सुट्टी म्हणजे बाप रे शिबिरं शोधा, वर्ग शोधा आणि मुलांना इकडे तिकडे गुंतवा. नको बाबा ती सुट्टी, शाळा असली की बरं, मुलं गुंतलेली असतात, त्यांना सांभाळावं लागत नाही. असे संवाद सगळीकडे ऐकू येतील. घरातले सारे ‘थोर’ या सुट्टीच्या कल्पनेनंच घायाळ होतील. काय करावं बरं, कशी आवरावी ही भुतं, हल्लीची मुलं काही साधीसुधी नाहीयेत बरं खूप स्मार्ट पिढी आहे ही, मग यांना कसं बाळगायचं घरात तेही महिनोन् महिने. अशासारख्या विचारांचे, चिंतांच्या काळजीचे ढग मोठ्ठ्यांच्या चेहेर्यावर जमलेले दिसू लागलेत. पण, खरंच का हा एवढा गहन प्रश्न आहे जो सोडवताना सगळे एवढे जेरीला येतील. हे छोटे वीर आपल्याला हाताळणं खरंच कठीण होतं का, त्यांच्या हाती रिमोट किंवा मोबाईल सोपवणं हेच क्रमप्राप्त ठरतं का? जर ठरत असेल तर पालक म्हणून आपण हरत असतो. असं हरू नये यासाठीच्या काही बाबींबाबत आज आपण पाहणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल, टी.व्ही. यांच्या वापरासाठी काही वेळापत्रक ठरवणं. सुट्टी आहे म्हणजे पूर्ण वेळ मोबाईल वा टी.व्ही.वरच घालवला पाहिजेच असं नाही. त्यासाठी ठराविक वेळ ठरवून देणं आणि ते कटाक्षाने पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या वेळी काय पाहायचं, कोणत्या प्रकारे पाहायचं, त्यावर चर्चा करायची अशा साध्या साध्या गोष्टी आपण मुलांना ठरवून देणं आणि सजग राहणं हे गरजेचं असतं.
दुसरा शत्रू म्हणजे सततची खाण्याची मागणी. काही घरातून याबाबतची तक्रार अनेकदा ऐकू येते. त्यासाठी सुट्टीच्या सुरुवातीपासूनच एक करता येईल. उद्या काय, किती नि कधी खायचं याची मागणी मुलांनाच विचारून त्यांच्याशी चर्चा करून त्यात थोडेसे बदल करून त्याचं रोजचं वेळापत्रक सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवता येईल. हळूहळू हीच सुट्टी कशाला पुढच्या सगळ्या सुट्टया याबाबतीत आनंदाच्या जातील.
वर जसं खाण्यापिण्याच्या जबाबदारीबाबत म्हटलंय तसंच रोज एक जबाबदारी या सुट्टीत मुलांवर सोपवून पाहा. त्यांची आवड ओळखून, वयोगट लक्षात घेऊन काही छोट्या छोट्या कामांची यादी बनवा. रोज सकाळी त्यांच्यावर त्यातल्या काही आवडत्या कामांची जबाबदारी सोपवा. आपोआपच त्यांना जबाबदारी घेण्याची सवय लागेल. यात पालक म्हणून तुमच्या सातत्याची आणि चिकाटीची परीक्षाही तेवढीच कठीण आहे हं. मात्र सुट्टीच्या शेवटी नक्कीच असं आढळेल की, तुम्हाला पडणार्या चिंता नि काळज्यांमध्ये बरीच घट झालेली असेल आणि तुमचे डायलॉग्जही बदललेले असतील. शेवटच्या दिवशी खात्रीने तुम्हीे सुस्कारा सोडाल सुट्टी खरंच सुधारणेची होती बरं का, मग अनुभव घेणार आणि त्याचा अभिप्राय देणार ना मला सुट्टीच्या शेवटी?