यक्षांची देणगी

शिक्षण विवेक    17-May-2022
Total Views |

yakshanchi dengi 
 
डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे जगप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत.
19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात जन्म. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते; तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या.
डॉ.जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत कन्फॉमर्ल ग्रँव्हीटी थिअरी मांडली. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिक क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर सातत्याने लेखनही सुरू आहे.
सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजावण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी ते सर्व प्रसारमाध्यमांचा उपयोग करतात. ‘यक्षांची देणगी’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. विविध मराठी नियतकालिकांतून डॉ.नारळीकर माहितीप्रत ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. त्यांच्या पुस्तकांची जगातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत.
‘यक्षांची देणगी’ हे अतिशय सुंदर आणि विचारप्रवर्तक असे पुस्तक असून त्यातील अनेक कल्पना आज प्रत्यक्षात उतरलेल्या आपण पाहत आहोत. यामध्ये यक्षांची देणगी, कृष्णविवर, उजव्या सोंडेचा गणपती, गंगाधरपंतांचे पानिपत, धूमकेतू, पुनरागमन, दृष्टीआड सृष्टी, धोंडू, पुत्रवती भव, ट्रायचा घोडा, नौलाखा होराचे प्रकरण, अखेरचा पर्याय अशा विविध कथा आहेत.
पृथ्वीपलीकडे जीवनसृष्टी असेल काय? यावर ‘यक्षाची देणगी’ ही कथा आहे. एखादी वस्तू स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने संकुचित होत गेली; तर ती बाहेरून दिसेनाशी होते. अशा वस्तूला कृष्णविवर म्हणतात. पृथ्वी संकोच पावत तिचा व्यास सेंटीमीटरपेक्षाही कमी झाल्यास तिचे कृष्णविवर होईल. या कल्पनेवर आधारित कृष्णविवर ही कथा आहे.
मूळ कणांमध्ये असलेल्या रचनेमुळे अवकाशात पीळ निर्माण होऊ शकेल अशी गणितीय संकल्पना काही गणितज्ञांनी मांडली. तिचा वापर उजव्या सोंडेचा गणपती या कथेत आहे.
व्हायकिंग यानाने मंगळावरच्या पृष्ठभागाची वरवरची छाननी करून तिथे जीवाणू नसल्याने मंगळावर जीवसृष्टी नाही असा निष्कर्ष काढला; परंतु पृष्ठभागाखाली एखादी अतिप्रगत जीवसृष्टी कशावरून वास करत नसेल? हे दृष्टीआड सृष्टी या कथेतील तत्त्व.
शास्त्रज्ञांना पडलेल्या प्रश्नांवर आधारित लिहिलेल्या अशा अनेक कथा वाचून तुम्हांला आनंद होईल आणि खगोलशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट होतील. तेव्हा विद्यार्थिमित्रांनोऽ वाट कसली बघता? मिळवा हे पुस्तक आणि वाचल्यानंतर आपली प्रतिक्रया शिक्षणविवेकला आणि डॉ.जयंत नारळीकर यांनाही जरूर पाठवा.
 
 
- स्वाती द. गराडे, सहशिक्षिका
कै. दा. शं. रेणावीकर विद्यामंदिर