मी अनुभवलेली सहल

13 Dec 2022 11:00:35

The trip I experienced
मी सध्या आठवीमध्ये आहे, पण माझी पाचवीची सहल आजही आठवते. आमची सहल ही ‘चाकूर’ या ठिकाणी गेली होती. त्यासाठी आमच्या सरांनी आमच्याकडून केवळ 250 रुपये घेतले होते. आम्ही सगळे मिळून एका शिवशाही बसने गेलो होतो. जात असताना आम्ही बसमध्ये खूप मज्जा केली होती. आम्ही गाण्याच्या भेंड्या तसेच खूप खेळही खेळलो होतो. जात असताना गावोगावी अनेक मंदिरेही होती. आम्ही त्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन आलो. एका मंदिरात तर खूप मोठ्या मूर्त्याही होत्या. तसेच एका मंदिराच्या बाहेर खूप जागा होती तिथे आम्ही समोसा आणि वडापाव खाल्ला. तेव्हा तर खूपच मजा आली. आता शेवटी आम्ही चाकूरला पोहोचलो होतो. एका पार्कमध्ये आम्ही एका छोट्याशा रेल्वेने गेलो होतो. जी त्याच पार्कची रेल्वे होती. मला एवढं आठवतं की, त्या पार्कमध्ये दोन राईड ही होत्या. पहिल्या राईडमध्ये मी बसले होते आणि ती खूप जोरात वर आणि खाली होऊ लागली. मीही फार ओरडू लागले. नंतर दुसर्‍या राईडमध्येही फार मज्जा आली. नंतर आम्ही स्विमिंगपूलमध्ये गेलो होतो. तिथे घसरगुंड्या खेळल्या. ज्या खूप उंच होत्या. एक घसरगुंडी तर अशी होती ज्याच्यावर एक बादली होती आणि त्या बादलीच्या खाली थांबल्यास त्यामधलं पाणी आमच्यावर पडत होत. आम्ही त्या पूलमध्ये दोन तास होतो. नंतर आम्ही परत एका दुसर्‍या बागेमध्ये गेलो. जी खूप मोठी होती आणि तिथे आम्ही एका लाकडी रेल्वेने एका तलावापर्यंत गेलो. त्या तलावामध्ये आम्ही एका छोट्याशा होडीने तो पूर्ण तलाव फिरलो. त्या बागेमध्ये आम्ही खूप मोठ्या राईड खेळल्या. तिथे आम्ही चालत चालत खूप उंचीवर गेलो होतो आणि तिथे एक रोपवे सुद्धा होता. पण तो फक्त मोठ्यांसाठी होता. त्यामुळे आम्ही त्यामध्ये नाही जाऊ शकलो. मग परत नंतर आम्ही त्या पूलकडे गेलो कारण तिथल्या रूममध्ये आमचं सामान होतं. पण हे सगळं करत असताना माझी एक नवीनच पँट तिथे हरवली. परत तिथेही एक मंदिर होतं. त्याला खूप मोठ्या पायर्‍या होत्या. मग नंतर सगळं झाल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे जेवण करून आम्ही परत निघालो. परत येत असतानाही बसमध्ये आम्ही कुरकुरे, चिप्स आणि चॉकलेट खूप काही खाल्लंं. घरी जायला मला अकरा वाजले होते. पण काहीही होवो मी हा दिवस कधीच नाही विसरू शकत.
- श्रावणी सोळंके, 8 वी,
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव
Powered By Sangraha 9.0