स्नेहसंमेलन - एक संस्कृती

शिक्षण विवेक    28-Nov-2022
Total Views |

gathering - a culture 
 
हाय मित्रांनो,
कशी झाली दिवाळी? मजा केली असेल ना! आईच्या हातचे भरपूर बेसनाचे लाडू फस्त केले असतील आणि सुट्टीतल्या अभ्यासावरून धम्मकलाडूही खावे लागले असतील. दिवाळी संपली, शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली आणि आता दिवस सुरू झाले आहेत ते स्नेहसंमेलन; अर्थात गॅदरिंग आणि स्पोर्टस डे यांचे. दिवाळी संपली की साधारणपणे शाळाशाळांमध्ये स्नेहसंमेलनांच्या तयारीला सुरुवात होते.
 
गायन (एकल आणि समूह), वादन, नाटक, वक्तृत्व, कथाकथन, एकपात्री, द्विपात्री, नृत्य असा खच्चून भरलेला कार्यक्रम असतो स्नेहसंमेलनाचा. काही शाळांमध्ये, कराटेचं आणि मल्लखांबाचं प्रात्यक्षिकही सादर केलं जातं. स्नेहसंमेलनाचे वेध लागतात आणि मग कुणी कुणी काय काय करायचं, याची चर्चा सुरू होते. गाण्यात कोण भाग घेणार, नाटकात कोणाला घ्यायचं, नाटकाचा विषय काय ठेवायचा; एक ना अनेक अंगांनी वर्गावर्गांत चर्चा झडू लागतात.
 
प्रत्येकाच्या वैशिष्ट्यानुसार शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांची निवड करतात आणि मग सुरू होतात तालमीचे दिवस. शिक्षकांच्या फुल्ल परवानगीने, हक्काने अभ्यासाचे तास बुडवता येतात, गृहपाठ केला नाही तर शिक्षा होत नाही, सराव करण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागलं, तर शिकवणीला टांग मारता येते आणि खूप प्रॅक्टिस करून पाय दुखले की, आईकडून लाडही करून घेता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅदरिंगनंतर ‘हर जगह अपनेही नामका चर्चा होता है बॉस!’ आपल्याला कुणी शाळेच्या आठवणी लिहून काढा असं सांगितलं, तर गॅदरिंगच्या तयारीशिवाय ते पूर्ण होणारच नाही.
 
आज प्रत्येक जण कसल्या ना कसल्या छंदवर्गाला जातो. काही जण शास्त्रीय नृत्य शिकतात, तर काही जण उन्हाळी सुट्टीत बालनाट्याच्या शिबिरात भाग घेतात. अशा मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा शाळा जास्तीत जास्त प्रयत्न करते. अशी स्नेहसंमेलने आयोजित करण्यामागचा उद्देशही खर्‍या अर्थाने तोच असतो. शैक्षणिक विकासासह मुलांच्या कलागुणांचाही विकास व्हावा; हे शाळेला आपलं कर्तव्य वाटतं. मुलांमधील कलेचा परिचय त्यांच्या मित्रवर्गाला व्हावा आणि सरावाच्या निमित्ताने, त्यात होणार्‍या गमतीजमतींच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील नातं दृढ व्हावं, हा हेतूदेखील या संमेलनांमुळे साध्य होतो. या निमित्ताने शाळेच्या अभ्यास एके मराठी, अभ्यास दुणे गणित, अभ्यास त्रिक इंग्लिश अशा दैनंदिन वेळापत्रकात थोडा बदल होतो. बदल तर हवाच, त्याशिवाय जगण्यात मजा येणार कशी? आपल्या शिक्षकांनाही यामुळे थोडं एन्जॉय करता येतं.
 
पण स्नेहसंमेलन म्हणजे फक्त कलागुणांचं सादरीकरण नव्हे बरं का! महाविद्यालयात गेल्यानंतर किंवा पुढे नोकरीला लागल्यानंतर अनेकदा आपल्याला मंचावरून बोलावं लागतं, स्वतःचं म्हणणं शांतपणे, मुद्देसूद मांडावं लागतं. जे गायक, नर्तक किंवा वादक असतील; त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांसमोर आपली कला सादर करावी लागते. अशा वेळी शाळेच्या गॅदरिंगमधला आपला सहभाग आपल्या मदतीला धावून येतो. जर शाळा पातळीवर तुम्ही मंचावरून कथाकथन, वक्तृत्व किंवा नृत्य-नाट्याचं सादरीकरण करत असाल, तर त्याची परिणती सभाधीटपणा विकसित होण्यात होते. आपल्या व्यक्तिमत्त्वात सभाधीटपणा या गुणाला अतिशय महत्त्व आहे. तुमच्या अंगी खूपसे कलागुण असतील, तुमचं बोलणं प्रभावी असेल; पण तुम्ही जर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलात, तर त्याचा उपयोग नाही. आपले गुण सादर करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारा आत्मविश्वास हा शाळेतील स्नेहसंमेलनांतून मिळतो. अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या कारकीर्दीचा पाया हा शालेय जीवनात होणार्‍या स्नेहसंमेलनात घातला गेला आहे.
 
अनेकदा तर अंगच्या गुणांचा परिचयही या स्नेहसंमेलनांच्या निमित्ताने होतो. शालेय गॅदरिंगमध्ये आपण निरनिराळ्या कार्यक्रमांत सहभागी होतो. कधी गाण्यात, कधी नृत्यात, तर कधी नाट्यात, कधी द्विपात्रीमध्ये. काही जण एकपात्री किंवा कथाकथनही सादर करतात. शाळेच्या या अनेक वर्षांच्या प्रवासात आपली एखाद्या कलेशी नाळ जुळते किंवा आजवर लक्षात न आलेला एखादा कलागुण आपल्याला समजतो. माझंच उदाहरण देते. अगदी चौथी-पाचवीपासून मला वाटाचयं की, आपण प्रत्येक प्रकार सादर करावा. सगळ्या कलाप्रकारांमध्ये सहभाग घेऊन झाला. हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की, गाण्यात आणि ज्याचा भाषेशी संबंध आहे; अशा एकपात्री किंवा कथाकथन या प्रकारांत आपण जास्त रमतो. शाळेत झालेल्या त्या जाणिवेने मला गाण्याकडे आणि भाषेकडे अधिक गांभीर्याने पाहाण्याची दृष्टी दिली. मग पुढे कॉलेजपासून गाण्याच्या निरनिराळ्या स्पर्धांत भाग घेणं, कॉलेजच्या भित्तिपत्रकासाठी, नियतकालिकासाठी लिहिणं सुरू झालं.
 
स्नेहसंमेलनं ही केवळ विद्यार्थ्याच्या विकासासाठीच असतात असं नाही. शिक्षकांनाही या निमित्ताने स्वतःच्या कलागुणांना वाव देता येतो. नाटकं लिहिण्यासाठी अनेक शिक्षक हिरिरीने पुढे येतात. काही जण नेपथ्य करतात, तर काही संगीत देतात. काही जण मुलांकडून गाणी तयार करून घेतात, तर काही नृत्य-नाट्य बसवतात. काही काही शाळांमध्ये तर शिक्षकांचा वेगळा कार्यक्रमही ठेवला जातो. गॅदरिंग्जमुळे जशी विद्यार्थ्यांमध्ये नाती बहरत जातात, तसाच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही स्नेहबंध तयार होतो.
 
भारतीय समाजात संस्कृतीला विशेष महत्त्व आहे. जशी प्रत्येक घराची संस्कृती असते, तशीच शाळेचीही संस्कृती असते. अभ्यास, सराव, परीक्षा, गुण, व्यायाम, कसरती, खेळ यांप्रमाणेच दर वर्षी होणारे स्नेहसंमेलनदेखील शालेय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात हे स्नेहसंमेलन मोलाचा वाटा उचलते. आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवण्यात स्नेहसंमेलन महत्त्वाची भूमिका बजावतं. मग मित्रांनो, घेणार ना दर वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग? पण आई-बाबांचा ओरडा न खाता आणि अभ्यास सांभाळूनच हे सगळं करा.
 
 
- मृदुला राजवाडे
9920450065