कोकणातला गणेशोत्सव

शिक्षण विवेक    27-Sep-2021
Total Views |

kokanatala ganeshotsav_1& 
 
कोकणातला गणेशोत्सव खासच असतो! कोकणात या दिवसांमधे हिरवीगार भातशेती डोलत असते आणि शेतातल्या मधल्या पायवाटांमधून वाजतगाजत गणपती घरोघरी येतात. नोकरीनिमित्त मुंबई वा दुसर्‍या शहरात असलेले कोकणातील रहिवासी गणेशोत्सवासाठी खास कोकणातल्या आपल्या घरी येतात.
गणपतीची पूजा करायची तर गणपतीची मूर्ती तर हवीच. कोकणातल्या छोट्या छोट्या गावांमधे काही घरं अशी असतात की जी अनेक वर्ष मूर्ती तयार करतात आणि त्यांची विक्री करतात.
काही घरांमधे अशी पद्धत आहे की गणपती तयार करण्यार्‍या व्यक्तीच्या घरी श्रावण महिन्यातच पाट देऊन ठेवतात. त्याच पाटावर ठेऊन गणपतीची मूर्ती घरी आणली जाते.
गणपती तयार करणे किंवा तयार मूर्ती आणून रंगविणे हे खूप खास कौशल्याचे काम आहे. गणपतीचे अंग,वस्र, दागिने रंगवणे हे खूप जबाबदारीचे काम आहे. गणपतीच्या मूर्तीच्या डोळे रंगविणे हे खूप महत्वाचे काम असते. बाप्पा जणू आपल्या भक्तांशी बोलतो आहे, त्यांच्याकडे बघतो आहे अशा पद्धतीने डोळे रंगवणे ही एक विशेष कला मानली जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील, राजापूर तालुक्यातील ताम्हाने हे एक बारा वाड्यांचं छोटं गाव आहे. या पूर्ण गावातल्या घरांमधे गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती आणली जाते पांचाळ कुटुंबियांच्या घरातून. त्यांच्या घरी गणपतीचा कारखाना आहे.
ताम्हाने माध्यमिक विद्यामंदिरात इयत्ता दहावीमधे शिकत असलेला यश पांचाळ पाचवीत असल्यापासून त्याच्या वडिलांना कामात मदत करतो आहे.
आता त्यांच्याघरी तयार मूर्ती आणून त्या रंगविल्या जातात. मलकापूर येथून ते गणपतीच्या मूर्ती विकत आणतात. या मूर्ती न रंगवलेल्या असतात. साधारण १२५-१५० च्या आसपास मूर्ती टेंपोत घालून गावात आणल्या जातात. या मूर्ती अलगदपणे टेंपोतून उतरवून घेणे, अंगणात त्या ओळीने मांडून ठेवणे, कोल्हापूरहून रंग मागविणे अशी कामे यश करीत असतो. श्रावण महिन्यात त्याचं घर रंगाने आणि भक्तीनेही रंगून जातं.
आपल्या शाळेची वेळ, शाळेचा अभ्यास सांभाळून यश बाबांना मदत करतो.
"गणपतीची मूर्ती रंगवायला बसलो की मन तिथेच रमतं" असं यश सांगतो.
त्याच्या अंगणात हरितालिका आणि गणेश चतुर्थी या दोन दिवशी खूप गर्दी होते. आपापले गणपती न्यायला गावातले लोक उत्साहाने त्याच्याकडे येतात.
गावातल्या लोकांनी आधीच त्यांना कशी मूर्ती हवी हे यशला आणि त्याच्या बाबांना सांगून ठेवलेलं असतं त्यानुसार गणपतीबाप्पांना सजवून नटवून तयार केले जाते. दरवर्षी वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या मूर्ती बाजारात उपलब्ध होतात. लोक आपापल्या आवडीनुसार त्यांची निवड करतात.
त्याच्या वडिलांच्या या व्यवसायात मदत करायला यशला आवडतं. आता तो स्वतंत्रपणे मूर्ती उत्तमप्रकारे रंगवायला लागला आहे. त्याच्या बाबांप्रमाणेच त्यालाही कायम गणपती मूर्ती रंगविण्याचा आणि त्यांची विक्री करण्याचा हा कौटुंबिक व्यवसाय पुढेही कायम सुरू ठेवण्याची इच्छा आहे.
 
- आर्या जोशी