समाजधारणेसाठी धाक हवाच

शिक्षण विवेक    27-Jan-2022
Total Views |

samajdharanesathi dhaak havach 
 
प्रश्‍न : हल्लीची मुलं वाचत नाही. ती नीट वागत नाही. आताची पिढी खूप फास्ट आहे, ‘अ‍ॅडव्हान्स्ड’ आहे, असं सतत बोललं जातं. अनेकदा पालकांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ग्रूपवरही असाच सूर आळवला जातो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मुळात ‘हल्लीची मुलं’ आणि ‘तेव्हाची मुलं’ असा फरक केला जातो, तो योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर : वातावरण नक्कीच बदललं आहे. तेव्हाची खेडे आता खेडी राहिली नाहीत. त्यांची वाटचाल शहराकडे सुरू आहे. विज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे आणि नव्वदच्या दशकात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे खूप मोठे बदल झाले आहेत. शाळा, महाविद्यालये, वर्तमानपत्रे, चित्रपट अशा अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे फरक निश्‍चित पडला आहे. याचाच एक भाग म्हणजे, वर्तणुकीत बदल झाला आहे. मोठ्यांविषयीचा धाक आता वाटेनासा झाला आहे. मोठ्यांचा धाक असायलाच हवा का? त्यांच्याविषयी आदर वाटायलाच हवा का? असे अनेक प्रश्‍न आज पडतात. पूर्वी तसं नव्हतं. आमच्या गावी माझे वडील रस्त्याने जायचे, तेव्हा कोणी बिडी पीत असेल तर, ते घाबरून बिडी फेकून द्यायचे. त्यांच्याबद्दल सगळ्यांना मोठा आदर वाटायचा. दबदबा होता. यामुळे संस्कृतीचं रक्षण साहजिकच होत होतं. व्यसनाधीनतेचं पेव फुटलं नव्हतं. मुलांना धाक वाटायचा. ‘देव काय म्हणेल? शाळेच्या गुरूजींना सांगेन’, असे कोणत्याही प्रकारचे धाक आताच्या मुलांना वाटत नाही. आमच्या ‘मुक्तांगण’ या संस्थेत अनेक लहान मुलं येतात. आपल्याला माहीत नसतील अशी नाना व्यसनं त्यांना माहीत असतात. चौथी-पाचवीची ही मुलं व्यसनांच्या विळख्यात आहेत, हे पाहून काळीज हेलावतं. सात-आठ वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतात, अशा बातम्यांचं प्रमाण पूर्वी अत्यल्प होतं किंवा नव्हतंच. आता ते प्रमाण वाढलं आहे. हल्ली कुठेही धरबंध राहिलेला दिसत नाही. कोणीच कोणाला जुमानत नाही, असं झालं आहे. मोठेपणी नोकरी करताना कामाच्या ठिकाणी गैरव्यवहार करू नये, याची शिकवण मुलांना लहान वयातच द्यायला हवी. हल्ली मात्र असे प्रकार न करणार्‍या माणसाला वेड्यात काढलं जातं, हे चुकीचं आहे. अगदी साधं उदाहरण, की पूर्वी पाढे आणि स्पेलिंग पाठ केलेच पाहिजे, अशी सक्ती मुलांना होती. ते मुलांच्या चांगल्यासाठी होतं. आता तसं होताना दिसत नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर हल्लीची मुलं आणि तेव्हाची मुलं यात फरक आहे, असं वाटतं. मात्र, अमूक एका बिंदूपाशी आधीचा प्रवास संपला आणि आताचा सुरू झाला, असं ठरवता येत नाही. ही एक निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. स्थित्यंतर आहे. आता मुलांनी चुकू नये, वाईट मार्गाला लागू नये, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी काही प्रमाणात धाक असायलाच हवा. समाजधारणेसाठी त्याची आवश्यकता आहे. सभ्यता काटेकोरपणे पाळली पाहिजे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी जसं वागता, तसंच तुमची मुलं तुमच्याशी वागतील, हे तरुणांनी विसरता कामा नये.
प्रश्‍न : तुम्ही उदंड लेखन केलं. त्यासाठी प्रचंड प्रवास केला. सामाजिक कार्य केलं. सामाजिक संस्था उभारल्या. छायाचित्रण, ओरिगामीचे छंद जोपासले. बासरीवादनही तुम्ही करता. या जीवनप्रवासात पैसा, करिअर, सेटलमेंट असा सरसकट विचार तुमच्या मनात आला नाही का? आज मुलं आणि पालक याच चक्रव्युहात अडकली आहे, असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर : मी हे सगळं केलं. कारण मला त्यातून आनंद मिळत गेला. प्रवास करणं, अगदी एसटीच्या मागच्या सीटवर बसून खेडोपाडी जाणं, कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता फिरत राहणं, मिळेल ते अन्न खाणं, लोकांशी बोलणं, त्यांची दुःख जाणून घेणं, त्यावर लिहिणं, त्यांच्यासाठी जमेल ते करणं, हे मला आवडत होतं. मला त्यातून आनंद मिळत होता. त्यामुळे मी त्यात रमलो. मला महाविद्यालयात मित्र म्हणून ‘युक्रांद’चे संस्थापक कुमार सप्तर्षी भेटले. त्यानंतर काही वर्षांनी बाबा आढवांशी ओळख झाली. त्यांच्यामुळे माझ्या जगण्याची आणि जीवनाकडे बघण्याची दिशाच बदलली. आपण लोकांसाठी काही तरी करावं असं वाटत गेलं आणि ती भावना आनंद देत गेली. आमच्या गावातदेखील मी वंचितांच्या वस्तीत रमायचो. त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्‍न समजून घ्यावे असं मला वाटायचं. भेदभावाचा विचार कधीच माझ्या मनात आला नाही. मी चांभार, सुतार यांचं काम मन लावून पाहत बसायचो. त्यातून मलाही ओरिगामी, लाकूड कोरण्यासारखे छंद सापडले. अशा अनेक गोष्टींचा प्रभाव माझ्या जडणीघडणीवर आहे. सर्वांना ते जमेल असं नाही. ज्यांना शक्य असेल, त्यांनी नक्की हा मार्ग पत्करावा. मात्र, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी, समाजाप्रति संवेदनशील राहणं आवश्यक आहे.
 
 
प्रश्‍न : तुम्ही संवेदनशीलतेची व्याख्या कशी कराल?
उत्तर : संवेदनशीलतेची व्याख्या करावी, असं मला वाटत नाही आणि मी ती करणार नाही. व्याख्या, विश्‍लेषण यात मला पडायचं नाही. मात्र, संवेदनशीलता हा जगण्याचा, अनुभवण्याचा आणि अंगी बाणवून घेण्याचा भाग आहे, हे मी आवर्जून सांगेन.
 
प्रश्‍न : सोशल मीडिया हा आता आपल्या जगण्याचा मोठा भाग झाला आहे. मात्र, यामुळे लगेच व्यक्त होणं, प्रतिक्रिया देणं, अभ्यास न करता मत देणं याचं प्रमाण वाढतं आहे. मोठ्यांसोबत अनेक मुलंदेखील ‘लाइक, कमेंट, शेअर’च्या मागे आहेत. यातून कळप तयार होणं आणि त्याचं अंधानुकरण होणं, हे प्रकारही वाढताना दिसत आहेत. याला संवेदनशीलता म्हणायचं की कट्टरता? याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
उत्तर : असं निश्‍चित सांगता येणार नाही. मात्र, एक विनोद आठवतो. मुलगा वडिलांना म्हणतो, की बाबा मी मोठा झालो आता मला फेसबुकवर अकाउंट ओपन करता येणार आहे.’ बाबा म्हणतात की, ‘अरे वाह! आता नीट वागायचं. छान लिहायचं.’ त्यावर मुलगा म्हणतो, ‘हो बाबा, मला तुमचंही अकाउंट माहीत आहे. कारण अनेकदा तुमच्यावतीने मीच लिहीत असतो.’ यातला विनोदाचा भाग सोडला, तरी अशीही परिस्थिती काही ठिकाणी आहे. त्यामुळे याचा परिणाम मुलांच्या भावविश्‍वावर होतो, हे वेळीच ओळखून पालकांनी नीट वागायला हवे.
 
प्रश्‍न : मुलांना घडवण्याच्या उद्देशाने तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल? काय सांगाल?
उत्तर : मुलांनी जे करावं असं पालकांना वाटतं, ते पालकांनी करावं आणि जे त्यांनी करू नये, असं वाटतं, ते पालकांनी करू नये. मुलांनी खोटं बोलू नये, असं वाटत असेल, तर पालकांनी खोट बोलू नये. मुलांना व्यसन लागू नये, असं वाटत असेल, तर पालकांनी व्यसन करू नये. इतकं सोपं आहे. तुम्ही जसं वागाल, त्याचं प्रतिबिंब मुलांमध्ये दिसेल आणि मुलं त्याचं अनुकरण करतील. याचं भान ठेवून पालकांनी नीट वागणं आणि संवेदनशील होणं आवश्यक आहे.
 
( मुलाखतकार : मयूर भावे )