स्वावलंबनाचे धडे, वाचन उपक्रम आणि बरेच काही...

शिक्षण विवेक    25-Sep-2021
Total Views |

swavalambanche dhade, vac
मी आणि माझे पती दोघेही नोकरदार. त्यामुळे दोन्ही मुले पाळणाघरात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाळणाघर बंद आहे. मला घरून काम करण्याची मुभा असली तरी पती रुग्णालयात नोकरीस असल्यामुळे अत्यावश्यक सेवा अंतर्गत त्यांना ही ’घरून काम-वर्क फ्रॉम होम’ ची सवलत नाही. ऐरवी रोजची धावपळीची दिनचर्या कोरोनामुळे काहीशी संथ झाली आहे. कामाच्या व्यापातून व्यायाम, वाचन, घरगुती कामे यासाठी विशेष वेळ मिळत नसे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या ’ घरून काम ’ सवलतीमुळे कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा वेळ वाचतो आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सकाळी उठून कामाला जाण्याचा लगबगीचा वेळ मी घरात कुटुंबियांसमवेत योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार घालणे आदींसाठी देत आहे. माझ्या पतींना वाचनाचे वेड असल्यामुळे घरात पुस्तकांचा कप्पा-बुक शेल्फ’ आवर्जून करून घेतला आहे. त्यामुळे कुटुंबात वाचन संस्कृती आहेच आणि ती आमच्या भावी पिढ्यांमध्ये कशी झिरपेल याकडे या काळात वेळेचा सदुपयोग म्हणून आमचे विशेष लक्ष आहे. शामची आई, विनूची आई, अजिंक्य मी, बोक्या सात बंडे (सर्व भाग), साने गुरूजींच्या गोड गोष्टीं (सर्व भाग), एक होता कार्व्हर, अ‍ॅनिमल फार्म इत्यादी पुस्तके मुलांना वाचनास उपलब्ध करून दिली आहेत. मुलं देखील वाचनाचा आनंदानुभव घेत आहेत म्हणून विशेष आनंद. त्यामुळे मुले वाचनात मस्त आणि मी कामात व्यस्त. घरकाम मदतनीस ताईंना पूर्ण पगारी सुट्टी दिली आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, घराची स्वच्छता अधिक कार्यालयीन कामांचा थोडासा ताण सुरुवातीला जाणवत असे. पण ही कामे आम्ही कुटुंबीयांनी आता वाटून घेतली आहेत. घरकाम मदतनीस ताईंचे आणि त्यांच्या श्रमाचे मोल आता अधिकच जाणवत आहे. सुरुवातीला शाळेला सुट्टी असूनही बाहेर खेळायला का जाता येत नाही? मुलांना हे समजावणे जड जात होते. पण मुलांना एव्हाना त्यामागील कारण आता पुरेसे समजले आहे. मुलांना भाजीसाठी कांदा, मिरची, लिंबू चिरून देणे, आंघोळीनंतरचे स्वतः चे रोजचे कपडे धूणे आणि नाश्ता जेवणानंतरची आपापली भांडी स्वच्छ धुवून ठेवणे, कपड्यांच्या घड्या घालणे आदी करता येण्यासारखी कामे सोपवली आहेत. मुलं देखील ती आनंदाने करत आहेत. स्वावलंबनाचे बालकडू आम्ही मुलांना देत आहोत. जेवणात विविध भाज्यांचे सूप तसेच पोषक अन्नपदार्थ करण्यावर भर दिला जात आहे. मारूतीच्या शेवटीप्रमाणे लांबत चाललेला लॉकडाऊन आणि त्याप्रमाणे मुलांसाठीचा टास्क’ देखील वाढत चालला आहे. मी मुलांना त्यांच्या रोजच्या जेवणाच्या पोळ्या करण्यास शिकवत आहे. कधी भारताचा तर कधी जगाचा नकाशा तयार होत आहे. पण मुलं ते आनंदाने करत आहेत. आपल्या हाताने केलेली पोळी म्हणून अधिकची अर्धी गट्टम करत आहेत.
शाळा बंद शिक्षण सुरू’ या धोरणांतर्गत ऑनलाईन शिक्षण तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली’ कार्यक्रमांत मुलं आवर्जून सहभाग नोंदवत आहेत. टीव्ही, मोबाईलला पूर्णपणे फाटा देत नानाविध उपक्रम मुलांना करण्यास दिले आहेत.
 
- माधुरी शिंदे, 
पालक, नवीन मराठी शाळा, पुणे