सुगरण

शिक्षण विवेक    13-Jun-2022
Total Views |

sugran 
जून महिना सुरू झाला की, वेध लागतात ते पावसाचे. शेतकरी आपल्या घरांची कौले शेकारतो, आवश्यक साधन सामग्री घरात गोळा करतो. शहरातही दारे-खिडक्या दुरुस्तीचे कामकाज चालते. प्रत्येकजण आपले घर सुरक्षित कसे राहील याची काळजी घेताना दिसतो.
त्याचप्रमाणे आपल्या अवती-भवतीसुद्धा प्राणी-पक्षी आढळून येतात. यात प्रामुख्याने पक्षी पावसाची चाहूल लागताच घरटी विणायला, बांधायला सुरुवात करतात. उदा. कावळा, सुगरण.
अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला देखा
पिलासाठी तीने जीव झाडाले टांगला
या बहिणाबाईच्या कवितेच्या ओळी आठवत असतीलच. या कवितेत सुगरण या पक्षाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. सुगरण पक्ष्याला पक्षी जगतातील इंजिनिअर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याचे शास्त्रीय नाव झश्रेलर्शीी झहळश्रळिळिर्पीी असे आहे.
सुगरण हा पक्षी चिमणीच्या आकाराएवढा असून समूहात राहतो. गोंगाट करतो. एकत्र राहण्यात शत्रूंपासून संरक्षण हे प्रमुख कारण आहे. सुगरण पक्षी हा बर्‍याच वेळा विहिरीजवळील झाडांवर घरटे विणताना दिसते. त्याचे कारण त्यांच्या पिल्लांना शत्रूपासून संरक्षण मिळते. एकाच झाडावर अनेक घरटी विणलेली दिसतात. प्रजनन काळ सुगरण नर जोडी बनवण्यापूर्वी सुंदर घरटे विणतो. इतर माद्यांना आमंत्रित करतो. जर सुगरण मादीला घरटे पसंत पडले, तर ती जोडी; पिल्लांना जन्म देते. या संदर्भात नर सुगरणचे गंमतशीर निरीक्षण असे की, एक नर घरटी बनवत असताना अशावेळी घरट्याची पान चोरणे, घरटे तोडणे असे प्रकार दिसून येतात. पक्षातही ईर्षा दिसून येते.
सुगरण पक्षी समूहाने दाने टिपण्यासाठी बाहेर पडतो. गवताच्या बीया, बाजरीचे दाणे, बारीक कीटक, अळी कधीकधी फुलपाखरू.
सुगरण पक्षी नेहमी गोंगाट करतो परंतु प्रजनन काळात यांचा आवाज मंद होतो. ‘ची-ची’ असा आवाज काढतो. या पक्षांच्या घरट्याची रचना फार सुंदर असते. बर्‍याचवेळा लोक आपल्या घरात शो-पीस म्हणून लावतात. तर ग्रामीण भागात याचा वापर चाळणी म्हणून करतात.
 
- भूषण भोये, सहशिक्षक
कै. ग.भि.देशपांडे विद्यालय