दुर्मुखलेला सुमुख

शिक्षण विवेक    23-Sep-2021
Total Views |

durmukhlela sumukh_1  
 
सुमुख दुपारी शाळेतून घरी आला तोच वैतागून. कधी नव्हे ते आज आई पण ऑफिसमधून लवकर घरी आली होती. आल्याआल्या सुमुखने शूज काढून हवेत भिरकावून दिले. आणि शाळेची बॅग पण सोफ्यावर टाकून दिली. मग काय घरात वादावादीचा कार्यक्रम सुरू झाला. आई म्हणाली, ‘सुमुख किती वेळा सांगितले शूज नीट कपाटात ठेवायचे म्हणून? आणि आज तर पावसामुळे चिखल लागलेला दिसतोय तुझ्या बुटांना. जा..बाहेर ठेवून ये. नाहीतर गॅलरीत, मोजे पण लवकर धुवायला टाक.’
‘हो गं आई.’ सुमुख वैतागून म्हणाला. आत्ताच आलोय ना घरी आणि उद्या तर 15 ऑगस्ट. शाळेत साडेसात वाजताच बोलवलंय सकाळी आणि स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यावर अर्धा तास थांबून वृक्षारोपण करायचंय. फक्त चौथीच्या मुलांना थांबायला सांगितलंय..किती बोरिंग!
आई म्हणाली, ‘अरे वा! किती छान! पण वैतागायला काय झालंय? मस्तच की! ध्वजवंदन झाल्यावर प्रत्येकाला एक झाड लावायला सांगितले असेल तुम्हाला. वृक्षारोपणाचे महत्त्व नावाचा धडा आहे ना मराठीत? प्रत्यक्ष झाड लावताना किती मजा येते! आपण लावलेल्या झाडाबद्दल आपुलकी निर्माण होते. समाधान मिळतं ते वेगळंच. खूप छान उपक्रम आहे शाळेचा.’
आईचं हे भाषण ऐकून सुमुख आणखी वैतागला. मला नाही आवडत मातीत काम करायला, हात घाण होतात, कपडे खराब होतात; शिवाय पाऊस असेल तर सगळा चिखल आणि माती लागेल युनिफॉर्मला आणि आम्ही झाडे लावून काय होणार आहे? ती मोठी होतील तोवर आम्ही शाळेतून बाहेर पडलेले असून वृक्षारोपणाचे महत्त्व म्हणे, काहीही...
आता मात्र आई त्रासून म्हणाली, ‘सुमुख, खूप चुकीचा विचार करतोस बरं का! तुला माहिती आहे का... आपण रोज वापरतो. त्यातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी आपल्याला झाडामुळेच मिळतात.’
‘हे बघ आई, मी काय शेतकरी आहे का झाड लावायला? आणि आपल्याला हवं ते आपण ऑनलाईन मागतोच की..जाऊ दे..मला खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला दे ना.’
आई विचार करून म्हणाली, ‘काय देऊ बरं? तुझा आवडता जाम-ब्रेड दिला असता पण नकोच. तो तर झाडाच्या फळापासून बनतो.’
सुमुख काहीसा फुरंगटून म्हणाला, ‘हो हो..जाम नको देऊस. दुसरं काहीतरी दे.’
आईने मग सुमुखची गंमत करायचं ठरवलं आणि म्हणाली, ‘हे काय तू खुर्चीवर बसलायस? खुर्ची आणि टेबल वापरायचं नाही आता. ते लाकडापासून बनवतात. जमिनीवर बस आजपासून.’
सुमुख वैतागून खुर्चीवरून उठत म्हणाला, ‘मी सोफ्यावर बसेन. तो तर मेटलचा आहे ना? काही तरी दे...खूप भूक लागलीये. मित्र थांबलेत खेळायचे.’
आई म्हणाली, ‘दूध पी आणि जा खेळायला...’
मुकाटयाने दूध पिऊन सुमुख खेळायला गेला. बाहेर पडल्या पडल्या त्याला त्याचा मित्र रोहन भेटला.
चल, क्रिकेट खेळू, असे रोहन म्हटला. बरोबर तो बॅट आणायला परत घरी आला. आई लगेच म्हणाली, ‘अरे बॅट लाकडाची असते. छे..छे..तू नको हात लावू बॅटला.’
आता मात्र त्याचा मूड जाऊ लागला. काय करावं बरं? क्रिकेट नको खेळायला, पुस्तक वाचावं. फार काय, जमिनीवर बसून वाचावी लागेल. तो त्याच्या रूममध्ये जाऊन पुस्तक घेणार तोच आई म्हणाली, ‘अरे पुस्तक काय वाचतो. ते तर कागदापासून बनवतात आणि कागद झाडापासून.’ सुमुख आता चांगलाच वैतागला. वैतागून त्याने रूममधला संगणक सुरू केला. तेवढ्यात बाबा बाहेरून आले. ‘सुमुख संगणक बंद कर. वीज नाही वापरायची. वीज कोळशापासून बनते आणि कोळसा झाडापासून.’ ‘बापरे!’ सुमुख म्हणाला, म्हणजे आईने आल्याआल्या बाबांना सगळं सांगितलेलं दिसतंय. आल्या-आल्या बाबांची बॅटिंग सुरू. चला, आपण आपल्या बागेत जाऊन बसावं, असं मनातल्या मनात म्हणत सुमुख बाहेर जायला निघाला. तेवढ्यात आई म्हणाली, ‘हे बघ, बागेत जात असशील तर जा पण बाकावर बसू नको ते लाकडाचे बनवलेत.’
‘अरेच्या! हिला कसं कळलं आपल्या मनातलं? मनाशीच पुटपुटत ते तिकडे तो विचार करू लागला. वीज वापरायची नाही, कागद नाही, लाकूड नाही आता काय करावं बरं?’
आई-बाबांनी सुमुखच्या मनातली चलबिचल ओळखली. बाबा हसून म्हणाले, ‘सुमुख ये.’इथे सुमुख हळूहळू मान खाली घालून सावकाश चालत बाबांजवळ जाऊन बसला.
बाबा म्हणाले, ‘हे बघ..तू जर झाडापासून मिळणारी कुठलीच गोष्ट वापरायची नाही असं ठरवलं ना तर तुला पाणीपण पिता येणार नाही. झाडामुळेच तर पाऊस पडतो आणि पाणी मिळतं.’
हळूहळू सुमुखला वाटायला लागलं, हं...म्हणजे पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. म्हणजे झाडं नसतील तर..
बाबा म्हणाले, ‘पाणीच काय शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन पण झाडापासूनच मिळतो ना!’
‘खरंच की!’ सुमुख डोळे मोठे करत म्हणाला. हवा, पाणी या तर जगण्यासाठी आवश्यक गोष्टी. आम्हाला सायन्समध्ये शिकवले आहे. मी उगाच डोकं फिरवून घेतलं आई-बाबा मी उद्या नक्की शाळेत जाईन. झाड लावीन, इतकंच नव्हे तर त्यांची काळजी घेईल. चुकलंच माझं किती मजा येईल झाडे लावायला, तेही मित्रांबरोबर.
‘शाब्बास!’ आई-बाबा दोघेही हसून म्हणाले.
लाडात येऊन म्हणाला, ‘चल आई, मला आता जामब्रेड दे बरं?’ पण आईने कधीच कौतुकाने आपल्या लाडक्या सुमुखासाठी जामब्रेड बनवायला स्वयंपाकघरात गेली होती.
 
 - अश्विनी अंबिके, शिक्षिका, एस.पी.एम.इंग्लिश मिडियम स्कूल, पुणे.