माझ्या मामाचे गाव

शिक्षण विवेक    11-May-2022
Total Views |

mazya mamache gaav 
 
मी माझ्या मामाच्या गावाला जाणार आहे. माझ्या मामाचे गाव नाशिकजवळ आवंडेवाडी आहे. गावाला जाऊन मी खूप मजा करणार आहे. माझ्या चुलतबहिणी, चुलतभाऊ, मामेभाऊ, मावसबहिणी आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत.
आत्ताच गाव जसा समोर दिसू लागलाय. खूप-खूप आंबे, कैर्‍या, चिंचा, यांची रेलचेल. सगळीकडे त्यांचेच ढीग. कधी एकदा ते खातोय असं झालंय. गावाला मामाच्या शेतात करवंदाची जाळी आहे. मला करवंद खूप आवडतात. रस पिऊन घ्यायचा आणि बिया कधी चावायच्या तर कधी थुंकून टाकायच्या. गावाजवळच नदी आहे नदीवर एक बंधारा बांधलेला आहे. शेजारीच एक तलाव आहे. तिकडे गेले तरी कोणी ओरडत नाही. पण आम्हीसुद्धा कधीही न सांगता तलावात उतरत नाही. आई-आजीबरोबर नदीवर कपडे धुवायला जातो आणि तेव्हाच मनसोक्त भिजून घेतो.
मामाकडे खूप शेळ्या आहेत. त्यातील एक शेळी पिल्लू असल्यापासून माझी आवडती होती. तिचे नाव सोनी होते. गेल्या महिन्यात ती डोंगरावर फिरायला व चरायला गेली होती तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती देवाघरी गेली. मला तिची आठवण आली की फार रडू येतंय. आता मी गावाला गेले की ती मला भेटणार नाही. मला फार म्हणजे फारच वाईट वाटतंय. त्या डोंगरावर मी नेहमी पवनचक्की बघायला जाते. मी त्या उंच शिडीवर चढते, तेव्हा बुंगबुंग असा आवाज येत असतो वार्‍याचा. माझी बहीण घाबरते शिडीवर चढायला तिला सारखे वाटते की भराभरा वारा वाहतो आहे. त्यामुळे पवनचक्की पडेल व आपणही पडू, पण ती पवनचक्की खूप-खूप मोठी आहे. तुम्ही बघाल तर तोंडात बोटं घालाल.
मामाकडे बैलगाडी आहे. बैलगाडीत खूप मजा येते. माझा भाऊ तर बैलगाडी चालवतो. वरून खाली उडी मारतो. बैलगाडीत बसूनच जेवतो. त्यातच खेळतो. रात्री बैलगाडीवरच झोपतो. त्याला कोणी ओरडतच नाही. गावाला विहिरीचे पाणी प्यावे लागते. कितीही पाणी प्यायले तरीही तहान भागत नाही आजी म्हणते, ‘तुला पुण्याची सवय लागलीय.’ गावाला माझी आणखी एक मैत्रीण आहे. मनीमाऊ तिचे नाव. तिचा रंग तांबडा आहे. हिरवेगार डोळे आहेत. अंग मऊगार आहे. तिची शेपटी लांबलचक आहे. ती खूप सुंदर आहे. तिला सगळे मनिम्याव म्हणतात.
खरी गमंत सांगते गावाला मम्मी ओरडत नाही. मी बिनधास्त कुठेही जाऊ शकते. आजीच्या हातचे जेवण मिळते. ना ओरडा, ना मार, मस्तपैकी खेळणे, इकडे तिकडे उड्या मारणे या सगळ्या आठवणी आता मनात गोळा झाल्या. खरंच मला मामाच्या गावाला लवकर जायचंय.
- अश्विनी गभाले
शिशुविहार प्राथमिक शाळा, पुणे