नारळ क्रिकेट

शिक्षण विवेक    03-Jan-2022
Total Views |

naral cricket 
 
शाळेला चार दिवसांची सुट्टी होती. टिटो, चिटो, पारो, कारो आणि हनुमान या पाच जणांनी सुट्टीतला अभ्यास आधीच संपवून टाकला होता. आता चार दिवस करायचं काय? हेच त्यांचं ठरत नव्हतं.
टिटोला वाटत होतं, मैदानावर जाऊन चार दिवस धमाल धूम फूटबॉल खेळूया. चिटोला वाटत होतं, जवळच्या सोनपहाडावर हायकिंगला जाऊया. डोंगर माथ्यावर तंबू ठोकून एक रात्र तिकडे मुक्काम करू या. चिरोचं म्हणणं होतं उगाच उन्हातान्हात भटकण्यापेक्षा घरी बसूनच कॅरम, सापशीडी, उनो आणि पत्ते खेळूया. किरोला तर सगळ्यांचंच म्हणणं बरोबर वाटत होतं. त्यामुळे आपण नेमकं काय करायचं हेच त्याला कळत नव्हतं.
इतक्यात हनुमान ओरडला, ‘‘आपण माझ्या मामाच्या गावाला जाऊया. तिथे खेळायला चिक्कार जागा आहे. बाहेर खेळून कंटाळा आला की, घरात बसून खेळू आणि घरात खेळून कंटाळा आला की, नदीत लोळायला म्हणजे पोहायला जाऊ. काऽऽऽय कशी आहे आयडिया?’’
सगळे उड्या मारत ओरडले, ‘‘आयडिया एकदम बेस्टम बास्ट, चला जाऊ या फास्टम फास्ट!’’ सगळ्यांनी घरी जाऊन आईची परवानगी घेतली चटाचट. पाठीवर सॅक अडकवून, सायकली घेऊन निघाले सगळे फटाफट.
डोंगराच्या पलीकडेच आहे हनुमानाच्या मामाचं गाव. सकाळची वेळ असल्याने मुले उत्साहात होती. सपासप सायकल चालवत होती. फक्त हनुमान हातात हँडल धरून, सायकलवर मांडी घालून बसला होता. त्याची शेपटी सायकल चालवत होती. थोड्यावेळात डोंगर सुरू झाला. खूपच कठीण घाट. इतक्या ऊंच चढावर सायकल रेटणे अगदी कठीण होऊ लागले. टिटो, चिटो, कारो आणि पारो खाली वाकून पेडल चेपू लागले. हे सगळे घामाघूम झाले.
टिटो, चिटो, कारो आणि पारो सायकलवरून खाली उतरले. हनुमानपण खाली उतरला आणि म्हणाला, ‘‘मित्रांनो, काही काळजी करू नका. आपण एक आयडिया करू. सायकलवरूनच सरसर सरासर डोंगरावर जाऊ आणि तिथुनच...’’
हनुमानाला थांबवत त्याचे मित्र ओरडले, ‘‘नाही रे बाबाऽऽऽ आता सायकल पुढे रेटणे शक्यच नाही रेऽऽऽ’’
‘‘मी तेच तर म्हणतोय मित्रांनो. सायकल न रेटताच सायकलवरून सरसर सरासर डोंगरावर जाऊ...’’
‘‘क्काऽऽऽय? सायकल न रेटताच डोंगरावर जाऊ? कसं काय?’’
‘‘अरे मित्रांनो मला शेपटी आहे हे विसरलात का?’’
‘‘म्हणजे?’’
‘‘तुम्ही सगळे एका रांगेत सायकलवर बसा. मी तुम्हाला झपाझप ओढून घेऊन जातो. आपण सरसर सरासर डोंगर माथ्यावर पोहोचू. मग पुढे आहे उतार. तिथून आपण झरझर झराझर खाली उतरू.’’
सगळे आनंदाने म्हणाले, ‘‘चलो चले चकचक चकाचक.’’
सगळे रांगेत एकमेकांना धरुन सायकलवर बसले. हनुमान सगळ्यांच्या पुढे. हनुमानाने दोन हात वर केले आणि मनापासून म्हणाला, ‘जय श्रीराम’! त्याबरोबर हनुमानाची शेपटी मोठी-मोठी झाली! शेपटीने चौघांच्या सायकलींना पकडून एक वळसा घेतला.
हनुमान आरामात पेडल मारत सायकल चालवू लागला. हनुमानाचे मित्र सायकलवर हात सोडून, हवा खात बसले होते. वळणावळणाचा रस्ता होता. काहीवेळा छोट्या वळणावर मित्रांच्या सायकली हवेतच तरंगत! मग मित्र किंचाळत! काहीवेळा त्यांच्या सायकली खोल दरीच्या वर तरंगत तेव्हा त्यांचे खाली पाहून डोळे फिरत! तर काहीवेळा हे मित्र उगाचच आरडाओरडा करत!
थोड्याच वेळात ते डोंगर माथ्यावर पोहोचले. हनुमानाची शेपटी पुन्हा पहिल्यासारखी झाली. सगळेजण उतारावरून झरझर झराझर निघाले फास्टम फास्ट आणि खटाखट पोहोचले मामाच्या घरी. या अचानक आलेल्या पाच टकाटक पाहुण्यांना पाहून मामा चकम चकीत झाला.
मग हनुमानाने सांगितलं, ‘‘आम्ही दोन दिवस राहणार आहोत. आम्ही इथे खेळणार आहोत. आम्ही इथे पोहणार आहोत. आम्ही झाडावर चढणार आहोत आणि तुझं लक्ष नसताना थोडीशी मस्तीपण करणार आहोत.’’
हनुमानाची पाठ थोपटत मामा म्हणाला, ‘‘कबूल. कबूल. मलापण आहे चार दिवस रजा, आपण मिळून करू मजा! मुलांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. मुले खूशम खूश झाली. मुले सायकल चालवून चालवून दमली होती. घाटात हवेत तरंगून तरंगून आणि हवेत तरंगल्याने ओरडून ओरडून मुले आणखी दमली होती.
मुले मस्त जेवली आणि बागेत झाडाखाली पसरली. थोड्याच वेळात टिटो म्हणाला, ‘‘चला क्रिकेट खेळूयाऽऽऽ’’ त्याबरोबर हनुमान टुणकन उडी मारून उठला आणि म्हणाला, ‘‘पहिली माझी बॅटींग. मी सिक्स मारणार!’’
टिटोने मामाच्या घरातून बॅट शोधून काढली; पण त्याला बॉल काही मिळाला नाही. मामा एक जादूचा बॉल घेऊन आला. एकदम कडक कडकडीत आणि टणक टणटणीत बॉल. बॉल हातामधे खेळवत, कॅच कॅच खेळत आला मामा. मुले म्हणाली, ‘‘बघू. बघू बरं हा बॉल.’’
मामा म्हणाला, ‘‘नाही. अजिबात नाही. कारण हा जादूचा बॉल आहे. सॉलीड बॉल. पाच बॉलमधे तुम्ही पाचही जणं आऊट होणार कारण मी आधी बॉलिंग करणार!
‘‘का मामा? तू का पहिली बॉलिंग करणार?’’ मुले चिरचिरली.
‘‘कारण बॉल मी आणलाय; म्हणून माझी पहिली बॉलिंग. ओके?’’
मुले नाइलाजाने म्हणाली, ‘‘हां ओके बोके पक्के...’’ आता हनुमान बॅटींगला आला आणि मामाची बॉलिंग. मामाने लांबून स्टार्ट घेतला. हनुमान तयार झाला. मॅच बागेत असल्याने स्टम्प म्हणजे हनुमानाच्या पाठीमागे असणारे झाड. अंपायर होता टिटो. मामाने पहिला बॉल टाकला खरा; पण काहीतरी घोटाळा झाला. बॉल मामाच्याच पायाजवळ पडला. मामाने हात चोळत बॉल उचलला.
बॉल पॅण्टवर घासत मामा म्हणाला, ‘‘सॉरी सॉरी. बॉल हातातून सूर्रकन सटकला. कारण...’’
‘‘आँऽऽऽ कारण काऽऽऽय?’’
‘‘हा बॉल आज सकाळी सकाळीच सोलला मी... म्हणजे झेलला मी... म्हणजे धुतला मी... म्हणजे...’’
मामाला पुढे बोलू न देता मुलांनी घाबरुन किंचाळत विचारलं, ‘‘तुम्ही बॉल सोलला की झेलला की धुतला? आणि का? कसा? आणि कशाला?’’
मामा हातातला बॉल लपवत ओरडला, ‘‘चला खेळूया. स्टाऽऽऽर्ट.’’ मामाने बॉलिंग टाकण्यासाठी स्टार्ट घेतला. हनुमान बॅटींगसाठी तयार झाला. मामाने धावत येऊन जोरात बॉल टाकला. हनुमानाने पूर्ण ताकदीने बॉलला सणकून फटका मारला. बॉल ऊंऽऽऽच उडाला! आधी बॉलमधून मामाच्या डोक्यावर गोड पाण्याचा अभिषेक झाला, मग बॉलचे चार तुकडे झाले! प्रत्येक मुलाच्या हातात एकेक तुकडा पडला. हनुमान हसतच पाहात राहिला. मामा म्हणाला, ‘‘व्वा! पाणी आहे गोड.’’
मुले म्हणाली, ‘‘खोबरं लुसलुशीत, दुधाळ आणि गोड आहे गोड.’’ हनुमान बॅट ऊंचावत म्हणाला, मी अजून अजून खेळणार! कारण तरच मला खायला दुधाळ खोबरं मिळणार. प्यायला गोड गोड पाणी मिळणार आणि मामा याचसाठी तू आणखी पन्नास बॉल आणणार? हो ना मामा?’’ हे ऐकताच सर्व मुलांनी टाळ्या वाजवत जोरदार कल्ला केला. मामा धावतच घरात गेला. पाठीवर पोतंभर बॉल घेऊन पळतच आला. पुन्हा नारळ क्रिकेटचा खेळ सुरू झाला!
- राजीव तांबे