कवितेचं रहस्य

शिक्षण विवेक    29-Sep-2021
Total Views |

kavitecha rahasya_1 
 
वा! काय सुंदर लिहितेस, मस्त!’ अशा कौतुकाच्या वाक्यांची माझ्या कानांना सवय अलीकडेच दोन-तीन वर्षात झाली. माझ्या घरी आई, मावशी, आजी-आजोबा सगळ्यांनाच साहित्याची आवड, त्यामुळे पहिल्यापासून भाषेचे, साहित्याचे कळत-नकळत संस्कार माझ्यावर झाले आणि त्यामुळेच मला शब्दांचीमहती उमगली. त्यांचे सौंदर्य समजले आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली.
मी दुसरी तिसरीत असताना मी आईप्रमाणे लेख, निबंध लेखन करू लागले. नंतर लिखाणाचा कंटाळा ही आपल्याबद्दल असलेली तक्रार माझ्याबाबतीत होती. त्यामुळे कमीत कमी शब्दात आशय मांडू लागले आणि तिथेच कवितेचा जन्म झाला. वाईटातून चांगलं होतं हे असं, माझ्या कंटाळ्यानेच मला कवितेकडे पोहोचवलं.
तुला एवढं कसं सुचतं ग?’ यासारख्या प्रश्नांची सुद्धा मला अजून ओळख होतच आहे. प्रश्न साधा, सरळ, सोपा असला तरी मला तर हे असे प्रश्न विचित्रच वाटतात. कसं सुचतं म्हणजे, असंच सुचतं! एवढं सोपं उत्तर आहे माझ्याकडेआणि मी यामध्ये वेगळं, काही अवघड करते असं सुद्धा मला वाटत नाही.
आतापर्यंत कवितेचं मला कळलेलं एक रहस्य मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यांनाच वाटतं कविता लिहिताना आपल्याला त्या वातावरणात, परिस्थितीत असावं लागतं किंवा त्यामागे काहीतरी विचार असावा लागतो. पण नाही. असं काही नसतं. खरंतर सगळ्यांच्याच भावना सारख्याच असतात. गरज असते फक्त व्यक्त होण्याची. आपल्या मनातील भाव, इतरांच्या हृदयाचा ठाव घेतातच. फक्त कागद पेन हातात घेण्याचा अवकाश...
- मेघल सुनील म्हसवडे,
व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल, पुणे.