अन् आरसा हसला...

शिक्षण विवेक    14-Dec-2022
Total Views |

And the mirror smiled... 
 
‘‘काय काय म्हणून करू मी?’’ आई जरा वैतागूनच म्हणाली आणि रियाला पाहून म्हणाली, ‘‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा’’ रियाला मात्र त्यातलं काहीही समजलं नाही. थोडं शांत झाल्यावर मग रियानेच आईला विचारलं, ‘‘तू काय म्हणालीस? मला काहीच कळलं नाही.’’ आई मात्र हसली व म्हणाली, ‘‘तूही मोठी झाल्यावर असंच म्हणशील.’’
काय एवढं असेल रे मुलांनो या बालपणात? हे बालपण म्हणजे तुमच्या भावी जीवनाचा आरसा आहे. आता म्हणाल आरसा कसा काय?
 
अरे! आरसा काय करतो? आपलं खरं रूप दाखवतो. जर बालपणीचा आरसा छान रूप दाखवणारा असेल तर तो मोठेपणीही छानच असेल बरं! आणि हा बालपणीचा आरसा छान कशाने दिसतो महिती आहे का? तर तुमच्या सवयींमुळे, वागणुकीमुळे बरं का!
 
आता हेच पाहा जर शाळेपासूनच सर्व कामे वेळेत करण्याची सवय असेल, तर पुढेही तुम्ही आपोआप तसेच वागाल. ‘अन्न हे पूर्णब्रह्मं’ असं म्हणता आणि जेवण करताना शेवटी मात्र काही न आवडणारं ताटात तसेच टाकता हे योग्य आहे का? त्यासाठी न आवडणारी भाजीही संपवून त्या अन्नाचा आदर केला पाहिजे.
 
आणखी काय बरं करता येईल? हा आपला आरसा सुंदर करण्यासाठी? सर्वप्रथम आई-बाबा, शिक्षक व मोठ्यांचा आदर करा. आपल्या वस्तू नीटनेटक्या जागेवर ठेवा. टी. व्ही., मोबाईलमध्ये न अडकता पुस्तकं वाचा. आता वाचताय तसंच नवीन नवीन माहिती गोळा करा.
 
त्याचबरोबर स्वच्छतेच्या सवयीदेखील महत्त्वाच्या! कचरापेटीतच ‘कचरा टाका’. आपल्या घर-परिसराबरोबरच देशाचाही विचार करा आणि प्रेमाने आनंदाने राहा.
 
बघा तुमचा हा आरसा कसा खुद्कन हसेल! आणि म्हणेल
‘हम भारत के बच्चे है।
मन के हम सच्चे है।
आज हम ये प्रण करेंगे।
कल का भारत हम बनेंगे।
- जुलेखा इनामदार, शिक्षिका,
प्रा. म. ना. अदवंत प्राथ. विद्यामंदिर, कर्वेनगर