गायबगळा

शिक्षण विवेक    16-May-2022
Total Views |

Cattle egret 
 
डोंगर उतारावर कुठेतरी गुरे चरत असतात. ती सहसा एकटी नसतात. त्यांच्या पायांमधून ढांगा टाकत पांढरेशुभ्र पक्षी काहीतरी टिपत फिरत असतात. हे पक्षी म्हणजेच गायबगळे. गायबगळ्याचे इंग्रजी नाव cattle egret असे असून शास्त्रीय नाव Babulcus ibis आहे. त्याचा आकार 51से.मी. असतो.
पांढर्‍या रंगाचा आणि पिवळ्या चोचीचा गायबगळा गायरान आणि कुरणांच्या अवतीभवती दिसतो. या पक्ष्याला शेतकर्‍याचं मित्र म्हणायचं कारण म्हणजे त्याच्या सवयी. शेतामध्ये नांगरणी चालू असताना हा नांगराच्या मागे चालत राहतो आणि जमिनीतील किडे गट्टम् करतो. रात्रीची झोप घ्यायच्या ठरलेल्या झाडाकडे रांगा करून उडत येणार्‍या गायबगळ्यांचे थवे तुम्ही कधी पाहिले आहेत का? नसतील तर संध्याकाळी नदीच्या काठावर बसा आणि गायबगळ्यांची संख्या मोजण्याचा प्रयत्न करा.
पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यापासून दूर माळरान, गवती कुरणे किंवा टेकड्यांवरही आढळतात. बगळ्यांच्या इतर जाती मात्र पाण्यापासून दूर जात नाहीत. तुम्ही जर आजूबाजूला बारकाईने पाहिले. तर लक्षात येईल की साधारण जून ते सप्टेंबर या काळात देशावरच्या भागात गायबगळ्यांची संख्या एकदम कमी होते. एकही गायबगळा दिसत नाहीत. एकही गायबगळा दिसत नाही. पावसाळ्यात गायबगळे घरटी करतात. घरटी करण्यासाठी योग्य जागेच्या शोधात ते प्रवास करतात. गायबगळ्यांची घरटी रायगड जिल्ह्यात, कोकणात इतरत्र आढळली आहेत. घरटी करण्याच्या काळात म्हणजेच विणीच्या हंगामात गायबगळ्यांच्या पाठीवर डोक्यावर आणि मानेवर पिवळसर, नारंगी रंगाची पिसे फुटतात. तो सुंदर दिसू लागतो. अनेक पक्षी एकत्र येऊन आंबा, जांभूळ अशा झाडांवर घरटी बांधतात. अशा वस्तींना सारंगागार म्हणतात. अनेक पक्षी एकत्र येऊन घरटी करत असल्यामुळे भक्षकांकडून होण्यार्‍या शिकारीचे प्रमाण कमी होते.
 
- अथर्व श्रीराम सहस्त्रबुद्धे,
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग