एक पालक म्हणत होते. मी फक्त मुलाला वळण लावण्यासाठी सरळ पट्टा हातात घेतो आणि त्याला वठणीवर आणतो. माझ्या अंगावर काटा आला ते ऐकून. मुल म्हणजे काय रिंग मास्टरच्या समोरचे जनावर आहे का ? मुलांना आवश्यक तेवढे स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि विशिष्ट प्रसंगी विशिष्ट प्रकारे का वागायचे हेही समजून सांगितले पाहिजे. परवाचाच एक प्रसंग. मधल्या सुट्टीत सर्व विद्यार्थी डबा खात होते. एक मुलगा पोळीवरचे करपलेले पापुद्रे शोधून शोधून डब्याबाहेर टाकत होता. पोळी भाजताना काही काळे डाग पोळीला पडतात. पण ते न खाण्याइतके वाईट असतात का ? नावडती भाजी न खाता फेकून देण्याकडे काही मुलांचा कल असतो. आणि डबा संपलाय असे खोटे घरी सांगताना त्यांना काही वाटत नसेल का ? यासाठी आई-वडिलांना किती कष्ट करावे लागले आहेत. त्याची जाणीव पालकांनाही मुलांना करून दिली पाहिजे. मागितलेली प्रत्येक गोष्ट लगेच मुलांपुढे हजर करण्याच्या सवयीने मुलंही पालकांना वेठीला धरतात. चाचणीत पैकीच्या पैकी मिळवलेस तर अमुक तमुक प्रकारचं घड्याळ घेईन, हॉटेलमध्ये नेईन, पिक्चरला जाऊ देईन किंवा अन्य प्रलोभनं ! ही जी बक्षिसाची सवय आहे ती पुढे पुढे घटक ठरते.
मुलांनो, तुमच्याकडे हुशारी खूप आहे. पण चाणाक्षपणा सुद्धा हवा. घरी आलेल्या पाहुण्यांशी वागताना आदब, आतिथ्य पाहिजे. स्वतःचे काम स्वतः करता आले पाहिजे. शर्टचं तुटलेलं बटण, शर्टवरचा उसवलेला बॅज आपल्याला लावता यायला हवा, ते आईकडून शिकायला हवे. घरात स्वच्छता राखणे, झाडू मारणे, घरच्याच बाथरूम / बेसिन यांची स्वच्छता करणं, आपला पुस्तकांचा कप्पा / कपाट आवरणं, रद्दी टाकणं, दळण आणून देणं, भाजी खरेदी, बागेतलं किंवा कुंडीतलं बागकाम, झाडांची पाहणी, पाणी घालणं अशी कितीतरी बारीक-सारीक कामं पालकांनीही मुलांना जबाबदारीने करायला शिकवावीत. हळूहळू ती सौंदर्यदृष्टी त्यांच्यामध्ये येत जाईल. आपण रोज पुस्तकं, वह्यांसाठी जी सॅक आणतो ती अधूनमधून स्वतः धुतली पाहिजे, दुरुस्त केली पाहिजे. रोज खिशात जो रुमाल आपण आणतो तो आपणच स्वच्छ करायला शिकलं पाहिजे. पालकांचे घरातील वृद्धांशी असलेले वर्तन पाहून मुले तसे अनुकरण करतात. शेजार्‍यांबरोबर आपले नाते पाहून मुले वागतात.Children have more need of models than of critics या प्रमाणे मुलांचे critics म्हणजे टीकाकार न होता त्यांचे आदर्श होणे हे पालकांचे कर्तव्य आहे तर मुलांनी चांगलं माणूस होण्यासाठी जिथून शक्य आहे, तिथून चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. घरातल्या या हसर्‍या तार्‍यांचे तेज वाढवणं पालकांच्याच हातात आहे आणि मुले तर पालकांचे अनुकरणच करत असतात !
 
- चारुता प्रभुदेसाई