गणपतीची सुट्टी पडली तसे विशूच्या मस्तीला उधाण आले होते. उद्या बाप्पा घरी येणार म्हणून आई आवराआवर करत होती, तर त्यातच खेळाचा पसारा घेऊन विशूचा धिंगाणा चालू होता. आईच्या ओरडण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.
दुसर्या दिवशी सकाळी विशूचे बाबा बाप्पांची मूर्ती घेऊन घरी आले. त्यांनी बाप्पांची यथासांग पूजा केली. पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवायचा म्हणून आई मोदकाचे ताट तयार करायला लागली. तोच विशू तेथे आला आणि त्याने आईला न विचारता गपकन दोन मोदक तोंडात टाकले. आईला विशूचा प्रचंड राग आला. ती विशूला ओरडली, ‘‘विशू, पहिला नैवेद्य बाप्पाला दाखवायचा असतो. कितीवेळा सांगायचं तुला? जरा तुझ्या दादाकडे बघ... तो कसा शहाण्यासारखं वागतो आणि तू ... जा पळ इथून... पुन्हा आलास तर मार खाशील. तुला तर शाळेतून सुट्टीच द्यायला नको होती.’’
आई ओरडली याचा विशूला राग आला. या घरातील कोणीही आपल्यावर प्रेम करत नाही, असे विशूला वाटले. यांच्याबरोबर राहण्यापेक्षा आपण एकटे राहावे आणि मज्जा करावी असे विशूला वाटू लागले. रात्री घरातील सगळेजण झोपले की, आपण घरातून पळून जायचे आणि एकटे राहायचे असा निश्चय विशूने मनोमन केला आणि तो रात्र होण्याची वाट पाहू लागला.
त्याच्या मनातील विचार बाप्पाने मनोमन ओळखला. विशूच्या या कल्पेचे बाप्पाला हसू आले. त्याने विशूला समज द्यायची ठरवली.
रात्री सगळी झोपल्यावर आपण पळून जायचे ठरवत विशू डोळे मिटून पडून राहिला. मात्र भरपेट जेवल्यामुळे कधी झोप लागली हे त्याला कळलेच नाही. रात्री विशू झोपल्यावर बाप्पा त्याला आपल्या लाडक्या उंदरावर बसवून कैलासावर घेऊन आले. थंड वार्याच्या झोताने विशूला जाग आली. बाप्पाला आपल्या जवळ बघून आधी विशूला भीती वाटली, पण नंतर मात्र बाप्पाने हसून त्याला जवळ घेतल्यावर त्याची भीती दूर झाली. कैलासावर पोहोचल्यावर बाप्पाने विशूला तिथल्या सार्यांची ओळख करून दिली. विशू हे माझे आई-बाबा, शंकर-पार्वती आणि हा माझा भाऊ कार्तिक दादा आणि हा नंदी. आम्ही सारे एकत्र राहतो. काय रे तुझ्या फॅमिलीसारखीच आहे ना आमची फॅमिली...
‘‘हो!’’, विशू आनंदाने हसत म्हणाला. ‘‘तू सगळ्यांत छोटा आहेस का बाप्पा?’’ विशूने विचारले.
‘‘हो! हा कार्तिक दादा माझा मोठा भाऊ. विशू हा तुझ्या दादासारखाच शांत आहे. मला मात्र खूप मजा मस्ती करायला आवडते. उंदरावर बसून सगळीकडे फिरायला, भरपूर मोदक खायला, नंदी सोबत मस्ती करायला आवडते. पण भरपूर मस्ती केली की आई-बाबा ओरडतात.’’ ‘‘मग तू काय करतोस बाप्पा?’’, विशूने विचारले. त्याच्या प्रश्नांत प्रचंड उत्सुकता होती. ‘‘मी... मी आई-बाबा ओरडल्यावर गप्पा बसतो, कारण मला माहीत असतं की ते आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला ओरडतात. आई ओरडली तरी मी पळून जाण्याचा विचारही करत नाही.
आपला विचार बाप्पाला कळला याचं विशूला आश्चर्य वाटलं
‘‘विशू तू पळून गेलास तर तुला खाऊ कोण देईल? आईच्या कुशीतही तुला झोपता येणार नाही’’, हे ऐकून आता मात्र विशूला रडू आले.
त्याला आपली चूक कळली. आपण कधीच पळून जाणार नाही असे त्यानी बाप्पाला प्रॉमिस दिले आणि तो बाप्पासोबत घरी यायला उंदरावर बसला.
-उत्कर्षा सुमित