मैत्रीचे बंध

18 Nov 2022 10:36:34

maitri 
 
मुलांनो, मैत्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोणाची प्रतिमा येते, सांगा बघू ! बरोबर, कृष्ण-सुदामा, कृष्ण-अर्जुन यांची मैत्री आपल्याला लगेच आठवते. आपण यांच्या प्रेमाच्या, मैत्रीच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. आणि त्या आपल्या मनाला भावलेला असतात. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांच्या मैत्रीमध्ये असलेलं प्रेम, विश्वास, आपलेपणा, या गोष्टी शेकडो, हजारो वर्ष लोटली तरी न विसरण्यासारख्या आहेत.
मुलांनो, आपल्याला सुद्धा खूप मित्र असतात. पण त्यातला एखादाच आपला ‘खास दोस्त’ असतो. कारण, फक्त एकत्र एका व्हॅनमधून शाळेत येणे, किंवा एकत्र खेळणे, वाढदिवसाला जाणे एवढ्याच गोष्टींनी घट्ट मैत्री होतं नाही. त्यासाठी समोरच्या व्यक्तीबद्दल मनापासून प्रेम वाटणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांवर विश्वास असणे हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वास हा तर मैत्रीचा पायाच आहे. मैत्रीमध्ये जर विश्वास नसला तर ती मैत्री फार वेळ टिकू शकत नाही. थोड्या वेळासाठी जरी कट्टी-बट्टी केली तरी खरे मित्र पुन्हा एकत्र येतात.
आपला खरा मित्र किंवा मैत्रीण कोण हे कळायला सुद्धा काही काळ जावा लागतो बरं का. जी मुलं नेहमी इतरांना मदत करायला तयार असतात. सगळ्यांशी मिळून-मिसळून राहतात. ती सगळ्यांनाच प्रिय होतात. त्यांच्याशी मैत्री करायला सगळ्यांनाच आवडतं. पण अशा मुलांचे खास मित्र मात्र अगदी थोडे असतील. आपल्याला समोरच्या व्यक्तीचा जसा जसा अनुभव येतो. त्यावरून आपली मैत्री पक्की होत जाते.
तसंच मित्रानो, मैत्री ही फक्त छान वागण्यापुरती नसते बरं का ! पाल्य मित्राचं जर काही चुकत असेल तर आपण मैत्रीच्या अधिकारानी त्याची चूक दाखवली पाहिजे. त्यामुळे आपला मित्र किंवा मैत्रीण चुकीच्या वागण्यापासून दूर राहील, परावृत्त होईल. आपली मैत्री ही आपल्या मित्राच्या प्रगतीला सुद्धा पोषक / पूरक ठरली पाहिजे.
तर मग मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, मैत्री ही एक सुंदर भावना आहे. मित्रांना जपा, मैत्रीला जपा. ज्यांच्याजवळ कृष्णासारखा सच्चा, प्रिय मित्र आहे. त्याच्यासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही.
तुमच्या आयुष्यातील कृष्णाला जपा आणि स्वतः देखील कोणाच्या आयुष्यात कृष्णासारखं खर्‍या मित्राचं स्थान मिळवा.
 
- आदिती साने, पूर्व-प्राथमिक शिक्षिका,
                                                                                                                                                एस.पी.एम.इंग्लिश स्कूल, पुणे
 
 
Powered By Sangraha 9.0