संदर्भकोशांचे विश्‍व

शिक्षण विवेक    10-May-2022
Total Views |

sandarbha koshanche vishwa 
 
नुकताच एक विद्यार्थी ग्रंथालयात आला आणि त्याने लिहिलेल्या मजकुरातील शब्दांबाबत आम्ही चर्चा केली. शब्द होते आवाहन, आव्हान आणि उपासना, उपवास. अशा शब्दांचे अर्थ त्याला नीट माहीत नव्हते; तेव्हा त्यालाच आदर्श मराठी शब्दकोशातून अर्थ आणि अरुण फडके यांच्या मराठी लेखन-कोशातून तो शुद्ध किंवा बरोबर कसा लिहायचा हे शोधायला सांगितले. मात्र त्यापूर्वी त्याला त्या कोशाची रचना कशी आहे, याबाबत सांगितले. कोशाची रचना ही वर्णानुक्रमानुसार म्हणजेच आकारविल्ह्यानुसार (अल्फाबेटिकल ऑर्डर) अशी असते.
आता आपण शब्दकोशाबद्दल माहिती घेऊ. ‘शब्दकोश’ हा संदर्भ प्रकारातला ग्रंथ आहे. म्हणजेच कथा-कादंबरीप्रमाणे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत असे त्याचे वाचन केले जात नाही; तर हवा तो संदर्भ, माहिती, अर्थ पाहण्यासाठीच त्याचा उपयोग केला जातो.
विविध भाषेतील शब्दकोश हे पुढील गोष्टींसाठी वापरले जातात.
1. शब्दांचा अर्थ पाहणे.
2. उच्चार तपासून पाहणे.
3. शब्दाची व्युत्पत्ती समजून घेणे.
4. समानअर्थी, पर्यायी शब्द व विरुद्धार्थी शब्द समजून घेणे.
5. शब्दांचा वाक्यात उपयोग कसा होतो, ते पाहणे.
मराठीतील, ‘आदर्श मराठी शब्दकोश’, ‘मराठी शब्द रत्नाकर’ असे शब्दकोश अधिक प्रमाणात वापरले जातात.
हिंदीतील नालंदा विशाल शब्दसंग्रह, संस्कृतमधील आपटे यांचा संस्कृत-इंग्रजी शब्दकोश उपयोगी पडतात; तर ओक यांचा संस्कृत-मराठी शब्दकोश, इंग्रजीतील ‘व्टेंटीएथ सेंच्युरी इंग्लिश-मराठी शब्दकोश’, ऑक्सफर्डचे शब्दकोश यांचा विशेषत्वाने वापर केला जातो. शब्दकोशाप्रमाणेच संदर्भग्रंथातील उपयुक्त ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानकोश’.
एखाद्या विषयातील माहिती, व्यक्ती, राष्ट्र, धर्म यांबाबतची कोणतीही माहिती अशा कोशात मिळू शकते. यात मराठीतील ‘मराठी विश्‍वकोश’ इंग्रजीतील ‘ऑक्सफर्ड एनसायक्लोपीडिया’ प्राधान्याने वापरले जातात. तर ठरावीक विषयांना वाहिलेले कोशही आहेतच. उदा. -
1. भारतीय संस्कृतिकोश : यात भारतीय संस्कृतीशी निगडित सण, उत्सव, धर्म, कला, देवदेवता, जाती-जमाती, संत, महाकवी यांबाबत मुद्देसूद माहिती मिळते- या कोशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
2. व्यायाम ज्ञानकोश : यात शरीरशास्त्र, व्यायामाचे महत्त्व, बालकांसाठी, मुलांसाठी स्त्रियांसाठी अशा वेगवेगळ्या विभाजनासह दिलेले आहेत. पारंपरिक खेळ, बैठे खेळ, कुस्ती, मल्लखांब अशा खेळांची शास्त्रशुद्ध पद्धतीने अचूक माहिती दिलेली आहे.
ज्ञानकोशांप्रमाणेच चरित्रकोशही अत्यंत उपयुक्त ठरतात. व्यक्तिविशेषांची संकलित चरित्रे यात असतात.
यातही 1. विषयांनुसार व्यक्तीविशेष- उदा., शास्त्रज्ञांचा चरित्रकोश.
2. एकत्रित ठरावीक क्षेत्रातील चरित्रांचा कोश - उदा., महाराष्ट्र परिचय
3. ठरावीक काळातील संकलित चरित्रे - उदा., श्रुती, स्मृती, पुराण, वेद यांतील व्यक्ती, भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश ख्रिस्तपूर्व 321 ते इ.स. 1818; भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश इ.स. 1818 ते 1945; भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश.
अशा कितीतरी प्रकारच्या कोशांसाठी माहितीचे संकलन केले जाते. असे कोश निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागलेला असतो. संपादक मंडळातील अनेक सदस्य, अनेक वर्षे अत्यंत चिकाटीने माहिती जमा करणे व तपासून पाहणे हे काम करत असतात.
तुम्हीही तुमच्या शालेय ग्रंथालयातील विविध संदर्भग्रंथांची माहिती करून घ्या.
आज इंटरनेटवर तुम्हांला क्षणार्धात हवी ती माहिती उपलब्ध होते. मात्र मूलत: ती माहिती संकलित करून संपादित करताना अनेकांचे योगदान लाभलेले असते. ही इंटरनेटवरील माहितीही अशाच ग्रंथांच्या आधाराने अपलोड केलेली असते.
- ललिता गोळे,
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड.