हुर्रे sss सुट्टी रे सुट्टी

02 May 2022 11:07:18

holidays 
 
देशाची भावी पिढी सुदृढ राहण्यासाठी मुलांच्या आरोग्याबाबत मोठ्यांनी जागरूक असणे आज क्रमप्राप्त झाले आहे. फास्ट फूड, शीतपेये, वाढती व्यसनाधीनता यांच्या विळख्यात युवा पिढी सहज आकर्षिली जाते. मात्र चांगली जीवनशैली, चांगला आहार, चांगला संवाद याद्वारे सुदृढ नाग्रीक्न घडू शकतो आणि याची सुरुवात होते लहान वयातच !
जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापना झालेल्या या संघटेनेमध्ये जगातले जवळजवळ १९२ देश सहभागी झाले आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष पुरवणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. ब्राझिल, डेन्मार्क, दिल्ली, वॉशिंग्टन, इजिप्त व फिलिपिन्स अशी जगात सहा ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेची कार्यालये आहेत. समाजाचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टीने संघटनेकडून प्रयत्न केले जातात. याचबरोबर नवीन वैद्यकीय शोधांना मदत पुरवणे, लीकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांची माहिती देणे, जगजागृती असे उपक्रम राबवले जातात. सात एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. विविध चर्चा, पथनाट्य, फिल्म्स, परिसंवाद, प्रसारमाध्यमे याद्वारे लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृतीचे कार्यक्रम संघटनेमार्फत राबवले जातात.
या वर्षी जागतिक आरोग्य दिनाला आपण स्वतःपासून सुरुवात करत नियमित व्यायाम, योगाभ्यास, प्राणायाम या नि:शुल्कउपायांसह तणावमुक्त आरोग्यसंवर्धनाचा संकल्प करू या. अर्थात, यासाठी पर्यावरण रक्षणाचा आणि संवर्धनाचा आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो. तरुण पिढीला या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घ्यायला हवे.
देशाची भावी पिढी सुदृढ राहण्यासाठी मुलांच्या आरोग्याबाबत मोठ्यांनी जागरूक असणे आज क्रमप्राप्त झाले आहे. फास्ट फूड, शीतपेये, वाढती व्यसनाधीनता यांच्या विळख्यात युवा पिढी सहज आकर्षिली जाते. मात्र चांगली जीवनशैली, चांगला आहार, चांगला संवाद याद्वारे सुदृढ नागरिक घडू शकतो आणि याची सुरुवात होते लहान वयातच !
जीवनसत्त्वे, कर्बोदके, प्रथिने यांचा मुलांच्या आहारात समावेश होईल याकडे पालकांचे लक्ष असायला हवे. नियमित चौरस आहाराच्या जोडीला ऋतुमानाप्रमाणे फळांचा समावेश सातत्याने व्हायला हवं. मुले शारिरीकदृष्ट्या चपळ असतात. त्यांची सातत्याने काहीतरी मस्ती, पळापळ चालू असते. दोन वेळच्या जेवणाव्यतिरिक्त त्यांना सतत काहीतरी खावेसे वाटत असते. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. अशा वेळी या सगळ्यालाच घरीदारी अगदी ऊत आलेला असतो. मुलांना भूक लागल्यावर चवदार आणि पोषणमूल्ययुक्त पदार्थ द्यायला हवेत.
यासाठी विविध रंगाची फळे सहज दृष्टीक्षेपात येतील अशा प्रकारे ठेवावीत. डाळी-शेंगदाणा चिक्की, चणे, राजगिरा लाडू, विविध प्रकारचा सुकामेवा, मिश्र धान्याच्या पिठांची थालपीठे धिरडी, लाडू, जोडीला दही-मठ्ठा, फ्लेवर्ड दुध, वाफवलेल्या मोडाच्या कडधान्यांची कोशिंबीर असे पदार्थ मुलांना देता येऊ शकतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरात कच्च्या कैरीचे पन्हे करून ठेवता येऊ शकते. पन्हे, उन्हाळ्याचे पाणी, लिंबूपाणी, फळांच्या घरी तयार केलेला रस हे शीतपेयांना उत्तम पर्याय आहेत. मुलांच्या आहारावर त्यांचा नुसता शारीरिक नाही, तर मानसिक व बौद्धिक विकासही अवलंबून असतो.
उत्तम आहाराबरोबर चांगल्या आणि स्वच्छतेच्या सवयी लावल्या गेल्या पाहिजेत. मुळात स्वच्छता ही दुसऱ्यांसाठी नसून स्वतःसाठी आहे, कडू गोळ्या टाळण्यासाठी आहे, अशा उदाहरणांद्वारे हा मुद्दा मुलांना पटवता येतो.
डॉ. रामदास गुजराथी यांच्या मते, सवयी, शिस्त, वळण यासाठी योग्य काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी ! या सुट्टीत खेळ-मौजमजा याच्या बरोबरीने मुलांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. मात्र यात सहजता हवी, जाच नको !
दिवसभरात एखाद-दोन तास चालणारी कार्यशाळेमध्ये किंवा आठवड्यात २-३ दिवस चालणाऱ्या मुलांच्या आवडीच्या छंदवर्गात त्यांना सांगून विचारून घाला. आज आनंददायी शिक्षण या अंतर्गत निसर्गाची ओळख करून देणारे वर्ग चालवले जातात. याबाबत माहिती काढून मुलांना आवर्जून पाठवा. सभाधारीष्ट्य, भीतीवर मात, लेखनशैली, वाणी, सुलेखन अशा कार्यशाळा अभ्यासाच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करतात. मुलांना त्यांच्या कलाने एखाद्या ठिकाणी पाठवायला हरकत नाही. मात्र, त्याचं अतिरेक किंवा जबरदस्ती नको.
सुट्टीत सगळ्यांचेच रात्रीचे जेवण लवकर होईल याची काळजी घ्या. यामुळे रात्री लवकर झोपून, सकाळी लवकर उठून मुलांना फिरायला, व्यायामाला पाठवता येऊ शकते. घरातल्या मोठ्या मंडळींनाही या वेळी त्यांच्याबरोबर सहभागी होता येऊ शकेल.
नियमित व्यायाम, ताणतणाव, पौष्टिक आहार, पुरेशी झोप, स्वच्छता या सर्व गोष्टींबाबत अगदी सहजतेने मुलांशी मोकळेपणाने बोलावे. मुले जेव्हा एकटी असतात तेवां काय करावे, अगदी मोक्याच्या क्षणी / संकटसमयी काय करावे इथपासून ते एकट्याने वेळ सत्कारणी कसा लावावा, ‘नाही’ असे केव्हा, कसे म्हणावे असे अनेक मुद्दे हळूहळू उलगडत जावेत. किंबहुना या चर्चेसाठी सुट्टीसारखा योग्य काळ नाही.
मुले ही संवेदनशील स्वभावाची असतात. घरात आई-वडील त्यांच्याशी ज्याप्रकारे संवाद साधतात, त्याचं त्यांच्या भविष्यातल्या वर्तनावर, विचारपद्धतीवर, आत्मविश्वासावर, मानसिक व भावनिक स्वास्थ्यावर आणि पर्यायाने शाळेतल्या वागणुकीवर व अभ्यासातील प्रगतीवर थेट परिणाम होतो. संवादातून मुलांच्या मनात पालकांविषयी विश्वास वृद्धिंगत व्हायला हवा. जोडीला मुलांना त्यांची मते, विचार मांडायला वाव घ्या, असे डॉ. हेमल शहा सुचवतात.
अभ्यासाला पर्याय नाही हे लक्षात घेत विविध कोडी, रासायनिक सूत्रे, तक्ते, पृथ्विगोल, कविता, व्याख्या यांचा समावेश करता येईल. अशा पद्धतीने खेळ आवर्जून खेळले जाऊ शकतात. आज कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम्स, मोबाईल, टिव्ही यांचा अतिरेक घराघरात वाढत आहे. मात्र याचा सुज्ञपणे वापर करण्याचे प्रशिक्षण मुलांना देता येऊ शकते. ‘वाचेल तो वाचेल’ या न्यायाने, सुट्टीत त्यांच्या आवडीच्या विषयाची छोटीछोटी पुस्तके मुद्दाम त्यांच्याबरोबर जाऊन खरेदी केली तर ती त्यांना वाचावीशी वाटतील आणि नकळत टीव्ही व तत्सम गोष्टींचा अतिरेक कमी होऊ शकतो.
हे सगळे करताना, ‘आमच्या वेळी नव्हते बुवा असेल काही. आता हल्लीच्या मुलांचे फारच लाड करावे लागतात....’ असा एक सूर ऐकायला मिळतो. अशा वेळी लक्षात घ्यायला हवे, बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलतात. आजचे युग स्पर्धात्मक आहे. आज पालक मुलांना वाढवतात त्यांच्या स्वतःच्या कामातही व्यस्त आहेत. लहान-थोर साऱ्यांनाच काळ-काम-वेग याबरोबर प्रगती हे गणित साधायचे आहे
- पल्लवी मुजुमदार
Powered By Sangraha 9.0