वेडे साहसवीर

शिक्षण विवेक    30-Nov-2022
Total Views |

vede sahasveer 
 
पुस्तक परिचय
जगात जेवढे शोध लागले आहेत ते शोध काही वेडाने झपाटलेल्या साहसी लोकांनीच लावले आहेत. आपल्याकडे कोणी जंगलवाटा धुंडाळताना कुठे फसला तर त्याला वेडा ठरवले जाते. स्वत:चे साहस आजमावण्यासाठी पुरात उडी मारणारे तर ठार वेडे ठरतात. कडे कपारीत वावरणारे, सागरावर स्वार होणारे देखील वेड्यांच्या यादीतच येतात.
पण कधी त्यांच्या साहस कथा समजावून घेतल्या आहेत का? त्यातून आपली साहसाची आवड जोपासली जाते. अंधी धाडस येते. काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी जागी होते. आपल्यातही धमक आहे. ही भावना वाढीस लागते. महत्त्वकांक्षा उरी बाळगली जाते. अशा साहसी कथांमुळेच तरुणांमध्ये विधायक अग्नी चेतवण्याचे काम केले जाते.
महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पोतडीत असे अनेक साहसवीर लपले आहेत. शिवाजी महाराजांच्या साहसकथांची आपण पारायणे करतो. शिवरायांना एवढ्या मोठ्या उंचीवर नेण्यासाठी ज्या-ज्या साहसवीरांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे, त्यातील काहीच नावे आपण जाणतो. पण शिवकालीन इतिहासात असे अनंत अज्ञान साहसवीर आहेत की ज्यांची आपल्याला नावे माहीत नाहीत. त्यांचा पराक्रम साहस आपण अव्हेरु शकत नाही. असेच एक तरुण जोडपे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावतात. त्यांचे म्हातारे कुटुंबीय जीवाचे रान करतात. मग काय भला-थोरला पराक्रम करून ठेवतात की खुद्द शिवाजी महाराजांना सुद्धा या कोवळ्या पोरांसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. या झपाटलेल्या वेडाच्या भरात असे काही साहस करुन दाखवितात की त्यांचे त्यांना ही कळत नाही की आपण या स्वराज्य उभारणीच्या कामात एक चिरा झालो आहोत.
त्यांचे ते वेड, झपाटलेपण, जिद्द जीवाला जीव देणे, एकमेकांना साथ देणे, आपल्यला पदोपदी त्यांच्या साहसकथेत भेटत राहतं. मग अशा खिळवून ठेवणार्‍या भन्नाट, थक्क करून सोडणार्‍या जिवंत साहसकथा वाचण्यात आपण मागे का? अशा साहसी कथांची श्रीमंती उरी बाळगण्यातच खरा अभिमान! त्यातून मिळणारी प्रेरणा हीच आमच्या विजयाची मुहुर्तमेढ! मग लगेच वाचा, पुण्याच्या जवळपास घडलेली सामान्य राजाराणीची असामान्य साहस कथा! ‘शेलारखिंड’.
पुस्तक - शेलारखिंड
लेखक - बाबासाहेब पुरंदरे
- सुनिता वांजळे
शिशुविहार प्राथमिक शाळा, एंरडवणे