पुनर्वापर, शाळा आणि आपण

शिक्षण विवेक    21-Apr-2022
Total Views |

 Recycling, school and you 
 
कचरा हा शब्द आपण वाया गेलेला, टाकाऊ किंवा निरुपयोगी अशा अर्थाने रोजच्या व्यवहारात वापरतो. घरगुती कचऱ्याचा प्रवास हा घरातील साठवणीपासून ते महानगरपालिकेच्या गाड्यांमधून, कचऱ्यासाठी विशिष्ट अशा ठरलेल्या ठिकाणी (dumping ground ) गोळा करणे इथपर्यंत होतो. या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे विघटन करून त्याचा ऊर्जा किंवा खतासाठी उपयोग करणे हे जरी शक्य असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना यात खूप अडचणी येतात. त्याला प्रमुख कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारे घरगुती कचऱ्याचे प्रमाण, अयोग्य किंवा अपुरे नियोजन व तो साठवण्यासाठी असलेली अपुरी जागा हे आहे. यामुळे परिसरातील लोकांमध्ये विविध प्रकारचे रोग होतात किंवा आरोग्याला घातक असे प्रदुषणकारक वायू त्यामधून निर्माण होतात. या सर्व गोष्टींकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. यासाठी कचऱ्याचे प्रमाण मुळातच कमी करणे (reduce), उपलब्ध कचऱ्यामधील काही घटकांचा पुनर्वापर (refuse) किंवा काही भागावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त वस्तू बनवणे (recycle) हा विधायक मार्ग असू शकतो. Reduce, Reuse, Recycle यालाच इंग्रजीमध्ये ३’R ची तत्वे असे म्हणतात. या सर्व गोष्टींची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्याची महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था व आपण सर्वसामान्य नागरिक यांची जबाबदारी महत्वाची असून त्यामध्ये परस्पर संयोजन असणे महत्त्वाचे आहे.
शाळा हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे संस्कार शाळेमध्ये घडवले जातात. परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरण रक्षण, तसेच ३’R तत्त्वे वापरून कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये होणे आवश्यक आहे. ही त्यांची सामाजिक जबाबदारी आहे. यातून मिळणारे शिक्षण त्यांना समाजातील एक जागरूक नागरिक बनवण्याच्या दृष्टिने उपयुक्त ठरते.
शाळा व त्यातील शिक्षक, विद्यार्थी, इतर कर्मचारी या समस्येकडे कोणत्या दृष्टीने पाहू शकतात याचा आपण विचार करू :
रोजच्या वापरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे आपण ओला व सुका या मुख्य प्रकारात वर्गीकरण केले पाहिजे. शाळेमध्ये निर्माण होणारा ओला कचरा म्हणजे डब्यातील व कँन्टीनमधील राहिलेले खाद्यपदार्थ, परिसरातील पालापाचोळा इत्यादी एकत्र करून त्याचे योग्य प्रकारे विघटन करून त्यांचे रुपांतर उपयुक्त अशा खतांमध्ये करता येऊ शकते.
वाया जाणारे कागद उदा. वापरलेल्या वाह्यांतील कोरी पाने, प्रिंट आउट्स, माहितीपत्रके यांची साठवण करून रद्दीला देता येऊ शकतात. इतर लहान – सहन कागदाचा लगदा करून विविध आकर्षक व उपयोगी वस्तू उदा. पेन स्टँण्ङ, फुलदाणी इत्यादी बनवता येतात. कागदाच्या पिशव्या बनवून त्याचा वापर वापर रोजच्या व्यवहारात म्हणजे भेट वस्तू देण्यासाठी, छोट्या छोट्या वस्तू आणण्यासाठी करता येणे शक्य आहे.
निरुपयोगी प्लास्टिकच्या बाटल्यांचा उदा. शापू, तेल, खाद्यपदार्थ पाण्याच्या व शीतपेयाच्या बाटल्या कागदाच्या सहाय्याने पेन स्टँड फुलदाणी यांसारख्या उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. तसेच छोट्या छोट्या फुलझाडांची लागवण ही या बाटल्यांमध्ये करू शकतो.
वापरात नसलेले सुस्थितीतील कपडे योग्य त्या सेवाभावी संस्थांना देऊ शकतो किंवा वापर करून आकर्षक पिशव्या, पायपुसणी छोटे रुमाल इत्यादी बनवू शकतो. या पिश्व्याचा वापर आपण रोजच्या व्यवहारात केलं, तर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरला आळा बसू शकतो.
हल्लीच्या युगात वापरात नसलेले, बिघडलेले मोबाल, वायर, संगणक, विजेचे दिवे, बॅटरी, सी. डी. इत्यादींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला आपण ई- कचरा असे म्हणतो. यामध्ये घातक प्रकारची रसायने असतात. ज्यांचे सर्वसामान्यपणे नियोजन करणे कठीण आहे. खराब झालेल्या सी.डी.पासून वॉल हॉगिंग, पेनस्टँण्ङ सारख्या अनेक शोभिवंत वस्तू बनवता येतात.
वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करून; तसेच वृत्तपत्रे, मासिक व इंटरनेट यातून उपलब्ध होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून कचरा नियोजन व पुनर्वापर यांचे प्रशिक्षण शाळांमध्ये देता येऊ शकते.
वाया जाणाऱ्या वस्तूंचा योग्य प्रकारे वापर करून पिशव्या, पेनस्टँण्ङ, फुलदाणी, दागिने इत्यादी वस्तू मी प्रत्यक्ष बनवल्या आहेत.
- संपदा कुलकर्णी