पक्षी आणि झाड

शिक्षण विवेक    24-Nov-2022
Total Views |

trees and birds 
 
झाड : अरे,अरे काय हा गोंधळ माजवलाय, केव्हाचा आरडा ओरडा चाललाय तुमचा? आता शांत बसा पाहू!
पक्षी : तुला तर माहितीये ना, की आम्ही दिवसभर चरून, दाणे टिपून येतो आणि गावभर, रानभर काय काय गमती जमती पहिल्या ते एकमेकांना सांगतो रे आम्ही सगळे.
झाड : मग आज तू कुठे गेला होतास?
पक्षी : आज तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे आमचा थवा उडाला होता.खूप झाडी आहे तिकडे आणि मुख्य म्हणजे आंबे, काजू, करवंद, जांभळं अशी अनेक प्रकारची फळे आहेत तिकडे! आणि येताना दमायला झालं तर एक मस्त तलाव आहे. त्या किनारी बसून आम्ही मित्र मैत्रिणी अशीच चटर पटर करतो, तळ्यात डुबक्या मारतो आणि पुन्हा घरी येतो.
झाड : वा किती मजा आहे रे तुमची. मी बघा, मला एका जागेला जखडून राहावे लागते. तुम्ही सांगता ती गम्मत नुसती ऐकतो मी!
पक्षी : हे बघ झाड दादा, तू जखडून असलास तरी स्वतःच एक वेगळं स्थान आहे तुला! आणि मुख्य म्हणजे तू तर आमचं आश्रय स्थान आहेस. आम्ही कधीही हक्काने येतो, दोन घटका बसतो, विश्रांती घेतो आणि तुझ्या अंगा खांद्यावर बागडतो आम्ही. घरटी बांधतो, इथे राहतो. आमची पिल्लं इथे खुशाल राहतात आम्ही बाहेर जातो तेव्हा. तूच त्यांची काळजी घेतोस ना त्यावेळी?
झाड : बरोबर आहे तुझं. आपलं नातं अनेक वर्षांचं आहे. माझा जन्मच मुळी तुझ्यामुळे झाला. तुम्ही पाखरं फळं खाता, बिया टाकता आणि आम्ही जन्म घेतो.
पक्षी : झाड दादा, तुमची पिल्लं म्हणजे छोटी रोपटी कशी तयार होतात?
झाड : अरे मगाशी सांगितलं की तुला. वेगवेगळ्या झाडांचे वेगवेगळे प्रकार! काही तुम्ही टाकलेल्या बिया द्वारे, काही आमच्याच छोट्या फांद्या लावून, काही पारंब्या जमिनीत जाऊन तर काही नव्या पद्धती नुसार कलम करून!
पक्षी : बापरे, बर्‍याच वेगवेगळ्या पद्धती दिसतात! इथे तुझ्या पाय तळी पण बरीच छोटी झाडं दिसतात उगवलेली!
झाड : अरे, ती माझी लेकरं आहेत. पण हल्ली माणूस फार स्वार्थी झालाय. तो आम्हा रस्त्कडे ला असलेल्या झाडांना सारखे तोडत असतो आणि रस्त्यावर असलेल्या झाडांना प्रदूषण फार सोसावे लागते. काय करणार पण?
पक्षी : हा माणूस झाडे तोडतो म्हणून पाऊस पाणी होत नाही, मग दुष्काळ पडतो. आम्हाला उन्हाळ्यात काही खायला मिळत नाही. पाणी शोधायला खूप दूर जावे लागते.
झाड : अरे, शाळेतली छोटी मुले फार चांगलं काम करत असतात. ती वृक्षारोपण करतात, तुम्हा पक्ष्यांना पाणी, दाणे ठेवतात. इथे पारावर बसून गाणी म्हणतात. पारंबीला झोके घेतात.
पक्षी : खरं आहे. मी पण पाहिलंय हे! बरं चल आता मी निघतो, माझी रात्रीची निवार्‍याची जागा वेगळी आहे. उद्या सकाळी भेटूया. लाल पिकलेली फळं ठेवून दे. मी माझ्या मित्र मैत्रीणीना घेऊन येतो.
झाड : ये ये मित्रा, उद्या वाट बघतो!
- चारुता शरद प्रभुदेसाई,
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे