वृक्ष - आमुचा बहुगुणी हिरो

शिक्षण विवेक    18-May-2022
Total Views |

vruksha amcha bahuguni hero 
 
वार्‍यावर डोलतो, सळसळ करतो
तरीही जमिनीत घट्ट पाय मी रोवतो!
पायांनी पाणी पितो, हजार हातांनी दान देतो
स्वत:चे अन्न, स्वत: निर्मिणारा मी एकटाच सजीव
इतर सजीवांना देतो मी आसरा आजीव
ओळखा मी कोण?
येते का उत्तर या कोड्याचे? बरोबर! ‘वृक्ष’. कोड्याचे उत्तर आहे - वृक्ष किंवा झाड! झाडेच माझ्या आयुष्यातील खरा हिरो आहेत. मी खरा हिरो कोण? याचा विचार करू लागले, तेव्हा स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई अशी अनेक व्यक्तिमत्व माझ्या मनात आले. मग विचार केला हिरो कोणाला म्हणू या, तर ज्या व्यक्ती किंवा सजीवांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, त्यांच्यातील गुणांमुळे आपण प्रभावित होतो व त्यांच्यासारखे होण्याचा, वागण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्ती आपल्या आयुष्यातील खर्‍या हिरो असतात, हो ना? मग त्या व्यक्ती किंवा सजीव सध्या हयात नसल्या तरी, आपण त्यांच्यातील चांगल्या गुणांचे, वागण्याचे, बोलण्याचे अनुकरण करू शकतो. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतो.
खरा हिरो कोण? या प्रश्‍नाचं उत्तर शोधताना केलेल्या विचारमंथनातून मला शेवटी वाटायला लागले की, केवळ व्यक्तीच का हिरो असावी? निसर्गातील अनेक घटक त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा मोह माझ्यात निर्माण करतात. नदी, पर्वत, मैदाने, पक्षी, झाडे इत्यादी या सगळ्यांतून माझ्या मनातल्या हिरोचे नाव निश्‍चित झाले आणि ते म्हणजे वृक्ष!
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले आहेच. त्यामुळेच वृक्षांच्या अंगी असणार्‍या असंख्य सद्गुणांची मला भुरळ पडली होती. ते गुण आत्मसात करून जगण्याचे ध्येय ही मी यापूर्वीच निश्‍चित केले होते. त्याचे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे.
माझा हिरो एखादे ठरावीक झाडच आहे असे नाही. तर, सर्वच झाडे माझे हिरो आहेत. या झाडांकडून मला दातृत्व शिकायचे आहे. निरपेक्ष भावनेने इतरांना देणे ही काही सहज जमणारी गोष्ट नाही, पण ती वृक्षांना मात्र लीलया जमते. ते पशू-पक्षी, प्राणी-किटक, कृमी या सगळ्यांना जगण्यासाठी आसरा देतात, अन्न देतात. पाने, फळे, फुले, लाकूड, डिंक, मध, रबर, सावली, इत्यादी गोष्टींची मुक्तहस्ताने उधळण करतात; पण या दानातून तुमच्या कोणाकडूनही परतफेडीची, मोबदल्याची तसूभरही अपेक्षा ते ठेवत नाहीत. मला ही वाटते या झाडांसारखा दातृत्त्वाचा गुण माझ्यात आला.
झाडांचा दुसरा गुण म्हणजे ते ऊन, पाऊस, वादळ, पूर अशी अस्मानी संकटे झेलत असताना आपल्या आश्रयाला येणार्‍या सर्व प्राणिमात्रांना संरक्षण देतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी पथिकांना शीतल सावली, पक्षी-प्राण्यांना घरॉे तयार करण्याची जागा झाडांमुळेच मिळते. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आदीमानव झाडांच्या पानांची वल्कले घालत असे. आजच्या काळात झाडाच्या लाकडांपासून तयार केलेली घरेच मानवाचे थंडीपासून संरक्षण करण्यास उपयोगी असतात. मलाही वाटते की, झाडांसारखेच गरजूंसाठी आश्रयस्थान व्हायला हवे.
झाडांचा आणखी एक गुण म्हणजे, ती सदैव बहरत असतात. त्यांच्या फांद्या तोडल्या, पाने ओरबाडली तरी ते दु:ख करत न बसता सतत नवीन फांद्या, नवीन पाने देतात. आपले कार्य ते सुरू ठेवतात. कितीही संकटे आली तरी, जमिनीशी घट्ट नाते टिकवून ठेवतात. प्रचंड मोठी वादळे, पूर, गारपीट अशा संकटात झाडे आपल्या मुळांना जमिनीत घट्ट रोवून ठेवतात. प्रसंगी उन्मळून पडतात; पण ज्या जमिनीत त्यांचे भरण-पोषण झाले तिला सोडून जात नाही. झाडांच्या या कृतीतून मला ही प्रेरणा मिळते की, आपणही संकट प्रसंगी आपले चांगले संस्कार, मूल्य विसरता कामा नये. आपल्या जडण-घडणीत अमूल्य योगदान देणार्‍या आपल्या आई-वडीलांना विसरता कामा नये. त्यांच्याबद्दल आपण आयुष्यभर कृतज्ञ असायला हवे.
झाडे असा सजीव घटक आहे, जो जीवनभर स्वावलंबी असतो. झाडे स्वत:बरोबरच इतर सजीवांसाठी अन्न तयार करतात. फळं, कंदमुळं या रूपात व पानांच्या रूपात इतर सजीवांना अन्न पुरवतात. कार्बन डायऑक्साइड वायू स्वत:मध्ये घेऊन प्राणवायू सोडतात. वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवतात. पर्यन्यमानाचे संतुलन झाडांमुळेच होते. जमिनीत झाडांची मुळे सुपीक मातीला घट्ट धरून ठेवून, जमिनीची धूप थांबवतात. अरे बापरे! कितीकिती वर्णावेत या वृक्षाचे गुण!
मलाही या वृक्षांसारखे बहुगुणी व्हायचे आहे. म्हणूनच मी माझा हिरो वृक्षच आहे, असे मी म्हणते.
- कविता मनोज चांदककर, शिक्षिका,
एस. पी. एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे