शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२२

शिक्षण विवेक    14-Feb-2022
Total Views |

shikshan maza vasa rajyastariy yuva shikshak puraskar 2022 
 
भाषा आणि इतिहासाचे भान जपणे महत्त्वाचे ः दिग्पाल लांजेकर
‘शिक्षण माझा वसा’ कार्यक्रमात राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारांचे वितरण
पुणे : ‘भाषा आणि इतिहासाचा अभ्यास माणसाच्या जडणघडणीत खूप महत्त्वाचा भाग असतो आणि ते उत्तमरीत्या शिकवण्याचे कार्य शिक्षक करत असतात. त्यामुळे मला शिक्षकांच्या सहवासात राहणं नेहमी आवडतं. तो मी माझा सन्मान समजतो. मी आज जो आहे, तो माझ्या शिक्षकांमुळेच आहे. छत्रपतींचा इतिहास आज नव्याने आणि सर्व बाजूंनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही ‘शिवअष्टक’ या नावाने चित्रपटांची मालिका सुरू केली असून, लवकरच या मालिकेचे तिसरे पुष्प ‘पावनखिंड’ रसिकांच्या भेटीला येत आहे. पालकांनी हा चित्रपट मुलांना अवश्य दाखवावा. केवळ आर्थिक नफ्याचा विचार न करता इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या चित्रपटांची आज गरज आहे’, असे वक्तव्य चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी रविवार, दि. 13 फेब्रुवारी 2022 रोजी केले.
शिक्षणविवेक, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पुण्यातील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन अ‍ॅड. किशोर लुल्ला, फाउंडेशनच्या मुग्धा अभ्यंकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य आणि प्रबंधक डॉ. सविता केळकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नीतिन शेटे, छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेच्या चिटणीस भारती वेदपाठक, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव, शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल जैन, विद्याभारतीचे पदाधिकारी विनोदकुमार पांडे, शिक्षणविवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
अ‍ॅड. किशोर लुल्ला म्हणाले, ‘नवी पिढी घडवण्यात शिक्षक आणि पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मुले काय करतात याकडे येणार्‍या काळात अधिक लक्ष द्यावे लागेल. करोनानंतर मुलांच्या हातात मोबाईल व इतर अनेक गोष्टी आल्या. त्यामुळे आता अशा परिस्थितीत अधिक सजगतेने त्यांची जडणघडण करावी लागणार आहे. मुलांना उत्तम लिहिता, वाचता, बोलता यावे असे वाटत असेल, तर ते गुण आधी पालक, शिक्षकांनी आत्मसात करायला हवेत. ज्या शिक्षकांनी चौकटीच्या पलीकडे जाऊन असे प्रयत्न केले, त्यांचा विशेष सत्कार करताना आम्हांला आनंद होतो आहे.’
या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने सतत नवनवीन उपक्रम राबवणारे शिक्षक आणि विविध संस्थाचे शिक्षक प्रतिनिधी यांचा सत्कार केला गेला.
जिल्हा परिषेदेच्या शाळांमधील पुरस्कारार्थींची विभागवार नावे पुढीलप्रमाणे - भाषा : गंगाराम ढमके (जिल्हा परिषद शाळा शेरवली., ता. शहापूर, जि. ठाणे), गणित : नीलेशकुमार इंगोले (जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बर्‍हाणपूर, ता. मोर्शी, जि. अमरावती), विज्ञान : सुलक्षणा आलदर, (जिल्हा परिषद शाळा नंबर 1, कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), तंत्रज्ञान : शुभांगी बाबर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हेवाळे नं. 1 ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), कला : रेश्मा पटवेगार (जिल्हा परिषद शाळा, कोगीलखुर्द, पोस्ट गिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), विशेष : महेश खाडे (जि.प.प्राथ. शाळा माणिवली, ता. कर्जत, जि. रायगड), मुख्याध्यापक : संदीप लेंडे (जि.प.प्राथ. शाळा, निमोणीचा मळा, ता. सिन्नर, जि. नाशिक)
संस्थांच्या शिक्षक प्रतिनिधींना दिलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी : प्रज्ञा पवार, रेणुका स्वरूप प्रशाला, पुणे; छत्रपती शिक्षण मंडळ - सायली कुलकर्णी, विद्यामंदिर, मांडा टिटवाळा; डेक्कन एज्युकेशन सोसायटी - सुजाता बनसोडे, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल, पिंपरी; महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था - प्रेमला बराटे, महिलाश्रम हायस्कूल, पुणे; शिक्षण प्रसारक मंडळी - पूजा मोडक, एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, परशुराम; भारतीय शिक्षण प्रसारक संस्था - सत्यभामा मोरे, श्री. सिद्धेश्‍वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव; मुख्याध्यापक - लीना वर्तक, शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे.
पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त स्वराज्य पंचाहत्तरीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘गर्जा जयजयकार’ या गीतगायनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंग भरला. या वेळी संगीत संयोजक आणि गायक पराग पांडव, गायिका शीतल गद्रे, भक्ती पटवर्धन यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. देशभक्तिपर गीतांच्या सादरीकरणाने श्रोते भारावून गेले होते. त्यांना केदार तळणीकर (तबला), अदिती गराडे (हार्मोनियम), नीतिन खंडागळे (की-बोर्ड), सारंग भांडवलकर (ढोलक) यांनी सुरेल साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल सुरसे, मयूर भावे आणि ज्योती पोकळे यांनी केले.
शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी आभार प्रदर्शन केले. लवकरच हा संपूर्ण कार्यक्रम रसिकांना शिक्षणविवेकच्या यू-ट्युब चॅनेलवरून आणि फेसबुक पेजवर पाहता येणार आहे.