अंगण

शिक्षण विवेक    10-Nov-2022
Total Views |

angan
 
घराचे अंगण
जिथे होई सार्‍यांचे मनोरंजन
माणसाची उत्क्रांती झाली आणि अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी माणूस एकत्र येऊन, वस्तीने सहजीवन जगू लागला. काळानुरूप वस्त्यांमध्ये बदल होत गेला. छोट्या छोट्या टुमदार घरात त्याचे रूपांतर होऊ लागले. घरासमोरील अंगण हे घराचा अविभाज्य भाग झाले. खरं म्हणजे घर शोभून दिसते ते अंगणामुळे. अंगण हा शब्दच मुळी मनाला ओलावा देणारा आहे. अंगणातील तुळस जेव्हा डोलायला लागते तेव्हा मंजूळ झुळूक बरंच काही सांगून जाते. शोभीवंत तुळस अंगणाचे पावित्र्य राखते. अंगणातील रेखीव रांगोळी सर्वांचे स्वागत करते. सकाळच्या प्रहरी अंगणातील झाडांवर विसावलेल्या कोकिळेचा कुहू कुहू , चिमण्यांचा चिवचिवाट मंत्रमुग्ध करणारा असतो.
 
गप्पागोष्टींचा फड रंगतो, मैत्रिणीचा कट्टा बनतो, वृद्धांसाठीची आल्हाददायक जागा म्हणजे अंगणाचा सुंदर परिसर. मला आजही आठवते की, लहानपणी आम्ही बालमैत्रिणींसोबत सागर गोट्या, गोल रिंगण, लंगडी , फुगडी, आंधळी कोशिंबीर, टिकली मारून जावे हे जे खेळ खेळले, त्यात मनमुराद आनंद मिळाला. तो म्हणजे आमच्या घराच्या अंगणातच.
 
अहो खेळच काय, तर छोटे मोठे कार्यक्रम संपन्न होतात तेही अतूट नाते असलेल्या या अंगणातच. पाय पसरून, फतकल मांडून बसता येतं, जुन्या उण्या आठवणींचे गाठोडे खोलून, बहिण भावजयी संगे बसता येतं जिथं, ते म्हणजे माझं हक्काचं अंगण. बालगोपाळांचा मेळा जमतो, विविध खेळांचा आखाडा तयार होतो, हास्याचे फवारे उडवतो आणि म्हणूनच माणूस अंगणात खूपच रंगतो.
 
माझ्या आईनी अंगणात केलेली कामे मी पाहिली आहेत. कुर्डया, पापड्या, खारूड्या अशी उन्हाळी कामे करायची कुठे तर आमच्या घराच्या अंगणातच. वाळवण वाळायची जागा होती ती म्हणजे अंगणच. आजकालच्या मुलांना वाळवण शब्द कितपत माहिती आहे कोण जाणे? अहो.. वाढत्या शहरीकरणामुळे आणि फ्लॅट सिस्टिमच्या जीवनपद्धतीमुळे, अंगण हा शब्दही लोप पावत चालला आहे. घरासमोरील अंगणाची जागा सामूहिक गार्डननी घेतली आहे. त्याला कितीही आधुनिकीकरणाचे रूप दिले, तरी या गार्डनला अंगणाची सर कशी येणार? शिवाय मुलांच्या खेळण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या मोकळ्या जागेत मोठमोठी समारंभ, भाषणे होत असतात. त्यामुळे जागेचा तुटवडा पडतो. याचा परिणाम मुले एकलकोंडी होतात आणि त्यांना दूरदर्शनसमोर बसल्याशिवाय पर्याय उरत नाही. अतिक्रमण करून काही मोकळ्या जागांवर बिल्डिंग उभ्या होत आहेत. हरवलेल्या अंगणाचा परिणाम माणसाच्या माणुसकीवर होताना दिसून येतो आहे.
 
अंगण हे नुसते अंगण नाही, तर तन मनासाठी आनंदवन आहे. म्हणून पालकांना-विद्यार्थ्यांना सांगावेसे वाटते की, मुलांना अंगणात खेळू द्या, बागडू द्या. बालपणाचा मनमुराद आनंद लुटू द्या.
 
‘सुंदर अंगण घर शोभते.’
‘मनी प्रसन्नता सदैव राखते’
 
याची प्रचिती अनुभवन्यासाठी आणि येणार्‍या पिढीला त्याचे महत्त्व सांगण्यासाठी, आजच्या पिढीला अंगणात खेळण्यासाठी प्रवृत्त्त करण्याची आज वेळ आलेली आहे. यासाठी वेळेत आणि उचीत पाऊल उचलून अंगणाचे महत्व आणि पावित्र्य जपायला हवे.
 
- सुरेखा कुलकर्णी
लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय, उदगीर