वाचनवेग

शिक्षण विवेक    05-May-2022
Total Views |

vachanveg 
 
वर्गात नुसता गोंधळ चालू होता. भूगोलाच्या बाई अजून वर्गावर आल्या नव्हत्या. त्यात त्यांनी सांगितलेला गृहपाठ बर्‍याच जणांनी केला नव्हता. शेवटी वर्गप्रतिनिधीने स्टाफरूममध्ये जाऊन सांगितलं तेव्हा मोहना टीचर वर्गात आल्या. सगळ्या वर्गाने ये असं ओरडून आनंद व्यक्त केला. कारण एकतर गृहपाठ अपूर्ण असल्याबद्दल ओरडा मिळणार नव्हता आणि दुसरं म्हणजे मोकळ्या तासाला मोहना टीचर वर्गात आल्या की खूप मज्जा यायची. आज तर त्यांनी गोष्टीच्या पुस्तकांचा एक गठ्ठाच आणला होता. एवढा गठ्ठा का आणला असेल बरं या मुलांच्या प्रश्नाला फार वेळ उत्तराची वाट पाहावी लागली नाही.
मोहना टीचर म्हणाल्या, ‘‘आज मी ही लहान मुलांची मासिकं तुमच्यासाठी आणली आहेत. मी प्रत्येक बाकवर एक मासिक वाचायला देणार आहे. बाकावर बसलेल्या दोघांनी मिळून या अंकातला लेख वाचायचा आहे. डिसेंबर महिन्यात आपल्या देशात एक भौगोलिक घटना घडली होती. कोणी सांगू शकेल का कोणती घटना ते?’’, त्यांनी विचारले. मानसने हात वर केला आणि उभा राहून म्हणाला, ‘‘सूर्य ग्रहण.’’ मोहना टीचर हसून म्हणाल्या, ‘‘बरोबर. तर या कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयी माहिती देणारे, त्याविषयीच्या अंधश्रद्धा कशा चुकीच्या आहेत हे सांगणारे हे लेख आहेत. तर हे लेख तुम्ही वाचायचे आणि लेख वाचून झाल्यावर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे.’’
 
 
त्यानंतर मोहना टीचरनी प्रत्येक बाकावर एक मासिक वाटलं. मुलांनी वाचायला सुरुवात केली. मुलं वाचत असताना टीचर वर्गात फेर्‍या मारत होत्या. दहा मिनिटांनी त्यांनी मुलांना थांबायला सांगितलं. त्या म्हणाल्या, मुलांनो, आपण या ग्रहणाविषयीच्या गप्पा नंतर मारू. कारण तुम्ही वाचत असताना मी फेर्‍या मारत होते तेव्हा तुमच्या वाचनाविषयी माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या आहेत’’, त्यांना नक्की काय म्हणायचं हे मुलांच्या लक्षात आलं नाही. पण नेहमीप्रमाणे मोहना टीचर लगेचच त्यांच्या मदतीला धावून आल्या.
 
 
‘‘ईशा, तुझ्या शेजारी बसणारा सोहम कसा वाचत होता गं?’’ त्यांनी ईशाला विचारलं, ‘‘टीचर तो मोठ्याने वाचत होता.’’
टीचर, मोठ्याने वाचलं ना की माझ्या नीट लक्षात राहतं. सोहम पटकन मधेच बोलला. टीचर हसल्या. त्या म्हणाल्या, ‘‘अरे, हा एक गैरसमज आहे.’’ मग सगळ्या वर्गाला उद्देशून त्या म्हणाल्या, ‘‘मुलांनो, एक लक्षात ठेवा. मोठ्याने वाचायची सवय ज्याला ज्याला असेल त्याने ही सवय सोडायला हवी, कारण जेव्हा आपल्याला भरपूर वाचन करायचे असते तेव्हा मोठ्याने वाचायची सवय अडथळा ठरू शकते. त्याचप्रमाणे वाचताना अक्षरांवर बोट ठेवून वाचणे, ओठांमध्ये पुटपुटत वाचणे यामुळेही आपल्या वाचनाचा वेग कमी होतो.’’
 
 
वर्गातली सगळी मुले लक्ष देऊन मोहना टीचर जे सांगत होत्या ते ऐकत होती आणि आपण नेहमी कसे वाचन करतो हेही आठवत होती. तेवढ्यात अंकुश म्हणाला, ‘‘टीचर, ही सौम्या वाचत असताना सारखी पुढेमागे डोलत असते.’’ अंकुशचे बोलणे ऐकून सगळी मुले सौम्याकडे बघून जोरजोरात हसायला लागली. मुलांचे हे हसणे टीचरना अजिबात आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी थोडं रागावूनच गप्प बसवलं, त्या प्रेमाने सौम्याला म्हणाल्या, ‘‘सौम्या, तुला काय म्हणायचंय याविषयी?’’ सौम्या म्हणाली, ‘‘टीचर, मी कधी कधी अशी डोलत वाचते, विशेषतः काही लक्षात ठेवायचं असेल, काही पाठ करायचं असेल तर असं डोलत वाचन केलं की लक्षात राहतं. पण याचा वाचनाच्या वेगावर परिणाम होत असेल तर मी नक्कीच ही सवय सोडण्याचा प्रयत्न करेन.’’ सौम्याचा हा प्रांजळपणा मोहना टीचर आणि सगळ्या वर्गालाही आवडला.
 
 
‘‘मुलांनो, आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपली नजर डाव्या बाजूने सुरू करून उजव्या बाजूला जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे काहीही वाचल्यानंतर जे काही वाचलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते याची नोंदही ठेवली पाहिजे. मोहना टीचर कळकळीने सांगत होत्या. सगळ्या वर्गाच्या मोहना टीचर खूप लाडक्या असल्यामुळे अशा वाचनाची नोंद ठेवण्यासाठी आपण एक वेगळी वहीच करू या असा विषय मुलांनी केला, तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. आज मोकळ्या तासाला मुलांनी मजा केली नव्हती, पण वाचनातल्या मजेचा मार्ग त्यांना नक्की कळला होता,
शिक्षक मित्र मैत्रिणींसाठी :
1) विद्यार्थ्यांना मूक वाचन करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
2) अक्षरांवरून बोटे फिरवणे, वाचताना पुटपुट करणे, मोठ्याने वाचणे या सवयी सोडण्यासाठी विद्यार्थांना प्ररित करा.
3) वर्गात वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचणे, एखाद्या पुस्तकातला उतारा वाचणे यासारख्या उपक्रमामुळे वाचनाविषयी आवड निर्माण व्हायला मदत होऊ शकेल.
4) वाचलेल्या भागातील महत्वाच्या नोंदी कशा ठेवायच्या याचे मुलांना मार्गदर्शन करा.
5) ज्ञानप्रबोधिनी या पुण्यातल्या संस्थेच्या शैक्षणिक संशोधन विभागाने वाचनवेग या विषयावर संशोधन करून त्यावर पुस्तकही प्रकाशित केले आहे.आपल्या शाळेत वाचानविषयक कोणताही उपक्रम करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.
 
- संजीवनी शिंत्रे