आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तर वाटतं, का मोठे झालो आपण? का या मोठ्या लोकांच्या दुनियेत आलो? लहान होतो तेच बरं होतं! ना कसल टेन्शन, ना कसली जबाबदारी, ना समजूतदारपणे वागण्याचे बंधन, ना भविष्याची चिंता, ना भूतकाळाचं ओझं! येईल तो दिवस फक्त आनंदात जगायचं! बस्स! एवढंच होतं जीवन! पण एवढुश्या जीवनात खूप सार्या आठवणी दडल्या आहेत. त्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या की वाटतं, पुन्हा एकदा लहान व्हावं, आजी आजोबांचा लाडोबा होऊन खूप सारे लाड करून घ्यावेत, आईवडिलांकडून कौतुक तर कधी खोड्या काढून घरी आल्यावर मिळालेली शिक्षा अनुभवावी, मित्रांबरोबर भटकंती करावी, रानीवनी फिरावं, मित्रांसोबत पोहायला जावं, भातुकलीचा खेळ खेळावा, शाळा सुटल्यावर सायंकाळी अंगणात भरवलेला खेळाचा तास अनुभवावा! अशा कितीतरी आठवणी डोळ्यांसमोरून तरुन जातात; पण त्या फक्त आठवणीच! कारण बालपण हे कुपीतल्या एका अत्तरासारखं आहे. कुपीतून बाहेर पडल्यावर अत्तर जसं उडून जातं तसंच बालपणाचंही आहे, एकदा सरलं कीपुन्हा ते कधीच अनुभवता येत नाही. मग उरतात त्या फक्त आठवणी!
तुमच्याही आयुष्यात अशा खूप सार्या आठवणी असतील ना? आमच्या लहानपणीचे खेळ म्हणजे लपंडाव, लगोरी, हुतूतू, लंगडी, खो-खो, पकडापकडी, विष की अमृत, डोंगर का पाणी, जोडसाखळी, राजा म्हणतो असे अनेक ग्रुप खेळ असायचे. आमच्या घरासमोर एक मोठं अंगण होतं. शाळा सुटली की शेजारील गल्लीतली सर्व मुलं-मुली दप्तर घरात टाकून खेळ खेळायला आमच्या अंगणात जमायचे. खेळ म्हटलं की खेळात लागणं, पडणं आलंच, रुसवे फुगवे आले, चिडा-चिडी आलीच; त्याशिवाय खेळाला मजा कसली!
खेळ सुरू करायच्या आधी राज्य कुणी घ्यायचं यासाठी एक पद्धत होती. त्याला कचने असं म्हणायचे. त्यासाठी पाच जणांनी हात उलट करून पसरायचे आणि एकमेकांच्या हातावर ठेवायचे, मग सर्वांनी एकाच वेळी हवेत उडवून पुन्हा एकत्र उलट किंवा सुलट बाजू समोर करून हात पसरायचे. मग पाचमधील ज्या तीन जणांचे हात समान आले ते सुटले. मग बाकी दोघं नि राहिलेली तीन घेऊन पुन्हा ती प्रोसेस... असं करत जो शेवट राहील त्याच्यावर राज्य. मग खेळ सुरू व्हायचा. सगळीकडे दंगाचा दंगा. कधी घरातून मोठी माणसे ओरडायची, ‘अरे जरा हळू पळा. लागेल-सवरेल; पण ऐकतो कोण?’
माझ्या वडिलांकडे एक गाडी होती जुन्या मॉडेलची. तिचा आवाज खूप दूर असतानाच यायचा. खेळ ऐन बहरात आला असताना गाडीचा आवाज कानावर पडला की झालंच! खेळ अर्धवट तिथेच सोडून सर्वांची पांगापांग करून घरात पळायचे. घरात जाऊन पटकन दप्तर घेऊन पुस्तकाचं पुढचं पान उघडून बसायचं. म्हणजे वडील आले की त्यांना वाटावं की आधीपासून अभ्यास चालू आहे! माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते. त्यांना खेळण्यात वेळ घालवलेला अजिबात आवडायचं नाही. म्हणून ते घरी यायच्या आधी अंगण रिकामं करून घरात अभ्यासाला बसायचं. माझ्या लहान भावाला हे नाटक जमायचे नाही. तो बरोबर पकडला जायचा. मग धम्मक लाडू मिळायचे. माझ्या मित्र मैत्रिणींनापण हे माहीत होतं, त्यामुळे तेपण वडील आलेत म्हटल्यावर लगेच घरी पळायचे. हा रोजचा दिनक्रम असायचा. परीक्षा जवळ आल्या की मग मात्र मनापासून अभ्यास करावा लागायचा; पण त्याचे टेन्शन कधी येत नसे. लहानपणी तणाव म्हणजे काय हेच माहीत नसायचं तर! पेपर झाले की सुट्ट्या!
आम्ही लहानपणी सुट्टीमध्ये शेतात आंबे आणायला जायचो. आंब्यांची एक गंमत होती. मी-बहीण, माझा लहान भाऊ अशी आमची टीम असायची. मला काय झाडावर चढता यायचं नाही. माझा भाऊ झाडावर चढायचा आणि आंबे काढून माझ्याकडे टाकायचा, मग कापडात झेलून खाली साठवून ठेवायचो. घरी नेऊन ते लपवून ठेवायचे. ओढ्यावर कपडे धुवायला गेल्यावर पाण्यातले साप बघून माझं काय पाण्यात उतरायचं धाडस व्हायचं नाही. मोगर्याची फुलं मिळविण्यासाठी दूर दूर हिंडायचो. कळ्या मिळाल्या तर पाण्यात ठेवून द्यायच्या म्हणजे दुसर्यादिवशी त्याची छान फुले उमलली असायची. काय मस्त दिवस होते ना ते!
लहानपणी वाटायचं लवकर मोठं व्हावं, सगळं शिक्षण संपवावं नोकरी करावी; पण,
बडे होकर क्या मिला
दिमाग में बोझ और दिल में गम
काश वो बचपण फिर से जी पाते हम.
जसे जसे मोठे होत जातो तसं आपल्याला हवं तसं जगता येत नाही, जबाबदारीचं भान, उद्याची काळजी आणि भूतकाळातील चुकांचं ओझं. सर्व कसं मनासारखं होईल यासाठी धडपड चालू होते, त्यातून यश-अपयश यामुळे होणारा त्रास, दुसर्यांपेक्षा आपण कसं मोठं होऊ यासाठी चालेले प्रयत्न, या सगळ्यात लहानपणीचं ते निरागस आयुष्य कुठं विसरून जातो?
पूर्वी घरी मोबाइल, लॅपटॉप, टॅब नसायचे. मुलं घराबाहेर पडून मैदानातील खेळ खेळायचे. त्यामुळे मोकळा श्वास, पुरेसा ऑक्सिजन मिळायचा. शरीर आपोआप तंदुरुस्त राहायचं, व्यायाम व्हायचा; त्यामुळं भूकही भरपूर लागायची. मुलं पोटभरून, मागे न लागता जेवायची. झोपही शांत लागायची! पण आजकाल मोबाइल आले, टी.व्ही., कॉम्पूटर आले. मुलं बाहेर पडण्यापेक्षा घरीच ऑनलाईन खेळू लागली आहेत, त्यामुळे डोळ्याला त्रास, शरीराला मोकळी हवा, पुरेसा ऑक्सिजन मिळेनासा झाला. व्यायामाचा अभाव होऊ लागला. त्यामुळे मुलांची प्रतिकारक क्षमता कमी होऊन वेगवेगळ्या आजारांना सामोरी जायचं प्रमाण वाढलं. मुलं मोबाइल घेऊन तासन्तास एकटी बसू लागल्यामुळे त्याचं व्यसन तर लागलंच; पण त्यामुळे नैराश्यासारख्या समस्यांनाही सामोरी जावं लागण्याचे प्रमाण वाढले.
पूर्वी मुलं खेळाच्या निमित्ताने रानावनात भटकायची त्यामुळे साहजिकच त्यांना निसर्गाचाही लळा लागायचा. आजकाल ते निरागस बालपण कुठेतरी हरवलंय! मुलं फक्त चार भिंतींच्या आतच अडकायला लागलीत. तर, आपल्या मुलांना आपले हे लहानपणीचे दिवस, त्या आठवणी सांगून या कोषातून बाहेर पडण्यास मदत करा. पुन्हा ते पूर्वीसारखं निखळ बालपण आपल्या मुलांमध्ये रुजवा. त्यांना या मोबाइल, ऑनलाईन गेमच्या पलीकडच्या जगाची ओळख करून द्या. मनसोक्त जगा, स्वछंदी राहा, बालपणातले सुख बालपणातच अनुभवून घ्या! कारण हे बालपण पुन्हा नाही! हो! एकदा बालपण सरलं की मग एवढंच म्हणता येतं -
परत न येणारं बालपण
पुन्हा एकदा जगावंसं वाटतं,
दुनियादारीशी संबंध नसलेल्या त्या
गोंगाटात हरवून जावंसं वाटतं!
अशा एक ना अनेक आठवणी डोळ्यांसमोर सरकून जातात. ही बालपणीची सोनेरी पाने उलगडताना असं वाटतं की ते दिवस किती मंतरलेले होते! विशेषतः त्यावेळच्या मुलांचं बालपण सुखी व समाधानी होतं. त्यावेळच्या बालपणात निसर्ग आणि संस्कार यांचा मेळ होता असे म्हणायला हरकत नाही! कारण त्यावेळच्या बालपणात निसर्गाबद्दल प्रेम, ओढ व एकत्र कुटुंब पद्धतीमुळे वडीलधारी माणसे व भावंडांपासून खूप काही शिकायला मिळायचं व शिकवलं जायचं. त्या बालपणात मायेच्या ओलाव्याचा उबदारपणा होता. असे हे दिवस उभ्या आयुष्यात कधीच फिरून येत नाहीत; पण त्या आठवणी मात्र पुन्हा पुन्हा फिरून येऊन बालपणातील ते सोनेरी दिवस रम्य असल्याची आयुष्यभर साक्ष देत राहतात!
- स्वप्नील गोंजारी, साहाय्यक शिक्षक,
कै.ग.भि. देशपांडे माध्यमिक विद्यालय, बारामती